हनुवटीवर टॅटू गोंदवून बातम्या देणारी न्यूज अँकर एवढीच ओरिनीची ओळख नाही. तिच्या संघर्षाचीही ती खूण आहे!ओरिनी कायपारा ही न्यूझीलंडमधील ३७ वर्षीय न्यूज अँकर सध्या जगभरात बातम्यांचा आणि चर्चेचा विषय झाली आहे. ही न्यूझीलंडमधील माओरी या आदिवासी जमातीची तरुणी. देशात राजकीय प्रतिनिधित्व मिळावं म्हणून या जमातीचा लढा चालू असताना ओरिनीने न्यूझीलंडमधील प्रसारमाध्यमांच्या मुख्य प्रवाहात स्वत:ची पारंपरिक ओळख आणि वैशिष्ट्यांसह स्वत:चं स्थान निर्माण केलं आहे. गेल्या २० वर्षांपासून माओरी प्रसारमाध्यमात काम करते. आजवर ती फक्त दुपारच्या बातम्या द्यायची. पण, मागच्या आठवड्यात पहिल्यांदा तिने तिच्या वृत्तवाहिनीवर प्राइम टाइममधे बातम्या दिल्या आणि संपूर्ण जगाचं लक्ष वेधलं.
माओरी जमातीतल्या महिलांची ओळख असलेला ठसठशीत टॅटू हनुवटीवर गोंदवलेल्या ओरिनीने प्राइम टाइममधे आपल्या या “खुणेसकट” प्रवेश केला, हे महत्त्वाचं! स्वतः:च्या हनुवटीवरचा टॅटू न पुसता जगासमोर येण्याची तिची ही कृती महत्वाची ! समाजाच्या मूळ प्रवाहात सामील होण्यासाठी आपली मुळे विसरण्याची गरज नाही या जागतिक भावनेला ओरिनीने एका नवा अर्थ दिला आहे.हा टॅटू म्हणजे मोको काऔ या महिलांची ओळख आहे.
ओरिनीने २०१७मध्ये आपल्या हनुवटीवर हा टॅटू गोंदवला. चार मुलांची आई असलेली ओरिनी मोठ्या आत्मविश्वासाने आपल्या क्षेत्रात वावरते आणि तीही आपली पारंपरिक आणि सांस्कृतिक ओळख घेऊन. हा टॅटू गोंदवण्याची पध्दत आधुनिक काळात इतिहासाच्या पुस्तकापुरतीच सीमित होती.
पण, आपण माओरी आहोत हे दाखवणारी ओळख गोंदवण्याची पध्दत १९९०पासून पुन्हा सुरु झाली. ही पध्दत प्रामुख्याने आपल्याला पुरेसं राजकीय प्रतिनिधित्त्व मिळावं, यासाठी होती. पण ओरिनीने हा टॅटू गोंदवला तो अभिमानानं. आपण आपली ओळख लपवून, सांस्कृतिक खुणा दडपून ठेवण्याचं कारण नाही. आपल्या सांस्कृतिक खुणांमधे आपली ताकद आहे, या शब्दात ओरिनीने आपल्या जमातीतील इतर मुलींनाही प्रेरणा दिली आहे.- माधुरी पेठकर