जगाला कायम नैतिकतेचे धडे देणारी अमेरिका स्वत: मात्र कशी वागते आणि सगळी नैतिकता पायदळी कशी तुडवते हे वेळोवेळी सिद्ध झाले आहे, तरीही स्वत:ची शेखी मिरवण्यात हा देश कधीच मागे नसतो. मानवतेची आणि माणुसकीची कुठे आणि कशी हत्या होते आहे, याबाबत आम्ही डाेळ्यांत तेल घालून पाहात असतो, अशा बाबी आम्ही कधीच खपवून घेणार नाही, असा शहाजोगपणाचा सल्लाही अमेरिका कायम देत असते; पण स्वत:च्या पायाखाली काय जळतंय याची साधी दखलही कधी घेत नाही.
अमेरिकेत कृष्णवर्णीयांचा शतकानुशतकांपासून होत असलेला आणि आताही सुरू असलेला छळ हे त्याचं मूर्तिमंत उदाहरण आहे. या गोष्टी फारशा बाहेर येत नाहीत, ते येऊ देत नाही, त्यांची फारशी चर्चा होत नाही, त्यामुळे अशा गोष्टी तिथे घडतच नाहीत, असं नाही. अमेरिकेत २५ मे २०२० रोजी डेरेक शॉविन या पोलिस अधिकाऱ्यानंच जॉर्ज फ्लॉइड या निरपराध कृष्णवर्णीय निरपराध तरुणाची हत्या केली होती. त्याच्या हातात हातकड्या घालून, त्याला जमिनीवर पाडून आणि त्याच्या मानेवर तब्बल ८ मिनिटे ४६ सेकंद तो गुडघा रोवून बसला होता. जीव घुसमटल्या अवस्थेत प्राणांची भीक मागत असतानाही त्याला कोणतीही दया आली नाही आणि जॉर्जचा प्राण जाईपर्यंत डेरेकनं जॉर्जला सोडलं नाही. ही घटना पहिल्यांदा मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर आणि त्यामुळे जगात अमेरिकेचे वाभाडे काढले गेल्यानंतर, छी थू झाल्यानंतर त्यावर कारवाई करण्याची आणि यापुढे असे प्रकार होणार नाहीत, अशी बतावणी अमेरिकेला करावी लागली, पण त्यात आजतागायत बदल झालेला नाही.
नुकत्याच झालेल्या एका घटनेत पुन्हा एका पोलिसानंच एअरफोर्समधील एका कृष्णवर्णीय सैनिकाला गोळी मारून ठार केलं. या घटनेचा किस्साही अतिशय हृदयद्रावक आहे. या अश्वेत सैनिकाला पोलिसानं का मारावं?
- तर एका महिलेनं एका ठिकाणी भांडण सुरू असल्याची नुसती माहिती दिली आणि त्यात हाच सैनिक दोषी असल्याच्या कारणावरून ! त्याचं झालं असं... रस्त्यावर एक पाेलिस गस्त घालत असताना एका महिलेनं त्याला सांगितलं, गल्लीत एका घरात एक महिला आणि एका पुरुषाचं भांडण सुरू आहे. झालं ! लगोलग हा पोलिस त्या घरात गेला. पण ज्या घरात आपण जात आहोत, ते घर तेच आहे का, याचीही खातरजमा त्यानं केली नाही. महिलेनं ज्या ठिकाणी भांडण सुरू आहे असं सांगितलं, त्याऐवजी वेगळ्याच घरात तो गेला. घराचा दरवाजा ठोठावला. त्यातून हा कृष्णवर्णीय सैनिक बाहेर येताच त्यानं दरवाजातच त्याच्यावर गोळी झाडली आणि हा तरुण सैनिक मारला गेला! या २३ वर्षीय तरुण कृष्णवर्णीय सैनिकाचं नाव रॉजर फोर्टसन. त्याला हकनाक आपल्या प्राणाला मुकावं लागलं. गोळीबाराची ही घटना या पोलिसाच्या बाॅडी कॅमेऱ्यातही रेकॉर्ड झाली आहे.
या घटनेवरून पोलिसांवर टीका झाल्यानंतर स्पष्टीकरण देताना पोलिस प्रशासनानं सांगितलं, रॉजरनं जेव्हा दरवाजा उघडला, त्यावेळी त्याच्या हातात पिस्तूल होतं. त्याच्यापासून वाचण्यासाठीच पोलिसानं त्याच्यावर गोळी झाडली. या घटनेनंतर त्या पोलिसावर लगेचंच काही कारवाई न करता, केवळ त्याला दीर्घ रजेवर पाठवून देण्यात आलं.
रॉजरच्या कुटुंबीयांनीही पत्रकार परिषद घेऊन सांगितलं, रॉजर एक देशभक्त सैनिक होता. अमेरिकन एअरफोर्सच्या स्पेशल ऑपरेशन टीमचा तो सदस्य होता. ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी तो आपल्या मैत्रिणीशी व्हिडीओ कॉलवर बोलत होता. या मैत्रिणीनंही सांगितलं, आमचा व्हिडीओ कॉल सुरू असताना कोणी तरी रॉजरच्या घराचा दरवाजा वाजवला. रॉजरनं ‘कोण आहे?’ म्हणून विचारलं, पण पलीकडून काहीच उत्तर आलं नाही. काही सेकंदांनी दरवाजा पुन्हा वाजला. रॉजरनं दरवाजाच्या आय होलमधून पाहिलं, बाहेर कोणीच दिसलं नाही, म्हणून शंका आल्यानं त्यानं आपली पिस्तूल उचललं, पण तोपर्यंत दरवाजा तोडून तो पोलिस आत घुसला होता. रॉजरनं केवळ सुरक्षेसाठी हातात पिस्तूल घेतलं होतं, पोलिसानं मागचा पुढचा काहीही विचार न करता लगेचच रॉजरवर गोळी चालवली आणि त्यात तो ठार झाला!
४१ सेकंदात छाताडावर ९६ गोळ्या!
अश्वेत नागरिकांच्या हत्येच्या आणि छळाच्या अगदी अलीकडेही काही घटना अमेरिकेत घडल्या आहेत. २१ मार्च रोजी कारमध्ये बसलेल्या एका कृष्णवर्णीय व्यक्तीवर पोलिसांनी केवळ संशयावरून ४१ सेकंदांत ९६ गोळ्या डागल्या. त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. दुसऱ्या एका घटनेत १६ जानेवारी रोजी पेनसिल्वेनियाच्या हॉटेलमधील एका कृष्णवर्णीय महिलेनं सँडविचवर एक्स्ट्रॉ चिज न दिल्यामुळे पोलिसांनी तिला बेदम मारहाण केली. अशा घटना अमेरिकेत नित्याच्या झाल्या आहेत!