यदु जोशी
तीन चाकांचे सरकार फार काळ टिकणार नाही हा अंदाज खोटा ठरवत उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडी सरकार आज एक वर्ष पूर्ण करत आहे. हिंदुत्ववादी शिवसेना आणि धर्मनिरपेक्ष काँग्रेस-राष्ट्रवादी यांच्या अजब मिलापातून तयार झालेले सरकार बाळसे धरताना दिसत आहे. भाजपच्या दृष्टीने अनैतिक, अनैसर्गिक असलेले हे सरकार आपसातील विसंवादाचे अधेमधे जाहीर प्रदर्शन करतही टिकून राहिले आहे. १०५ जागा मिळवलेला भाजप सत्तेपासून दूर राहील असे कोणालाही वाटले नव्हते. तो चमत्कार शरद पवार या नेत्याने करून दाखवला. १९७८ मध्ये त्यांनी पुलोदचा प्रयोग यशस्वी केला होता. त्यानंतर तब्बल ४१ वर्षांनी वयाच्या ऐंशीमध्ये असलेल्या पवारांनी शिवसेना, काँग्रेस-राष्ट्रवादीची मोट बांधली आणि सत्तेचे सिंचन केले. असाध्य म्हटल्या जाणाऱ्या रोगाला वाकुल्या दाखवत थक्क करणारी प्रचंड ऊर्जा आणि अपार ऊर्मी बाळगत पवार महाविकास आघाडीचे शिल्पकार, सूत्रधार बनले. जन्मोजन्मी हाच पती मिळावा म्हणून बायका वडाला सूताच्या गाठी बांधतात. पवार हे या सरकारभोवतीची अशीच गाठ आहेत. ज्यांच्यामुळे हे सरकार बांधले गेले आहे. सरकार जन्मजन्मांतरी राहील का, त्याचे आयुष्य किती असेल याचे उत्तर काळाच्या उदरात आहे; पण आज तरी या सरकारची मांड पक्की आहे आणि त्याचे सर्वात जास्त श्रेय पवार यांनाच द्यावे लागेल. साताऱ्यातील पवारांची पावसातील ती सभा, ईडीला येडी करण्याची त्यांची रीत, भाजपच्या प्रचाराचा चुकलेला रोख, त्यातून पवार यांना मिळालेली सहानुभूती याचा फायदा राष्ट्रवादीला झाला.
विधानसभा निवडणुकीनंतर जनतेने युतीला कौल दिला असल्याचे चित्र समोर आले; पण पवार यांनी फासे पलटविले. देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांच्याबरोबर केलेला पहाटेचा शपथविधी कोण विसरणार? महाराष्ट्राच्या सत्तानाट्याचा तो एक जबरदस्त क्लायमॅक्स होता. पवारांना जेवढ्या वर्षांचा राजकीय अनुभव आहे त्यापेक्षाही कमी वय असलेल्या फडणवीसांनी पवारांवर बाजी पलटवली असे चित्र त्या पहाटे निर्माण झाले होते; पण ते अल्पजीवी ठरवण्यात मातब्बर पवार यशस्वी झाले. पहाटेच्या त्या चमत्कारात फडणवीसांना साथ देणारे अजित पवार हे उपमुख्यमंत्री झाले; पण सरकार शरद पवार-उद्धव ठाकरे हे दोघेच चालवत आहेत. पहाटेच्या बंडाची किंमत अजितदादांना मोजावी लागत असल्याचे दिसते. पहाटेचे ते सत्तानाट्य आणि त्या एकूणच पंधरा-वीस दिवसांमध्ये झालेल्या प्रचंड राजकीय घडामोडींवर काही पत्रकारांनी पुस्तके लिहिली, अनेकांनी लेख लिहिले, चॅनलवाले तर अजूनही रवंथ करत असतात. पण त्या सगळ्यांना शंभर टक्के पवार कुठे कळले? महाराष्ट्राच्या पाच दशकांच्या राजकारणाचा चालता बोलता शब्दकोश असलेला हा नेता पुढच्या महिन्यात वयाची ऐंशी वर्षे पूर्ण करीत आहे. केवळ महाविकास आघाडी सरकारची निर्मिती करूनच ते थांबले नाहीत तर ते सरकार सुविहितपणे चालेल यासाठीची प्रत्येक काळजी घेताना ते दिसतात. या सरकारची पटकथा पवारांनी लिहिली, संवादही त्यांनी लिहिले, संगीतही त्यांचेच, निर्मातेही तेच आणि दिग्दर्शनही त्यांचेच. पवार साहेब या सरकारचे एकखांबी तंबू आहेत आणि हा तंबू मजबूत असेपर्यंत सरकारला धक्का लागणार नाही असे लोक म्हणतात त्यातच सगळे आले !
