पोलीस अधिकाऱ्यांचे कामाचे एक सार्वत्रिक तंत्र असते आणि विशेषत: जिल्हा पोलीसप्रमुख पदावरच्या अधिकाऱ्यांमध्ये ते सार्वत्रिक आढळते. म्हणजे नव्या जागी बदली झाली की, आपली ओळख निर्माण करण्याचे काम हाती घ्यावे लागते. मग काही लोकप्रिय गोष्टींची काटेकोर अंमलबजावणी सुरू होते. कोणी हेल्मेटसक्ती करतो. नव्या साहेबांचा आदेश येताच तो झेलायला यंत्रणा तत्पर असते. मग जिल्हाभर या सक्तीची कडक अंमलबजावणी सुरू होते. समजा अशा वेळी एखाद्याकडे हेल्मेट नसेल, तर बिचाऱ्याची पार स्वयंपाकघरातील पातेले डोक्यात अडकवून फिरण्याची तयारी असते.
हेल्मेट नसलेले सावज शोधण्याचा पोलीस आटापिटा करतात आणि असे सावज सापडले, तर त्याला पोलिसी खाक्याला सामोरे जावे लागते. दंडाची पावती, वाहनाची हवा सोडणे, सज्जड दम भरत सोडून देणे, असे प्रकार घडू लागतात, लोकांनाही हेल्मेटची सवय लागते. सक्ती अशीच कायम टिकली तर हेल्मेटची बाजारपेठ वधारते. घरात ते एक आवश्यक वस्तूंच्या यादीत जाऊन बसते. बायकोने सामानाची यादी आणि पिशवी हाती दिली की, हेल्मेट विसरू नका, असा काळजीयुक्त लडिवाळ शब्द कानाला सुख देऊन जातो. म्हणून हेल्मेटची किमया अगाध आहे. हेल्मेट विसरले तर हेच लाडिक शब्द कर्कश होतात आणि सात पिढ्यांच्या धांदरटपणाचा उद्धार होतो.
हेल्मेटची बाजारपेठ वधारल्याने व्यापारी मंडळी नव्या साहेबांवर खुश असतात. घराघरांमध्ये हेल्मेटचे किस्से रंगतात. पोलिसाला पाहून त्याला कसे चुकवले किंवा पकडल्यानंतर हुशारीने कशी सहीसलामत सुटका करून घेतली, अशा फुशारकीच्या शौर्यकथाही कानावर पडतात. विशेष म्हणजे नवे साहेब कसे कामाचे आहेत. सामान्य नागरिकांची कशी काळजी घेतात. त्यांचा पोलीस दलावर कसा वचक आहे, याच्या कथाही प्रसृत होतात. साहेब पिण्याच्या पाण्याची बाटली कशी घरून आणतात. बाईसाहेबांसोबत ते कसे बाजारात तुमच्या-आमच्यासारखे खरेदी करीत होते, अशा ओसंडून वाहणाऱ्या कौतुकाच्या चर्चा रंगतात.
हेल्मेटचे वारे थंडावताच जिल्हाभरातील जुगार, मटका, दारूचे अड्डे याकडे साहेबांचे लक्ष वळते आणि तिकडे प्रचंड गोंधळ उडतो. खेड्यापाड्यांतील मटक्याचे बुकी अदृश्य होतात. कुठेतरी चोरून दारू चढ्या भावाने मिळते. मटक्यावाले परेशान होतात, दारूवाले वैतागतात. सगळ्या जिल्ह्यात गांधी जयंतीसदृश सात्त्विक वातावरण पसरत जाते आणि सामान्य माणूस या सात्त्विक वातावरणात आत्ममग्न होतो. दारूच्या अड्ड्यांवर धाडींचा धडाका सुरू असतो. जुगारींना किरकोळ मुद्देमालासह अटक होते; पण किरकोळ माल हस्तगत झाल्याने ते उजळमाथ्याने पोलीस ठाण्यातून घरी येतात. जप्त केलेली रक्कम इतकी किरकोळ असते की, पोलिसांनी विनाकरण उपद्व्याप केला, असा कळवळ्याचा फील सामान्य माणसाला येतो.
सात्त्विक वातावरणाचा थर बसू लागत असतानाच अवैध वाहनांविरुद्ध कारवाई सुरू होते. बसस्टॅण्डजवळची वाहनांची गर्दी पांगते. स्टॅण्ड ओकेबोके दिसायला लागते. खरे तर अवैध वाहनांचा स्टॅण्डभोवती पडलेला गराडा आपल्या डोळ्यांना मनमोहक वाटत असतो; पण आता गर्दीच नसल्याने बसस्टॅण्डची रयाच जाते. ही वाहने दूर गल्लीबोळांत उभी राहतात. अमुक रस्ता सुरक्षित आहे, अशा त्यांच्यातील सांकेतिक भाषेचा प्रसार वेगाने होतो व ती भाषा प्रवाशांना कळायला लागते. बसच्या बेभरोशीपणामुळे प्रवासी वैतागतात.
आता हे कमी की काय, तर साहेबांची नजर गुटख्याकडे जाते. मग तो पकडायला सुरुवात होते. त्याच्या बातम्या, फोटो वर्तमानपत्रांवाले छापतात. गुटखा मिळत नाही. चोरूनलपून चढ्या भावाने विकला जातो. गुटखा खाणाऱ्यांचा कोंडमारा होतो. तलफ दाबावी लागते. माणसे सकाळी सकाळी हैराण होतात. तंबाखू मळून पाहतात; पण ती ‘किक’ येत नाही म्हणून वैतागतात. गुटख्याला सोन्याचे मोल येते. पुडी असलेला ‘आसामी’ वाटतो. ज्याच्या जवळ स्टॉक तो तालेवारासारखा वागतो. ज्यांना मिळत नाही त्यांची अवस्था अक्षरश: केविलवाणी होते. हा कोंडमारा त्याला सहन होत नाही. असा टप्प्याटप्प्याने जिल्हा सात्त्विक होण्याचा प्रयत्न करतो. प्रत्येक जण एकदुसऱ्याला सज्जन असल्यासारखा वाटायला लागतो.
सज्जनपणाचे हे प्रयोग सार्वत्रिक होऊ लागतात आणि साहेबांचा दरारा वाढतो; पण दुसरीकडे हेल्मेट डोक्यावरून गायब व्हायला सुरुवात होते. गावागावांतून ‘चपटी’ बिनबोभाट मिळू लागते. अवैध वाहनांनी रस्ता भरून वाहतो. मटक्याचे बुकी निवांत चिठ्ठी फाडताना दिसतात. गुटख्याच्या माळा टपरीची शोभा वाढवितात. पोलीस फोर्सला जरा उसंत मिळते. ते ठाण्यात रेंगाळताना दिसतात आणि साहेबही आळसावलेले असतात. त्यांना जिल्ह्याची ओळख पटते आणि जिल्हाही त्यांना ओळखायला लागतो.