राजा माने
आपल्या बालपणीच्या सवंगड्यांनी आपल्या मुलाने केलेली कर्तबगारी अनुभवावी... महापालिकेच्या शाळेतील आठवणी पुन्हा वेचाव्यात... हा आनंद लुटताना ‘किल्ला’च्या पायाचे दगड गिरणगाव सोलापुरात असल्याची साक्ष देणारी मैत्री...
-------------देशातील पहिले मल्टिप्लेक्स असलेल्या भागवत संकुलात मागच्या आठवड्यात वेगळीच लगबग अनुभवायला मिळाली. १९६४ सालापासून हे संकुल सिनेक्षेत्रातील अनेक उन्हाळ्या-पावसाळ्यांचे साक्षीदार असलेले, त्याला कोणत्याही लगबगीचे तसे अप्रूप नसावे. पण त्या दिवशी जे अनुभवायला मिळत होते, ते काही विरळाच! एखाद्या कौटुंबिक छोटेखानी कार्यक्रमात जी तन्मयतेने रेलचेल चाललेली असते तसाच अनुभव येत होता. माहिती घेतली तेव्हा समजले, एका व्यक्तीने आपल्या बालपणीच्या शालेय मित्रांना व नातेवाइकांना सिनेमा पाहायला बोलवलंय. बरं तिथं जमलेल्यांमध्ये एकमेकांत चाललेल्या संवादात सिनेमाचा विषयच नव्हता, तर त्यांच्यात विषय रंगलेले होते शाळेतील आठवणींचे! गिरणगावातील शाळेच्या आठवणी मित्रांना सिनेमाचं आवतण देऊन जागवणारी वल्ली कोण? या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला. ती व्यक्ती म्हणजे अरुण श्रीरंग ढावरे! वडील श्रीरंग यांनी लक्ष्मी-विष्णू गिरणीत कामगार म्हणून हयात घालविलेली आणि अरुण यांनीही वडिलांचे बोट धरून त्याच गिरणीत साडेतीन वर्षे कामगार म्हणून काम केलेले. आपण म्हणाल, कोण हे गिरणी कामगार? तर हो, लक्ष्मी-विष्णू गिरणीत साडेतीन वर्षे कामगार म्हणून राबलेले अरुण श्रीरंग ढावरे म्हणजे ‘अविनाश अरुण’ या ख्यातकीर्त सिनेदिग्दर्शकाचे वडील! अविनाश अरुण हे नाव ‘किल्ला’ या चित्रपटाने जागतिक पातळीवर पोहोचविले. वैश्विक पातळीवर अनेक पुरस्कार पटकावणाऱ्या आणि बॉक्स आॅफिसवरही कोटी-कोटीची उड्डाणे घेणाऱ्या किल्ला या चित्रपटाच्या दिग्दर्शकाची पाळेमुळे सोलापुरातीलच! जणू हेच सांगण्यासाठी अविनाशच्या वडिलांनी आपल्या बालपणीच्या सवंगड्यांचा स्नेहमेळाच त्या दिवशी चित्रपटगृहात आयोजिला होता. सेकंड क्लासची तिकिटे स्वत: खरेदी करून सामान्य सिनेरसिकांसोबत हे सवंगडी मित्राच्या मुलाने साकारलेल्या कलाकृतीचा आनंद घेत होते. ढावरे कुटुंब मूळचे सोलापूर जिल्ह्यातल्याच मंगळवेढा तालुक्यातील सिद्धापूरचे. उदरनिर्वाहासाठी लक्ष्मी-विष्णू गिरणीत कामाला आले. दमाणी नगरातील न्यू लक्ष्मी चाळीतील खोलीत आपला संसार थाटला. अरुण यांनी प्राथमिक शिक्षण मरीआई चौकातील महापालिका शाळा नं. १८ मध्ये तर माध्यमिक शिक्षण रामलाल चौकातील १२ नंबर शाळेत पूर्ण केले. पुढे आंबेडकर हायस्कूल आणि त्यावेळच्या अध्यापक महाविद्यालयात बीएड करून शिक्षण क्षेत्रात पाऊल टाकले. पुणे जिल्ह्यातील शेळगाव (ता. इंदापूर) येथून सुरू झालेली शिक्षण क्षेत्रातील त्यांची सेवा पनवेल, मुरुड जंजिरा, खोपोलीमार्गे पुण्यापर्यंत पोहोचली. तेथेच ते गटशिक्षणाधिकारी म्हणून निवृत्त झाले. पत्नी प्रमिला, मुलगा अविनाश आणि मुली अस्मिता व प्रियंका यांना कोणताही मध्यमवर्गीय पिता वाढवितो त्या पद्धतीने त्यांनी निष्ठेने वाढविले. मुलांचे पालनपोषण करताना जो कलाप्रेमाचा संस्कार गिरणगाव सोलापूरने त्यांच्यावर केला होता, तोच त्यांनी आपल्या मुलांवर केला. त्याच कारणाने बारावीत शिकणाऱ्या आपल्या मुलाच्या आवडीनुसार त्याला कॅमेरा घेऊन देण्याची समज त्यांनी दाखविली. तेवढ्यावर न थांबता फिल्म ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी प्रतीक्षेसाठी लागणारा संयम त्यांनी दाखविला. त्याच कारणाने अविनाश इन्स्टिट्यूटमध्ये फक्त प्रवेशच मिळवू शकला नाही, तर छायाचित्रकार म्हणून तेथेच ‘अल्ला इज ग्रेट’ हा लघुपट चित्रित करून अनेक राष्ट्रीय पुरस्कारांचा मानकरी ठरला. कोणत्याही वास्तूचा पाया जेवढा मजबूत तेवढी ती वास्तू पक्की हे पारंपरिक सूत्र कोणत्याही क्षेत्राला लागू पडते, याच सूत्राशी असलेले आपले नाते आजही सोलापूर घट्ट करीत असल्याची प्रचिती अरुण ढावरे आणि त्यांचा यशस्वी मुलगा अविनाश अरुण यांच्या वाटचालीतून अनुभवावयास मिळते. आज अविनाश आणि ‘किल्ला’ अनेक विक्रम नोंदवत असताना श्रमदेवतेची पूजा बांधणाऱ्या सोलापुरात त्याच्या कुटुंबाने त्याच्या यशाचा पाया रचला, हे कोण नाकारणार?-