शहरं
Join us  
Trending Stories
1
जिथे BJP विरोधात थेट लढाई, तिथे काँग्रेसचे झाले पानिपत; 75 पैकी 65 जागा गमावल्या...
2
वर्षभरानंतर किंग Virat Kohli च्या भात्यातून आली सेंच्युरी! सर Don Bradman यांना केलं ओव्हरटेक
3
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : 'लोकांना शंका, निवडणुकीला आव्हान दिलं पाहिजे'; असीम सरोदेंनी निकालावर व्यक्त केली शंका
4
"सगळीकडे नाही तर निवडक ठिकाणी EVM हॅक'; महाराष्ट्राच्या निकालावर काँग्रेस नेत्याचे विधान
5
IPL Auction 2025: लिलावात बड्या खेळाडूंवर लागणार 'जम्बो' बोली... पाहा, कोणाकडे किती पैसे शिल्लक?
6
Amol Mitkari : "अजित पवारांप्रमाणे सुप्रिया सुळेंनी औदार्य दाखवावं, अमोल कोल्हेंनी..."; मिटकरींचं टीकास्त्र
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: अवघ्या १६२ मतांनी विजयी होऊन आमदार बनले; AIMIM पक्षानं त्यांची एकमेव जागा राखली
8
'अदानी-मणिपूर प्रकरणावर हिवाळी अधिवेशनात चर्चा व्हावी', काँग्रेसची सर्वपक्षीय बैठकीत मागणी
9
सरवणकर-अमित ठाकरे लढतीत महेश सावंत कशी बाजी मारून गेले? असं बदललं माहिमचं समीकरण
10
Narhari Zirwal : "उपाध्यक्ष पदाचा अनुभव घेतला, आता...."; नरहरी झिरवाळांनी सांगितलं 'मन की बात'
11
रोहित भाऊ ऑस्ट्रेलियात पोहचला; हिटमॅनची एन्ट्री टीम इंडियासह KL राहुलचं टेन्शन वाढणारी; कारण...
12
"बसपा कोणतीही पोटनिवडणूक लढवणार नाही", मायावतींची मोठी घोषणा; कारणही सांगितलं  
13
"कार्यकर्ता लढला, भल्याभल्यांना नडला, पण...", राम सातपुतेंचा रणजितसिंह मोहिते पाटलांवर मोठा आरोप
14
यशस्वी-KL राहुलच्या हिट शोनंतर कोहलीची फिफ्टी! टीम इंडियाची आघाडी ४०० पार...
15
 विधानसभा निवडणुकीत जरांगे फॅक्टर फेल?, महायुतीच्या विजयावर जरांगे पाटलांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: शिवसेना-मनसेच्या विसंवादामुळे उद्धव ठाकरेंचा फायदा; राज ठाकरेंनाही बसला फटका
17
आलिशान घर खरेदी केल्यानंतर विवेक ओबेरॉयने घेतली महागडी कार, झलक दाखवत म्हणाला...
18
देशसेवेचं स्वप्न! लंडनमधली नोकरी सोडली अन् IAS झाली; ७५ वर्षांनंतर गावाला केला पाणीपुरवठा
19
"कठोर परिश्रम अन् समर्पणामुळे ही विजयाची गाथा.."; मराठी कलाकारांकडून 'महायुती'चं अभिनंदन
20
कोण १६२ मतांनी तर कोण २०८ मतांनी विजयी; 'या' जागांवर पाहायला मिळाली चुरशीची लढत!

असल्या सावकारांना कोपरापासून ढोपरापर्यंत सोलून काढा!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2022 6:20 AM

खासगी सावकारांनी तरण्या पोरांना मोटारसायकली आणि पिस्तुलं देऊन पगारावर नेमलंय. लक्ष केवळ व्याजावर. ठरलेल्या वेळी ते आलं नाही की, दट्ट्या ठरलेला !!

-  श्रीनिवास नागे(वृत्तसंपादक, लोकमत, सांगली)

दहा वर्षांपूर्वीची घटना. ‘शेतकऱ्यांना छळणाऱ्या खासगी सावकारांना कोपरापासून ढोपरापर्यंत सोलून काढा’, असा आदेश तत्कालीन गृहमंत्री आर. आर. (आबा) पाटील यांनी दिला आणि सावकारांना कापरं भरलं. पोलीस अधिकाऱ्यांना बळ मिळालं. खासगी सावकारी, त्यातून गावागावांत फोफावलेली गुंडगिरी मोडून काढण्याची सुरुवात सांगली जिल्ह्यातून झाली. एका वर्षातच सावकारीचे ४८ गुन्हे दाखल होऊन १०१ जण जेरबंद झाले. निडर पोलीस अधिकाऱ्यांनी काही टोळ्यांना थेट मोका लावला.  नंतर आबा गेले आणि सावकारांच्या सोललेल्या कोपरा-ढोपरांवर आणखी मांस चढलं. ग्रामीण भागात तर त्यांचा नुसता धुमाकूळ.

