- विजय दर्डा,चेअरमन, एडिटोरियल बोर्ड, लोकमत समूह
काळ मोठा कठीण आला आहे. प्रत्येक गोष्टीची कमतरता आहे. इस्पितळात जागा नाही, प्राणवायू पुरेसा नाही, व्हेंटिलेटर्स कमी पडत आहेत,औषधे नाहीत.. ही वेळ ‘तू-तू मैं-मैं’ करण्याची नाही, पण आजूबाजूला तेच घडते आहे. खरे तर असे भांडत बसण्याची ही वेळ नाही. ही वेळ फक्त प्राण वाचवण्याची आहे. एक पदरी मुखपट्टी लावत असाल तर दुपदरी लावा. वापरतच नसाल, तर वापरायला सुरुवात करा. नियम पाळा. सरकारला सहकार्य करा. अशासाठी की सरकार शक्य ते सारे करते आहे, आणि आता तुम्हाला द्यायला सरकारकडे फारसे काही उरलेले नाही. आणि हा जो काही आरोप-प्रत्यारोपांचा खेळ चालला आहे, तो आधी थांबवा. केंद्र राज्याला दोष देत आहे आणि राज्य केंद्राला. हे आता बास! आपण भारतीय आहोत, सगळे भारतमातेचे सुपुत्र आहोत. कोणी भाजपचे नाही आणि कोणी कॉंग्रेसचे नाही. दुसऱ्या पक्षाचाही कोणी नाही. प्रत्येक जण भारतमातेचा किंवा आपल्या माता-पित्यांचा आहे. ही वेळ दुजाभाव करण्याची मुळीच नाही.
आपल्यापैकी कोणीही अशा वाईट काळाची कल्पना स्वप्नातही केली नव्हती. स्पॅनिश फ्लू, प्लेगची साथ यायची तेव्हा जगात काही ठिकाणी गावेच्या गावे नष्ट झाली, हे फक्त ऐकून माहिती होते.. आज आपण आप्तस्वकीयांच्या जगण्या-मरण्याचा संघर्ष पाहतो आहोत. माझा लोकमत परिवार खूप मोठा आहे. रोज मनुष्यबळ विभागातून कोणाकोणाच्या मृत्यूच्या बातम्या येतात, तेव्हा जीव कळवळतो. देशभरात कहर चालूु आहे. मोठ्या हुद्द्यावर काम करणाऱ्या प्रभावशाली लोकांनाही इस्पितळात खाट मिळणे कठीण जात आहे तर सामान्यांची काय कथा? ज्यांच्यात ताकद, क्षमता आहे ते देश सोडून उपचारासाठी मालदीव, दुबईला निघून जात आहेत. काही लोक हिल स्टेशन्सवर रहायला गेले आहेत; परंतु ही मूठभर लोकांची व्यवस्था आहे. हा अवघा देश नाही.
नरेंद्र मोदी यांनी आवाहन केल्यावर कुंभमेळा समाप्त करण्यात आला, हा एक दिलासा! खरे तर तो होऊच द्यायला नको होता; पण जाऊ द्या, ‘देर आये दुरुस्त आये’. जवळपास ४९ लाख भाविकांनी कुंभमेळ्यात स्नान केले असा अंदाज आहे. शेकडो साधूंबरोबर काही हजार भाविकही त्यामुळे कोरोनाग्रस्त झाले आहेत. दोन मोठ्या संतांना प्राणही गमवावे लागले. हजारो लोकांना संसर्ग होऊन ते देशभर संसर्ग पसरवत फिरतील तर काय संकट ओढवेल? शेवटी याचा ताण प्रशासनावरच तर पडत असतो! त्या यंत्रणेत काम करणारीही माणसेच तर आहेत. म्हणून मी म्हणतो, प्रशासनाला, सरकारला सहकार्य करा. पूर्ण संयमाने कोविड शिष्टाचार पाळले पाहिजेत. नाही तर परिस्थिती आणखी बिघडेल. मागच्या वर्षी तबलिगी जमातीबद्दल किती हलकल्लोळ माजला होता. छोट्या-मोठ्या ठिणग्याच मोठे नुकसान करत असतात हे विसरू नका. या देशाला अखंड ठेवणे ही आपली जबाबदारी आहे. अनेक राज्यांत निवडणुकांच्या प्रचारसभा, मेळावे होत आहेत. निवडणूक आयोगाने त्यावर तत्काळ प्रतिबंध लावले पाहिजेत. आयोग करत नसेल तर सर्वोच्च न्यायालयाने पुढाकार घेऊन हे काम केले पाहिजे. या सभा, मिरवणुका कोरोनाबॉम्ब आहेत!
