- के. नटवर सिंग
भारताला विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या बाबतीत २१ व्या शतकात नेण्याचे श्रेय नि:संशय देशाचे भूतपूर्व पंतप्रधान राजीव गांधी यांनाच जाते. त्यांना यंत्रतंत्राची उत्तम जाण होती. आधुनिक तंत्रज्ञानावरची अद्ययावत पुस्तके ते सतत वाचत असत. देशात दूरध्वनी आणि संगणकाचे नवे तंत्रज्ञान आणण्याचे श्रेयही अर्थातच राजीवजींचेच! या कामासाठी त्यांनी त्यांचे निकट मित्र सॅम पित्रोदा यांना अमेरिकेतील नोकरी सोडून भारतात बोलावून घेतले. त्यांना सरळ सांगितले, ‘आमच्याकडे दूरध्वनी नाहीत. लवकरात लवकर सर्वांना फोन उपलब्ध करून देण्याची जबाबदारी तुमची.’- तेव्हा देशात डायल फिरवायचे फोन होते. राजीवजींच्या पंतप्रधानपदाच्या कारकिर्दीत बटणाच्या फोनची निर्मिती भारतात सुरू झाली. त्याशिवाय क्रॉस बार एक्स्चेंजच्या जागी इलेक्ट्रॉनिक एक्स्चेंज आणून घरोघर दूरध्वनी उपलब्ध करून दिले गेले. दुसरे शहर किंवा देशात फोन करण्यासाठी ट्रंककॉल बुक करण्याची गरज न उरणे, हा तत्कालीन भारतासाठी चमत्कारच होता.
मी त्यांच्याबरोबर अनेक देशांत प्रवास केला. एकदा आम्ही नामिबिया या आफ्रिकी देशाच्या स्वातंत्र्याच्या सोहळ्यात सामील होण्यासाठी गेलो. तेव्हा दक्षिण आफ्रिकेतूनच तिकडे जावे लागायचे. झांबियाची राजधानी लुसाकामध्ये आम्ही एक रात्र थांबलो होतो. रात्री राजीव गांधी यांनी आपल्या सामानातून तारा जोडलेल्या काही वस्तू काढल्या आणि मला त्यांना मदत करायला सांगितले. मी विचारले, ‘आपण काय करता आहात?’ ते म्हणाले, ‘मी रेडिओ सेट करतो आहे. बातम्या ऐकल्याशिवाय मला चैन पडत नाही. म्हणून माझा रेडिओ मी बरोबर ठेवतो!’
- तोवर मी इतका छोटा रेडिओ पाहिला नव्हता
त्यांची ही नजर आणि बुद्धिमत्ता खरेच असामान्य होती. राजीवजींना आणखी थोडे आयुष्य मिळते, तरी भारत अधिक वेगाने आधुनिक तंत्रयुगात पोहोचला असता. १९८८ मध्ये आम्ही स्वीडनच्या दौऱ्यात आधी मोबाईल कारखाना पाहायला गेलो. चाचणी म्हणून राजीवजींनी तेथूनच दिल्लीतील दूरसंचार विभागाचे प्रमुख अग्रवाल यांना फोन लावला. कोण्या सचिवाने फोन उचलला. राजीव गांधी बोलत आहेत सांगितल्यावर त्यांना वाटले कोणीतरी थट्टा करते आहे. त्यांनी फोन ठेवून दिला. दोनदा असे झाले. -दिल्लीत परतल्यावर राजीवजींनी अग्रवाल यांना बोलावून घेतले... त्याच दिवशी भारतातल्या मोबाईल क्रांतीची मुहूर्तमेढ रोवली गेली.
७ मार्च १९८३ ला भारतात अलिप्ततावादी देशांचे संमेलन झाले. त्या संमेलनाच्या चोख व्यवस्थेसाठी राजीवजींनी स्वीडनहून ६ मोबाईल फोन मागवून घेतले होते. भारतात कोणाला हे तंत्रज्ञान माहीत नव्हते म्हणून तंत्रज्ञही स्वीडनहून आले होते. त्यांनी एक छोटे एक्स्चेंज तयार केले. त्या वेळी हे फोन दिल्लीमध्ये सर्व ठिकाणी चालत असल्याचा चमत्कार मी अनुभवला आहे.
आपल्या कार्यकालात राजीव गांधी यांनी अणुबॉम्ब तयार केले होते, हे फार थोड्यांना माहीत असेल. दुसऱ्यांदा सत्ता मिळती तर त्यांनी अणुचाचण्याही केल्या असत्या. जे श्रेय अटलबिहारी वाजपेयींना मिळाले. त्याची पूर्वतयारी राजीव यांनीच केली होती.
वाट पाहणे हा राजीवजींचा जणू स्वभावच नव्हता. त्यांना प्रत्येक काम अत्यंत त्वरेने करायचे असे. वेग त्यांच्या स्वभावातच होता. कित्येकदा ते स्वत: ताशी १२० ते १४० किमी वेगाने गाडी चालवत. संरक्षककवचातील गाड्या किंवा सहकारी ५- ६ किमी मागे पडत. गाडी हळू चालवा, असे सोनियाजी त्यांना वारंवार सांगत, पण ते ऐकून न ऐकल्यासारखे करत, हे मी अनुभवले आहे.
एकदा आम्ही तुर्कस्तानात गेलो. त्या देशाने कुठलेसे विमान खरेदी केले होते. राजीव यांनी ते उडवून पाहिले. नंतर मी त्यांना म्हणालो, ‘हे आपण बरोबर केले नाही. आपण केवळ पायलट नाही. देशाचे पंतप्रधानही आहात. कोणाला न सांगता आपण चाचणी उड्डाणासाठी कसे काय गेलात?’ते म्हणाले, ‘मी २० वर्षे विमान उडवत आलो, मला काही होणार नाही!’
धोका पत्करणे हे या दिलदार माणसाच्या स्वभावातच मुरलेले होते. पंचायत राजची कल्पना भले मणिशंकर अय्यर यांची असेल, पण ती समजून घेऊन प्रत्यक्षात उतरवणारे राजीवजीच होते. त्यांच्यामुळेच आज गावे सशक्त होत आहेत. सरकारी योजना आणि खजिन्यातून पैसे थेट गावाकडे जात आहेत.राजीव गांधी हा एक सत्शील, दिलदार माणूस तर होताच, शिवाय ते दूरदर्शी प्रशासकही होते. १९८४ साली त्यांना भारतीय लोकशाहीतला सर्वात मोठा कौल मिळाला. पण दुर्दैव हे, की काही सल्लागारांच्या कारस्थानांमुळे फासे उलटे पडत गेले. भारताच्या इतिहासात राजीवजी जे स्थान मिळवू शकले असते, त्यापासून ते वंचित राहिले.. आणि भारतही! (मुलाखत आणि शब्दांकन : शरद गुप्ता)