राज्यात आज १३ हजार अधिकृत सावकार असून, त्यांच्या कचाट्यात १५ लाखांवर कर्जदार अडकलेत. या परवानाधारकांनी तब्बल १५०० कोटींचं कर्जवाटप केलंय. परवाना नसलेले सावकार तर गल्लीबोळात झालेत. सांगली जिल्ह्यातल्या म्हैसाळमध्ये सावकारांच्या त्रासाला कंटाळून एकाच कुटुंबातल्या नऊजणांनी आत्महत्या केल्याचं नुकतंच पुढं आलंय. या सावकारांत परवानाधारक सावकार जसे आहेत, तसे डॉक्टर, शिक्षक, पोलीसपाटील, बेकरीचालक ते एसटी वाहकांपर्यंतचे छुपे सावकारही आहेत. कर्जदारांत दुष्काळी पट्ट्यातला शेतकरी जसा आहे, तसा सधन, पाणथळ भागातला बागायतदारही आहे. आता तर गब्बर सावकरांनी महिला बचत गटांच्या आडून कर्जपुरवठा सुरू केलाय. 

राष्ट्रीयीकृत आणि खासगी बँकांनी कर्ज देण्यासाठी हात आखडता घेतल्यानंतर नड कशी काढायची, या विवंचनेत मग सगळ्यांना सावकार दिसतो. त्याच्याकडं सुलभ आणि झटपट कर्ज मिळतं. सावकारांच्या कर्जाचा व्याजदर जादा असला तरी ते सहज मिळत असल्यामुळं अडीनडीला परवडतं. परवानाधारक सावकाराचा शेतीकर्जाचा व्याजदर दरमहा नऊ ते बारा टक्के, तर बिगरशेती कर्जाचा व्याजदर जातो बारा ते अठरा टक्क्यांवर! परवाना नसलेल्यांचा दर तर तीनपासून पंचवीस टक्क्यापर्यंत. इथंच गरजू भरडला जातो. मुळात  गावाकडं आर्थिक पत नसल्यानं शेतीची मशागत, खतं-औषधं याशिवाय सणवार, पोरापोरींची लग्नं, मधूनच उद्भवणारं आजारपण, अचानक आलेला खर्च यासाठी सावकाराशिवाय पर्याय नसतो. त्यातच सोसायट्या-बँकांकडून घेतलेली कर्जं फेडता आली नाहीत की, सावकाराकडून उचल घ्यायची आणि फेड करायची. जमिनीचे तुकडे पदरात असलेला शेतकरी कर्जांच्या या फिरवाफिरवीतून घायकुतीला येतो. बागायती-नगदी पिकं हातची गेली की बड्या शेतकऱ्याचीही तीच अवस्था. आधी बँकांच्या आणि नंतर सावकाराच्या तगाद्यामुळं तोंड लपवून फिरावं लागतं. पार नरड्यापर्यंत आलं की फास लावून घ्यायचा किंवा पिकावर फवारायला आणलेलं कीटकनाशक प्यायचं! 

गेल्या पंचवीस-तीस वर्षांत पश्चिम महाराष्ट्रात सहकारी पतसंस्थांचं पेव फुटलं. त्यातल्या काही संचालकांनी थेट सावकारीच सुरू केली. काही बड्या धेंडांनी कर्जं बुडवली, ठेवीदार रस्त्यावर आले. त्याचवेळी छोट्या कर्जदारांच्या मुंडक्यावर बसून वसुलीही केली गेली. त्यातली सत्तर टक्के वसुली या कर्जदारांनी सावकारांकडून उचललेल्या पैशातून झाली! आता तर सावकारीतून गडगंज झालेल्यांनी पतसंस्था, मायक्रोफायनान्स कंपन्याच काढल्यात. अवैध धंद्यांतून मिळवलेला पैसा या नव्या ‘व्हाईट कॉलर’ सावकारीत गुंतवलाय. 

खासगी सावकारांची कर्ज-व्याजवसुलीची पद्धत पठाणी. यांच्याकडं त्यासाठी तगडी फौज कायमच तैनात. कामधाम नसलेल्या तरण्या पोरांना मोटारसायकली देऊन, तर काहींना थेट पिस्तुलं देऊन पगारावर नेमलेलं.  धंदा चालू राहण्यासाठी यांचं लक्ष केवळ व्याजावर. ठरलेल्यावेळी ते आलं नाही की, दट्ट्या ठरलेला. आधी दमबाजी, धमकावणं. नाही जमलं तर अंगावरचं सोनंनाणं, गाड्या, घरातलं किडूकमिडूक उचलून न्यायलाही ते मागंपुढं बघत नाहीत. काहीजणांचा डोळा तरण्याताठ्या पोरीबाळींवर.

 तारण कर्ज कमी, विनातारण कर्जाचं प्रमाण साठ टक्के. तारण म्हणून जमिनी, घरं, जनावरं, दुचाकीपासून लेकीसुनांचे दागिनेही लिहून घेतले जातात. नोटरी करून शंभराच्या स्टँपपेपरवर. विनातारण कर्ज देताना मात्र सगळा भरोसा वसुलीच्या पंटरांवर. सावकारांचा खरा धंदा होतो चक्रवाढ व्याजानं चढणाऱ्या कर्जावर. मुद्दल आणि व्याज फेडूनही दहा-दहापटीनं रकमा उकळल्या जातात. घरं, जमिनी काढून घेऊन सावकारांची नावं चढवली जातात. त्याउपरही तगादा सुरूच, मग ठरलेलंच... कर्जबाजारीपणातून आत्महत्या!

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSangliसांगली