दोन मित्र वाळवंटातून प्रवास करीत असतात. अचानक त्यांच्यात कुठल्यातरी कारणावरून वादावादी होते आणि रागाच्या भरात एक मित्र दुसऱ्या मित्राच्या कानशिलात देतो. दुसऱ्याला मित्राचे हे वागणे फार अपमानास्पद वाटते. परंतु आपल्या रागावर नियंत्रण ठेवत तो काही बोलण्याऐवजी वाळूवर लिहून ठेवतो, आज माझ्या सर्वोत्तम मित्राने मला थप्पड मारली. पुढे ते एका उद्यानात पोहोचतात. तेथे एक तलाव असतो. दोघेही तलावात स्नानासाठी उतरतात. अपमानित झालेला मित्र पाण्यात बुडू लागतो. परंतु दुसरा दलदलीतून बाहेर काढून त्याचे प्राण वाचवतो. तलावातून बाहेर आल्यावर मित्र दगडावर लिहितो, आज माझ्या मित्राने माझे प्राण वाचविले. हे बघून दुसरा त्याला विचारतो, मी थप्पड मारली तेव्हा तू रेतीवर लिहिलेस आणि जीव वाचविले तेव्हा दगडावर, असे का? यावर दुसऱ्याने दिलेले उत्तर अत्यंत मार्मिक असते. तो म्हणतो, अपमानाची घटना रेतीवर यासाठी लिहिली कारण ती क्षमेच्या हवेत मिटून जाईल. परंतु कुणी आपले चांगले केले तर ते नेहमी दगडावरच कोरले पाहिजे. जेणेकरून ते कायम आपल्या स्मरणात राहील. एखादा शब्द पाळण्याची गोष्ट होते तेव्हासुद्धा ‘ती दगडावरची रेषच’ असते आणि ऐतिहासिक निर्णय असला तर तो मैलाचा दगड ठरतो. दगडाचे हे कवित्व यासाठी कारण या दगडावरून सध्या राजकारण चांगलेच तापले आहे. जम्मू-काश्मीरमधील तरुणांच्या हाती हा दगड का आणि कसा आला? याबाबत राजकीय नेत्यांमध्ये सध्या गंभीर विचारमंथन सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दगडाच्या वापराबद्दल काश्मिरी तरुणांना उद्बोधन काय केले अनेकांच्या मनात निरनिराळ्या कल्पना येऊ लागल्या. काश्मिरी नागरिकांच्या इच्छेनुसार काश्मीरचा प्रश्न सुटावा, अशी इच्छा बाळगणाऱ्या खोऱ्यातील तरुणांनी देशासाठी लढा देण्याकरिता हे दगड हाती घेतले असल्याचा अफलातून युक्तिवाद या राज्याचे माजी मुख्यमंत्री फारूख अब्दुल्ला यांनी केला तर दगडफेक करणारी ही मुले हताश झाली असल्याचे या राज्याच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांचे म्हणणे आहे. अर्थात कुणी काहीही म्हणो एवढे मात्र नक्की की हा प्रश्न दगडांनी सुटणारा नाही. बिच्चारा दगड ! तो ाुद्धा हे जाणतो, पण करणार काय? एकवेळ या दगडाला पाझर फुटेल पण केवळ आपल्या क्षुल्लक राजकीय स्वार्थापोटी हा प्रश्न कायम जिवंत ठेवणाऱ्यांची मने मात्र विरघळणार नाहीत. तेव्हा त्यांना पाषाणहृदयी म्हणणे हासुद्धा दगडाचाच अपमान ठरेल.
दगडाचे कवित्व...
By admin | Published: April 07, 2017 11:42 PM