ठाकरे आणि संयमाची गोळीतीन पायांचे हे सरकार चालवण्याची कसरत उद्धव ठाकरे यांना रोजच्या रोज करावी लागत आहे. रुसवे-फुगवे, मान-अपमानाचे प्रसंग सुरूच असतात. सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणातील झळ मातोश्रीला पोहोचणार असे चित्र निर्माण होते, ठाकरे यांच्या जमीन व्यवहारांची प्रकरणे बाहेर काढली जातात, अर्णव गोस्वामी वाट्टेल ते आरोप करतात, भाजपकडून हल्ले, हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून कोंडी करणे सुरूच राहते... अशाही परिस्थितीत ठाकरे यांनी सरकारचा गाडा चालविला आहे. खरे तर ठाकरे केवळ ऐकवण्याची सवय असलेले ! पण स्वतःमध्ये विलक्षण बदल करत ऐकून घेण्याची सवय करत त्यांनी सरकार टिकवले. त्यांनी ‘संयमाची गोळी खाणे’ हा अपवाद आहे की नियम हे काळच ठरवेल; पण आज कोरोनाच्या महामारीने घेरलेले असतानाही या सरकारला धोरण लकवा मारलेला नाही. काही ना काही निर्णय होत आहेत. आधीच्या सरकारमध्ये सर्व प्रकारच्या निर्णयांबाबत देवेंद्र फडणवीस ही एक खिडकी होती. आज अशा दहा-वीस खिडक्या आहेत. त्याबाबत ‘इज ऑफ डुईंग बिझनेस’ आणण्याची मात्र गरज आहे.
काँग्रेसचे नेमके काय चालले असावे?काँग्रेसची या सरकारमध्ये काही भूमिका आहे का याची शंका येते. ‘सरकारच्या निर्णयप्रक्रियेत आम्हाला स्थान नाही. आमचा सरकारला फक्त पाठिंबा आहे’, असे राहुल गांधी एकदा म्हणाले होते. वर्षभरात परिस्थिती बदललेली नाही. मंत्रिपदांच्या मोबदल्यात काँग्रेसने भूमिका स्वातंत्र्याची आहुती दिली आहे. काँग्रेसच्या निवडक मंत्र्यांचे वैयक्तिक समाधान केले की, त्यांचा होकार घेता येतो हे मुख्यमंत्री आणि शरद पवार यांना चांगले कळलेले दिसते. राष्ट्रवादीचे मंत्री पक्षवाढीसाठी ज्या स्पिरिटने भिडतात, त्याचा काँग्रेसमध्ये अभाव दिसतो. फडणवीस सरकारमध्ये शिवसेनेचे मंत्री राजीनामे खिश्यात घेऊन फिरायचे त्याचे बरेच हसे झाले; पण कामे काढून घेण्यासाठी दबाव म्हणून त्याचा उपयोगही झाला. काँग्रेसच्या मंत्र्यांना असेच राजीनामे खिश्यात ठेवावे लागतील.
फडणवीस काय करतील?हे सरकार स्वतःच्या भाराने, अंतर्विरोधाने पडेल असे भाकीत भाजपकडून सुरुवातीपासून वर्तविले जात आहे. चंद्रकांत पाटील, रावसाहेब दानवे अजूनही सरकार पडण्याचा मुहूर्त सांगतात; पण विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस मात्र ‘आम्ही सक्षम विरोधी पक्षाच्या भूमिकेत काम करत राहू’ असे म्हणतात. राजकीय शहाणपण त्यातच आहे. ‘सावज टप्प्यात आल्याशिवाय मी गोळी चालवत नसतो’ असे सुधाकरराव नाईक म्हणायचे. फडणवीसांचे एकदा ‘मिसफायर’ झाले, पण म्हणून ते कायमच विरोधी पक्षात राहतील, असे अजिबात नाही. त्यांना मोठी राजकीय इनिंग अजून खेळायची आहे. राज्यातील काहीशा अनिश्चिततेतच ‘मी पुन्हा येईन’ची बीजे असू शकतात. १८:१८:१० असा खताचा फॉर्म्युला शेतकरी वापरतात. फडणवीस सत्तेसाठी एखादा असा कोणता फॉर्म्युला आणतात का यावर सगळे अवलंबून आहे.
(लेखक लोकमतच्या मंबई आवृत्तीत वरिष्ठ सहायक संपादक आहेत)