गुजरातच्या पटेल समाजाचे तरुण नेते हार्दिक पटेल यांच्या आमरण उपोषणाचा आजचा तेरावा दिवस आहे. हार्दिक पटेल, दिल्लीचा कन्हैया कुमार व गुजरातचा जिग्नेश मेवानी या तीन तरुणांनी मध्यंतरीचा बराच काळ साऱ्या देशाला हादरे दिले होते. त्यांच्यासमोर उभे राहायला आणि बोलायला सत्ताधारी पक्षाचे धुरंधर प्रवक्तेही घाबरताना दिसले. संबित पात्रा या भाजपाच्या मुख्य प्रवक्त्याला ‘तुम्हाला गोडसे हवेत की गांधी’ या एकाच प्रश्नावर अडकवून कन्हैया कुमारने कसे रडकुंडीला आणले, ते देशाने पाहिले आहे. हार्दिक पटेल हा गुजरातमधील पटेल समाजाचा अतिशय आक्रमक, पण लाडका नेता आहे. त्याच्यामागे जाणा-या पटेल समाजाने सारा गुजरातच सध्या डोक्यावर घेतला आहे. हार्दिकच्या नेतृत्वात पटेल समाजासाठी आरक्षणाची मागणी करणारे लाखो लोकांचे निघालेले मोर्चे देशाने पाहिले आहेत. त्याला तुरुंगात डांबून लोकांपासून दूर ठेवले, तर लोक त्याला विसरतील, हा सरकारचा भ्रमही नंतर खोटा ठरला. तुरुंगाबाहेर येताच, त्याच्याभोवती जमलेल्या पटेल समाजाच्या लोकांनी त्याची लोकप्रियता तशीच शाबूत असल्याचे तेव्हा सिद्ध केले होते. पटेल समाज हा तसाही लढाऊ आहे. देशातील पहिले शेतकरी आंदोलन १९२०च्या दशकात याच समाजाने सरदार पटेलांच्या नेतृत्वात केले. त्या आंदोलनाची उग्रता व शिस्त एवढी मोठी होती की, सरकारने सा-या गुजरातवर बसविलेला शेतसाराच तेव्हा मागे घेतला होता. हार्दिक पटेल तरुण आहे आणि त्याच्यामागे असलेल्या तरुणांची संख्याही मोठी आहे. अशा तरुणावर वेगवेगळे आरोप लावायचे आणि त्याला तुरुंगात डांबायचे, हा सरकारचा पोरखेळ त्यांच्याच अंगावर उलटणारा आहे. या स्थितीत आपल्या उपोषणाच्या दहाव्या दिवशी हार्दिकने त्याचे मृत्युपत्र जाहीर केले आहे. ते कुणाही सहृदय माणसाच्या मनाला पीळ पाडणारे आहे. ‘उपोषणात माझा मृत्यू झाल्यास, माझी सगळी मालमत्ता माझ्या पालकांना व गुजरातमधील गोशाळांना दिली जावी. माझे डोळेही दानात दिले जावे,’ असे या पत्रात म्हणणा-या हार्दिकने लिहिले आहे की, ‘भाजपा सरकारविरुद्ध मी २५ आॅगस्टपासून उपोषण करीत आहे. माझे शरीर अशक्त झाले असून, त्यात वेदना व आजारांनी प्रवेश केला आहे. या स्थितीत माझे प्राण केव्हाही जाऊ शकतात.’ पटेल समाजाचे दुसरे नेते मनोज पनारा यांनी हे मृत्युपत्र आता जाहीर केले आहे. ‘आपल्या ५० हजारांच्या बँक ठेवींपैकी २० हजार माझ्या पालकांना दिले जावे व उरलेली रक्कम अहमदाबादमधील चंदननगरच्या गोशाळेला द्यावी,’ असेही त्यात हार्दिकने म्हटले आहे. ‘हू टुक माय जॉब’ या त्याच्या आगामी पुस्तकातून येणाºया रकमेपैकी ३० टक्के आपल्या कुटुंबाला, तर ७० टक्के रक्कम पाटिदारांनी केलेल्या आंदोलनात ज्या १४ जणांना मृत्यू आला, त्यांच्या कुटुंबीयांना द्यावी,’ असेही त्याने नोंदविले आहे. मुळात हे मृत्युपत्र हाच मुळी एक स्फोटक दस्तऐवज आहे. त्याने गुजरातमध्ये व विशेषत: तेथील पटेल या मोठ्या समाजात केवढा असंतोष उभा केला असेल, याची कल्पना आपण करू शकतो. केवळ राजकीय पक्ष वा एखादी धार्मिक किंवा अर्धधार्मिक संघटना मागे असलेली माणसेच समाजात उठाव घडवून आणत असतात, हे खरे नाही. टिळकांनी, गांधींनी आणि स्वातंत्र्याच्या आंदोलनातील अनेकांनी असे उठाव आपल्या त्यागाच्या व परिश्रमाच्या बळावर घडवून आणले आहेत. स्वतंत्र भारतातही एखादी मनकर्णिका सा-या देशाला हादरा देऊ शकते, हे आपण पाहिले आहे. या स्थितीत हार्दिक पटेल व त्याचे सहकारी यांच्याशी तत्काळ बोलणी करणे व त्यांच्या मागण्यांबाबत सनदशीर तोडगा काढणे हे गुजरात सरकारचे तातडीचे कर्तव्य आहे. ते सरकार तसे करणार नसेल, तर केंद्राने त्यात पुढाकार घेणे आवश्यक आहे. भारत हा तरुणांचा देश आहे. या तरुणाईला सत्तेचे आकर्षण नसून न्यायाचे आहे. हा तरूण समाजाच्या नैतिक भूमिकेला वळण देऊन, समाजाला सोबत ओढून नेणारा मार्गदर्शकही होत असतो, ही बाब सा-यांनी लक्षात घेतली पाहिजे.
हार्दिकचे उपोषण थांबवा; मागण्यांबाबत सनदशीर तोडगा काढणे गुजरात सरकारचे कर्तव्य
By ऑनलाइन लोकमत | Published: September 06, 2018 4:18 AM