तूर्तास सरकार आपल्या क्षमतेनुसार शक्य ते सर्व करत आहे. देशात कोरोना रुग्णांसाठी खाटांची संख्या सतत वाढवली जात आहे. पण डॉक्टर्स, परिचारिका कोठून आणायच्या? लाखो कुटुंबांनी आपले कोणी ना कोणी गमावले हे खरेच आहे. अशा स्थितीत व्यवस्थेवर त्यांचा राग निघणे स्वाभाविक!- पण ही वेळ डॉक्टरांशी लढण्याची नाही हेही आपण समजून घेतले पाहिजे. या संकटकाळात डॉक्टर्स, परिचारिका आणि सहाय्यक मंडळी जिवाचे रान करून काम करत आहेत ते केवळ कौतुकास्पद होय. खाट मिळाली नाही किंवा प्राणवायू नसेल तर त्यात डॉक्टरांचा काय दोष? - तीही माणसे आहेत हे विसरू नका.
आपण टाळेबंदीच्या माध्यमातून कोरोनाच्या पहिल्या लाटेचा चांगला बंदोबस्त केला होता याची आठवण मी करून देऊ इच्छितो. नव्या वर्षाच्या प्रारंभी तर वाटत होते की आपण जिंकलो! पण त्या विजयाच्या नशेत आपण बेपर्वाईने वागलो. लग्नाच्या वराती निघाल्या, जेवणावळी घडल्या, त्यातून कोरोनाला संधी मिळाली. त्याने बघताबघता बाजू उलटवली. अमेरिका, युरोपने घेतली तशी काळजी आपल्या सरकारनेही घ्यायला हवी होती, बंदोबस्त करायला हवा होता; पण आपण बेफिकीर राहिलो. आता त्याचा परिणाम भोगतो आहोत. अजून सावरलो तर भविष्यातले नुकसान टाळू शकतो.आपल्या पूर्वजांनी यापेक्षा वाईट काळ पाहिला होता; पण ते त्यातून बाहेर पडले. १८१६ मध्ये बंगालमधून सुरू झालेल्या महामारीने लाखो भारतीयांबरोबर १० हजार ब्रिटिश सैनिकांनाही गिळंकृत केले होते. १९१८ साली पसरलेल्या स्पॅनिश फ्लूने १ कोटी ७० लाख भारतीय मरण पावले. तेव्हा भारताची लोकसंख्या ३२ कोटींपेक्षा कमी होती. त्यावेळी विज्ञान आजच्या इतके प्रगत नव्हते आणि लस तयार व्हायला वेळ लागला म्हणून अधिक मृत्यू झाले. यावेळी कोरोनाशी लढायला वर्षाच्या आत लस तयार झाली आहे; पण कोरोनाचा अंत केवळ लसीने होईल असे गृहीत धरू नका. देशात सर्वांना लस मिळायला अजून बराच वेळ लागेल. लसीचे दोन डोस घेतल्यावर आणखी सहा महिन्यांनी पुन्हा लस घ्यावी लागेल की वर्षाने हे अजून स्पष्ट झालेले नाही; म्हणून मग कोरोनापासून दूर राहणे हाच उत्तम उपाय ठरतो.
कोरोनाचे भय सर्वत्र पसरलेले आज आपण पाहतो आहोत. लोक बेचैन आहेत; पण हिंमत सोडावी असा याचा अर्थ नाही. लक्षात ठेवा, संयम, शिस्त, हिंमत आणि सतर्कता या शस्त्रांनी आपण कोरोनाला पराभूत करू शकतो.
- vijaydarda@lokmat.com