- डॉ. दीपक शिकारपूर (उद्योजक व संगणक साक्षरता प्रसारक)
कोरोना व्हायरसच्या उद्रेकामुळे जगभरातील काम करण्याच्या पद्धतीवर ‘न भुतो न भविष्यति’ असा परिणाम झाला आहे. त्यामुळे लोकांच्या जीवनामध्ये फार वेगाने बदल घडताना आपण पाहतो आणि अनुभवतो आहोत. कामकाजाच्या नवनवीन पद्धतींचा अवलंब करण्याकडे सर्वच देशांचा कल दिसून येत आहे आणि तो वाढतच जाणार आहे. २०२२ नंतर न्यू नॉर्मल जीवन पद्धती आपल्याला अनुभवायची आहे. ‘वर्क फ्रॉम होम’ हे आवडो वा न आवडो, पण आता अनेकांच्या हळूहळू अंगवळणी पडलं आहे. यामुळे सतत ऑनलाईन असणे हे अनेकांचे वास्तव आहे.
बहुतांश विद्यार्थी दोन वर्षे ऑनलाईन शिक्षण घेत होते. त्यामुळे डिजिटल उपकरणे वापरणं, हा त्यांच्या आयुष्याचा अत्यावश्यक भाग झाला आहे. कोविडच्या काळात विद्यार्थी - निरीक्षण सॉफ्टवेअर अनेक शाळांनी वापरले होते. मोठ्या डेटाबेसमध्ये विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक माहितीचे संकलन आणि त्यानंतरचा वापर (अनेकदा संमतीशिवाय), माहितीचे संरक्षण आणि गोपनीयतेला धोका निर्माण करतो. ही माहिती कशा प्रकारे वापरली जाते, यावर काहीच बंधन नाही. चुकून जर ही माहिती सायबर गुन्हेगारांच्या हाती लागली तर पुढील परिणामांची जबाबदारी कुणाची (शाळेची, पालकांची का विद्यार्थ्यांची) यावर विचार होणे आवश्यक आहे.
सध्या अनेक शाळा काही सेवा देयकांचे सॉफ्टवेअर वापरत आहेत. हे सेवा देयक अनेक प्रकारची माहिती गोळा करत आहेत. (अनेकांचा हेतू स्तुत्य आहे.) शैक्षणिक दर्जा सुधार व विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास डोळ्यासमोर ठेवून अनेक पालक उत्साहाने डिजिटल शिक्षण पद्धतीत सहभागी झाले आहेत. पण भारतात, शैक्षणिक सॉफ्टवेअरच्या नियमनाच्या अनुपस्थितीमुळे शैक्षणिक संस्था व त्यांनी नियुक्त केलेल्या सेवा देयकांच्या सेवेत संदिग्धता, अस्पष्टता आणि माहितीची विषमता निर्माण झाली आहे. गोपनीयता, माहितीची सुरक्षित हाताळणी हे मुद्दे किती शाळा, पालक जागरूकतेने पाहतात? अनेक विकसित देशांत सतत होणाऱ्या हिंसाचाराच्या घटना टाळण्यासाठी, विद्यार्थ्यांची मानसिक स्थिती जाणण्यासाठी आधुनिक तंत्र वापरले जात आहे.
भारतातही जिथे पालकांचे (वेळ नसल्याने) पाल्यावर नियंत्रण नाही तिथे शाळेची जबाबदारी वाढत आहे. आजच्या पिढीला संवादमाध्यमी तंत्रज्ञान अगदी लहानपणापासूनच हाताळण्याची संधी मिळाली आहे. त्यामुळे तरूणांचे इंटरनेट वापरण्याचे प्रमाण खूपच जास्त असते. बऱ्याचदा निव्वळ उत्सुकतेपायी त्यांच्याकडून संशयास्पद साइट्स उघडल्या जातात (ॲन्टिव्हायरसने धोक्याचा इशारा दिल्यानंतरदेखील!) परिणामी त्यांच्या वापरातील संगणकीय प्रणालींमध्ये विविध व्हायरस, मालवेअर, स्पायवेअर घुसवणे सोपे जाते. फेसबुकवरून बदनामी किंवा ऑनलाइन व्यवहारांतील फसवणूक यामध्येही त्यामुळेच अल्पवयीनांचे प्रमाण पुष्कळच आहे. विद्यार्थ्यांवरील ही डिजिटल पाळत अतिशय धोकादायक आहे.