मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या यशाचे एक वैशिष्ट्य म्हणजे त्याने कधीही आपल्या टीकाकारांना थेट उत्तर दिले नाही. त्याऐवजी आपल्या खेळावर प्रचंड मेहनत घेऊन कायम बॅटद्वारेच टीकाकारांची तोंडे गप्प केली. नेमकी अशीच कामगिरी भारताची स्टार शटलर पी. व्ही. सिंधू करताना दिसत आहे आणि यामुळेच तिने रविवारी जागतिक जेतेपद पटकावण्यात यश मिळवले.
अनेक स्पर्धांमध्ये जेतेपदाने थोडक्यात हुलकावणी दिल्यानंतर सिंधूला कायम उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. यामुळे टीकाकारांनी मोठ्या प्रमाणात ‘शाब्दिक स्मॅश’ मारत सिंधूच्या खेळीचे ‘विश्लेषण’ केले. सिंधू केवळ अंतिम सामन्यात प्रवेश करू शकते, पण अंतिम सामना जिंकणे तिच्या आवाक्यात नाही, अशा प्रकारची टीका तिच्यावर सातत्याने झाली. सिंधूऐवजी दुसरी कोणती खेळाडू असती, तर नक्कीच तिचे मानसिक खच्चीकरण झाले असते किंवा तिने आपल्यावर होत असलेल्या टीकेचे उत्तरही दिले असते. पण सिंधू अनन्यसाधारण खेळाडू आहे आणि त्यामुळेच तिने आपल्यावरील टीकेकडे दुर्लक्ष करताना केवळ आपल्या खेळातील त्रुटी दूर करण्यावर लक्ष दिले आणि रविवारी सिंधूने साऱ्याच टीकाकारांना गप्प केले.
जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत सिंधूने कमालीची कामगिरी केली आहे. १८व्या वर्षी पहिल्यांदा या स्पर्धेत कांस्य पदक जिंकलेल्या सिंधूने आतापर्यंत या स्पर्धेत तब्बल ५ पदके पटकावली आहेत. विशेष म्हणजे यंदा सुवर्ण जिंकतानाच तिने एका विश्वविक्रमाचीही बरोबरी केली. चीनची माजी आॅलिम्पिक चॅम्पियन झांग निग हिने जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत सर्वाधिक पाच पदकांची कमाई केली आहे. सिंधूने यंदा तिच्या विश्वविक्रमाची बरोबरी केली. २०१३ आणि २०१४ साली कांस्य पटकावलेल्या सिंधूला २०१७ आणि २०१८ साली रौप्य पदकांवर समाधान मानावे लागले होते. ज्या ओकुहाराला नमवून सिंधूने यंदा सुवर्ण पटकावले, त्याच ओकुहाराने २०१७ साली सिंधूला पराभूत करत तिचे ‘सुवर्ण’ स्वप्न धुळीस मिळवले होते. २०१८ साली पुन्हा एकदा सिंधूने या स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली, मात्र त्या वेळी तिच्यापुढे आव्हान होते ते स्पेनच्या कॅरोलिन मारिनचे. याच कॅरोलिनने २०१६ साली रिओ आॅलिम्पिकच्या अंतिम फेरीत सिंधूला नमवले होते. पुन्हा एकदा सिंधूला जागतिक स्पर्धेत चंदेरी यशावर समाधान मानावे लागले होते.
यानंतर मात्र सिंधूने नव्याने तयारी करताना आता सुवर्ण निसटू द्यायचे नाही, अशी प्रतिज्ञाच केली होती. प्रकाश पदुकोण, पुलेल्ला गोपीचंद आणि अपर्णा पोपट या दिग्गजांनंतर भारतीय बॅडमिंटनची सूत्रे किदाम्बी श्रीकांत, एच.एस. प्रणॉय, बी. साईप्रणीत, सायना नेहवाल आणि सिंधू यांनी यशस्वी सांभाळली आहेत. आज या सर्व खेळाडूंच्या दमदार कामगिरीमुळे आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनमध्ये भारत एक बलाढ्य प्रतिस्पर्धी म्हणून ओळखला जात आहे. यातही भारताचा पराभव करायचा म्हणजे सर्वप्रथम सिंधूला रोखणे आवश्यक आहे, अशी मानसिक तयारी करूनच सर्व प्रतिस्पर्धी संघ कोर्टवर उतरतात. कारण कितीही अडचणी आल्या तरी त्याला समर्थपणे सामोरे जात सर्व आव्हाने परतवणारी खेळाडू म्हणून सिंधूची आज ओळख आहे.
‘हे विजेतेपद खास आहे. या विजेतेपदाद्वारे माझ्या क्षमतेवर प्रश्न निर्माण करणाऱ्यांना चोख उत्तर दिले आहे,’ अशी प्रतिक्रिया सिंधूने जागतिक विजेतेपद जिंकल्यानंतर दिली. या एका प्रतिक्रियेतून सिंधूची जिद्द, तिची चिकाटी आणि प्रचंड मेहनत दिसून येते. सातत्याने येत असलेल्या अपयशामुळे खचून न जाता, कशाप्रकारे नव्याने तयारी करावी, हे सिंधूने रविवारी संपूर्ण जगाला शिकवले. तिचा संघर्षमय प्रवास सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. जागतिक स्तरावर अनेक खेळाडूंना सातत्याने येणाºया अपयशामुळे निराश झालेले पाहण्यात आले आहे. पण सिंधू या सर्वांपेक्षा वेगळी आहे हे रविवारी सिद्ध झाले. ‘यंदाच्या जागतिक स्पर्धेतील सुवर्णपदक माझेच आहे,’ अशा दृढ निश्चयानेच सिंधू खेळली आणि तिने आपले लक्ष्य साध्य केले. संपूर्ण स्पर्धेतील सिंधूच्या वाटचालीवर नजर टाकल्यास तिने या स्पर्धेत निर्विवाद वर्चस्व मिळवल्याचे दिसून येईल. एकूणच तिने केलेली तयारी पाहता, यंदा तिला रोखणे कोणालाही शक्य नव्हते याचीच प्रचिती येते. अर्थात यासाठी सिंधूच्या कठोर परिश्रमाला सलाम कराव लागेल.
त्यामुळेच सिंधूच्या या संघर्षमय कामगिरीला दिवंगत कवी हरिवंशराय बच्चन यांच्या काव्यपंक्ती समर्पक वाटतात, ‘लहरोसे डरकर नैय्या पार नही होती, कोशीश करनेवालों की कभी हार नही होती!’- रोहित नाईक । वरिष्ठ उपसंपादक