जगातील सर्वांत मोठं आणि सर्वांत पहिलं मनोरंजनाचं साधन कोणतं असेल तर ते म्हणजे चित्रपट किंवा स्क्रिन. अर्थातच त्यात चित्रपटांपासून, टीव्ही सिरिअल्स, ओटीटी प्लॅटफॉर्म्सवरील कार्यक्रम, ऑनलाइन प्रोग्राम्स हे सर्व आलं. राेजच्या धबडग्यातून आपल्याला शांतता मिळावी, थोडी करमणूक व्हावी, रोजची चिंता, काळजी आणि कटकटींतून मुक्तता मिळावी म्हणून अनेक जण चित्रपटांना पहिली पसंती देतात. करमणुकीचा सर्वांत स्वस्त प्रकार म्हणूनही याकडे पाहिलं जातं.
पण भारत असो, अमेरिका असो किंवा जगातला कोणताही देश, त्या त्या देशांतले स्थानिक चित्रपट आणि हॉलिवूड यांचा पगडा तिथे फारच मोठा आहे; पण याच हॉलिवूडवर आता धोक्याची टांगती तलवार आ-वासून उभी आहे. अनेक कलाकार बेकार झाले आहेत. त्यामुळे संसार चालवणं त्यांना अवघड झालं आहे. आज काम आहे, तर उद्या नाही, अशी मोठमोठ्या कलाकारांचीही अवस्था आहे. त्यात अनेक कलाकारांचं वेतन कमी झालं आहे. यात सध्या सगळ्यात जास्त भरडले जाताहेत ते चित्रपट, टीव्ही सिरिअल्स आणि ओटीटी प्लॅटफॉर्म्सवरील कार्यक्रमांचे लेखक. या लेखकांचा मेहनताना तर कमी झाला आहेच; पण कोणतंही प्रॉडक्शन हाऊस त्यांना काम द्यायलाच तयार नाही. लेखकांवर पैसे खर्च करण्याची त्यांची तयारी नाही. त्यामुळे सुमारे दोन महिन्यांपासून हॉलिवूडमधील लेखक संपावर आहेत; पण आज लेखक जात्यात असले तर चित्रपट अभिनेते, कलावंत, त्या क्षेत्रातील इतर मंडळी सुपात आहेत, इतकाच काय तो फरक! लेखकांच्या संपाला आता हॉलिवूडमधील मोठमोठे अभिनेते आणि कलावंतांनीही पाठिंबा दिला आहे. ब्रॅड पिट, मेरिल स्ट्रीप, इवान मॅकग्रेगोर, जॉर्ज क्लूनी, जेनिफर लॉरेंस, चार्लिज थेरॉन, जेमी ली कर्टिस, ऑलिविया वाइल्ड, मार्क रफालो, जोन कसेक यासारख्या दिग्गज कलाकरांचाही यात समावेश आहे. अनेक अभिनेत्यांनी तर जाहीर केलं आहे, संपाच्या काळात आम्ही कोणत्याही चित्रपटाच्या शूटिंगमध्ये किंवा प्रमोशनमध्ये भाग घेणार नाही. ‘अवतार’ आणि ‘ग्लॅडिएटर’सारख्या बड्या चित्रपटांच्या सिक्वलवरही याचा मोठा परिणाम होणार आहे. गेल्या सहा दशकांतला हा सर्वांत मोठा संप आहे. अख्ख्या जगातील मनोरंजन क्षेत्रावर याचा प्रभाव पडेल. पुढील सहा महिने, वर्षभर हा लढा चालला तरी त्यातून ठोस उत्तर मिळेल की नाही, हा संघर्ष थांबेल की नाही, याबाबत तज्ज्ञांमध्ये साशंकता आहे. ‘रायटर्स गिल्ड ऑफ अमेरिका’ (WGA) या संघटनेला स्क्रीन ॲक्टर्स गिल्ड ॲण्ड अमेरिकन फेडरेशन ऑफ टेलिव्हिजन ॲण्ड रेडिओ आर्टिस्ट्स (SAG-AFTRA) या संघटनेनंही पाठिंबा दिल्यामुळे हे क्षेत्रच जणू थंडावलं आहे. चित्रपट क्षेत्रातील हजारो कर्मचारी एकाच वेळी संपावर गेल्यामुळे मनोरंजन क्षेत्राला हादरे बसायला सुरुवात झाली आहे. आताच अनेक टेलिव्हिजन शोज, सिरिअल्स यांचं प्रक्षेपण लांबणीवर टाकण्यात आलं आहे. प्रदर्शनाच्या उंबरठ्यावर असलेल्या अनेक बिग बजेट चित्रपटांना ठरलेली तारीख पुढे ढकलावी लागली आहे. लॉस एंजेलिस येथील नेटफ्लिक्सच्या कार्यालयाबाहेर तब्बल पावणेदोन लाख लेखक, कलावंतांचं धरणं आंदोलन सुरू आहे.
..पण का हे सगळे लोक संपावर गेले आहेत? - आर्टिफिशिअल इंटेलिजन्स म्हणजेच ‘एआय’सारख्या नव्या तंत्रज्ञानानं या लोकांसमोर त्यांच्या अस्तित्वाचाच प्रश्न उभा केला आहे. चॅट जीपीटी, चॅट बॉटसारख्या सुविधा निर्माण झाल्यानं प्रॉडक्शन हाऊसेसना आता लेखकांची गरजच उरलेली नाही. त्यांच्यावर पैसा खर्च करण्याची आता त्यांची तयारी नाही. ‘एआय’च्या मदतीनंच तिथे आता नव्या कल्पना, चित्रपट, सिरिअल्सची स्टोरीलाइन, कथा, डायलॉग, स्क्रिप्ट रायटिंगसारखी अनेक कामं होऊ लागली आहेत. त्यामुळे या कलावंतांना जणू गिग वर्कर्स, रोजंदारी कामगारांचं स्वरूप आलं आहे. काम असेल, जेवढं असेल त्यानुसार पैसे घ्या, काम नसेल तर फुटा! ब्रायन कॉक्स, अभिनेत्री फेलिशिया डे आणि इतरही अनेक अभिनेते, कलावंतांचं म्हणणं आहे, चित्रपट आणि सिरिअल्सच्या स्ट्रिमिंगमध्ये प्रचंड पैसा आहे; पण प्रॉडक्शन हाऊसेसना हा पैसा लेखक, अभिनेत्यांमध्ये वाटायचा नाही. त्यामुळे ते आम्हाला ‘हाकलून’ देण्याच्या मागे आहेत. पैशांअभावी बेघर होण्याची पाळी आमच्यावर आली आहे आणि जगण्याचीही मारामार झाली आहे..
आजचे पैसे घेऊन फुटा! परत येऊ नका!आणखी एक भयानक प्रकार म्हणजे अनेक प्रॉडक्शन हाऊसेसनी बॅकग्राउंड कलाकारांसमोर प्रस्ताव ठेवला आहे, आम्ही तुम्हाला एकदाच ‘स्कॅन’ करू, त्या एक दिवसाचा मेहनताना तुम्हाला देऊ. बस्स. त्यानंतर या कंपन्या ‘एआय’च्या मदतीनं त्या स्कॅनचा उपयोग त्यांना पाहिजे तिथे, हव्या त्या प्रकारे कोणत्याही प्रोजेक्टमध्ये करू शकतील. त्यासाठी त्यांना ना या कलावंताच्या संमतीची गरज असेल, ना त्याला पुन्हा कुठलं मानधन द्यावं लागेल!