जॉर्ज फर्नांडिस यांच्या निधनाचे वृत्त फारसे धक्कादायक म्हणता येणार नाही, कारण अनेक वर्षे ते अंथरुणाला खिळूनच होते. कोणाला ओळखत नव्हते आणि फारसे बोलूही शकत नव्हते. त्यातच स्वाइन फ्लू झाल्याने चार दशके देशात झंझावात निर्माण करणारे वादळ निमाले. जॉर्ज फर्नांडिस केवळ जॉर्ज वा जॉर्जसाहेब म्हणूनच ओळखले जात. केंद्रात उद्योग, रेल्वे, संरक्षण अशा अनेक खात्यांचे त्यांनी काम पाहिले. त्यांनी उद्योगमंत्री म्हणून १९७७ साली कोकाकोला, आयबीएम या बहुराष्ट्रीय कंपन्यांना भारताबाहेर घालविले. उदारीकरणाच्या युगात लोकांना हा प्रकार हास्यास्पद वाटेल, पण तेव्हा खुल्या अर्थव्यवस्थेची नव्हे, तर स्वदेशीचीच भाषा सुरू होती. त्या पार्श्वभूमीवर समाजवादी नेत्याने घेतलेला हा निर्णय होता.कोकण रेल्वेचे स्वप्न बॅ. नाथ पै यांनी पाहिले आणि मधू दंडवते यांनी ती रेल्वे रोह्यापर्यंत नेली, पण तेथून ती पुढे सरकेना. ही रेल्वे कोकणापुरती ठेवल्यास आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य ठरणार नाही, हे लक्षात घेऊन जॉर्जनी ती गोवा, कर्नाटकमार्गे केरळपर्यंत नेण्याचा निर्णय घेतल्याने, ठरल्या वेळआधीच ही रेल्वे धावू लागली. पोखरणचा दुसरा अणुस्फोट झाला आणि कारगिलचे युद्ध जिंकले, तेव्हा जॉर्जच संरक्षणमंत्री होते. पंतप्रधात व्ही. पी. सिंग यांनी काश्मीरमधील बिघडते वातावरण सुधारण्यासाठी काश्मीरसाठी एक अनौपचारिक खाते निर्माण करून ते जॉर्जकडे दिले, पण पंतप्रधानांचे विश्वासू असलेले गृहमंत्री मुफ्ती महमद सय्यद यांच्या अतिरेक्यांशी असलेल्या संबंधांच्या ध्वनिफितीच जॉर्जनी सिंग यांना दिल्या. त्यातून सय्यद यांना दूर करण्याऐवजी व्ही. पी. सिंंग यांनी ते खातेच गुंडाळले. भारताला पाकिस्तानपेक्षा चीनपासून अधिक धोका असल्याचे वक्तव्य करताच, सर्वांनी त्यांच्यावर टीकास्त्र चालविले, पण आज शेजारी राष्ट्रांत घडणाऱ्या घटना पाहता, जॉर्ज यांचा इशारा योग्य होता, हे स्पष्ट होते.कामगार नेता व विरोधात राहूनच राजकारण केलेल्या जॉर्ज यांची मंत्री म्हणूनही कामगिरी ठसठशीतच होती. मात्र, महाराष्ट्र व मुंबईला जॉर्ज यांची ओळख आहे, ती बंदसम्राट म्हणूनच. त्यांनी मुंबईतील महापालिका, बेस्टमधील कर्मचारी, फेरीवाले, टॅक्सीवाले, गुमास्ते, हॉटेल, विविध उद्योग व चित्रपटगृह, एसटी कामगार यांच्या संघटना बांधल्या आणि त्या कामगारांना न्यायही मिळवून दिला. त्यांनी १९७४ साली घडवून आणलेला देशव्यापी रेल्वेसंप तर जगभरात गाजला. त्या २0 दिवसांच्या संपात करोडो प्रवाशांचे हाल झाले. जॉर्ज यांनी इतके संप व बंद केले की, लोक त्यांच्याविषयी चिडून बोलत. तरीही त्यांच्याविषयी प्रचंड आकर्षणही होते. त्यामुळेच १९६७ साली मुंबईचे अनभिषिक्त सम्राट म्हणून ओळखले जाणारे काँग्रेसचे नेते स. का. पाटील यांचा लोकसभा निवडणुकीत जॉर्ज यांनी पराभव केला होता. नगरसेवक असताना जॉर्ज यांनी मुंबई महापालिकेचे कामकाज मराठीतून चालावे, असा आग्रह धरला होता.आणीबाणीत त्यांना अटक झाली बडोदा डायनामाइट प्रकरणामुळे स्व. इंदिरा गांधी यांच्या सरकारला हादरे देण्यासाठी जॉर्ज यांनी अनेक बॉम्बस्फोट घडविण्याचा कट आखला होता, पण ते पकडले गेले. तुरुंगात असून, जॉर्ज यांनी १९७७ सालची लोकसभा निवडणूक बिहारमधून लढविली. ते प्रचंड बहुमताने विजयी झाले. बिगरकाँग्रेसवाद हे राजकारणाचे मूळ असलेले जॉर्ज नंतर मात्र इतके वाहवत गेले की, त्यांनी भाजपाशीच संगत केली. याच जॉर्ज व मधू लिमये यांनी जनता पार्टीतील नेत्यांच्या रा. स्व. संघाशी असलेल्या संबंधांमुळे दुहेरी सदस्यत्वाच्या मुद्द्यावरच मोरारजी देसाई यांचे सरकार पाडले होते. त्यामुळे ते जनतेच्या शिव्यांचे धनीही ठरले, पण या राजकारणामुळे काँग्रेसच सत्तेवर आल्याचे पाहून जॉर्ज यांनी पुढे कायम भाजपाला पाठिंबा दिला, भाजपाला प्रतिष्ठा मिळवून दिली, पण प्रखर समाजवादी विचारांचा नेता म्हणून लोकांत असलेली प्रतिमा मात्र पार धुळीस मिळाली. भाजपाने त्यांना राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे निमंत्रक केले. त्यामुळे त्यांचे समर्थक व कार्यकर्त्यांची राजकीय वाताहात झाली. समाजवादी चळवळ क्षीण होण्याची जी अनेक कारणे आहेत, त्यातील हे कारण अधिक महत्त्वाचे, पण जॉर्ज यांनी त्याची फिकीर केली नाही. ते स्वत:च एक वादळ, झंझावात होते, कसलीच फिकीर न करणारे.
जॉर्ज नावाचा झंझावात
By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2019 5:08 AM