डॉ. एस. एस. मंठा, माजी अध्यक्ष भारतीय तंत्रशिक्षण परिषद
विद्यापीठांमधून आत्महत्येच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. ज्यांचा त्याच्याशी संबंध नाही त्यांनाही अस्वस्थ करणारा हा विषय झाला आहे. २०२२ मध्ये भारतात १,७०,२२४ आत्महत्या झाल्या. त्यापैकी ७.६ टक्के विद्यार्थी होते. २२४८ आत्महत्या परीक्षेत अपयश आल्याने केलेल्या होत्या. ओडिशातील केआयटीमध्ये प्रकृती लामसल या नेपाळी विद्यार्थिनीने छळाला कंटाळून आत्महत्या केली. हेही एक कारण आहेच. विद्यापीठे ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश देतात त्यांच्या मानसिक असंतुलनाबद्दल दरवर्षी वैद्यकीय अहवाल तयार करणे गरजेचे झाले आहे काय? विद्यापीठांनी समुपदेशक नेमावेत काय? विद्यार्थ्यांमधील नैराश्याची कारणे कोणती असतात?
जीव घेण्याच्या किंवा देण्याच्या गोष्टी करणे, घातक अमलीपदार्थ बाळगणे, मृत्यूविषयी बोलणे किंवा लिहिणे, आत्महत्या ही लक्षणे दुर्लक्ष करण्यासारखी नाहीत. महाविद्यालय हे विद्यार्थ्याच्या जीवनातील महत्त्वाचा टप्पा असते. पुष्कळसे विद्यार्थी घरापासून दूर, काही वेळा विद्यापीठातील वसतिगृहात किंवा बाहेर वास्तव्य करतात. अनेकांना त्याची सवय नसते. कुटुंबाकडून त्यांना कमी आधार मिळतो किंवा अजिबात मिळत नाही. स्वातंत्र्याची चव ते नव्यानेच चाखत असतात आणि हे स्वातंत्र्य त्यांच्यावर तणाव निर्माण करते. वर्गात अभ्यासाचे ओझे, वातावरण नवे आणि बाहेर नवी आधार व्यवस्था निर्माण करणे यात त्यांची घुसमट होते. मोठ्या विद्यापीठांमध्ये मिळणाऱ्या तथाकथित स्वातंत्र्यामुळे काही वेळा मद्य किंवा अन्य अमलीपदार्थ सेवनाची संधी त्यांना मिळते. मुले लहरी होतात. आधीच कमकुवत असलेल्या मनावर त्यामुळे ताण येतो. या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणजे आत्महत्येचा धोका वाढतो.
जॉन हॉपकिन्स मेडिसिनने दिलेल्या अहवालानुसार आत्महत्या करणाऱ्यांपैकी बहुतेकांना मानसिक आजार असतात. नैराश्य किंवा अमलीपदार्थांचे त शिकार झालेले असतात. याची सुरुवात एकटेपणातून होते. त्यांना काही वेळा भयानक अनुभवही आलेले असू शकतात. नैराश्य हे आत्मघाताच्या विचारांचे लक्षण असते. प्रत्यक्षात आत्महत्या करण्याचा धोका पुरुषांना अधिक असतो. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये मुलींपेक्षा मुलांमध्ये हे प्रमाण चार ते सहा पट अधिक आहे. मुली सहसा प्राणघातक साधनाचा वापर करत नाहीत.
यशस्वी होण्याचा दबावही भयंकर असतो. अपयश लाजिरवाणे असते, या समजामुळे मनोवस्थेवर आघात होतात. दर तीन महिन्यांनी घेतल्या जाणाऱ्या परीक्षांमध्ये अधिकाधिक यश मिळवत जाणे जणू सक्तीचे असते. कारण त्याची सांगड चांगल्या नोकरीशी घातली गेलेली आहे. वास्तविक प्रवेश परीक्षा, व्यक्तिमत्त्व चाचणी किंवा कामगिरीवर आधारित मूल्यमापन यातून सरसनिरस ठरवले जाते. मग ती पोलिस, बँक भरती असो वा अन्य कुठली. उपलब्ध जागांपेक्षा उमेदवारांची संख्या जास्त असते. गतवर्षी सनदी सेवातील १० हजार जागांसाठी १३ लाख उमेदवारांनी यूपीएससीची परीक्षा दिली. हे आकडे बोलके आहेत. गतवर्षी जेईई मेन परीक्षेला १.२ दशलक्ष विद्यार्थ्यांनी अर्ज केला. २,५०,००० पुढच्या परीक्षेसाठी पात्र ठरले. पैकी फक्त ४०,००० विद्यार्थ्यांना आयआयटीमध्ये प्रवेश मिळाला. जुन्या नामांकित संस्थांत केवळ ५००० विद्यार्थी सामावले गेले. ही परिस्थिती ताणात भर घालणारीच आहे.
परीक्षा पद्धतीत सुधारणा ही काळाची गरज आहे. कामगिरीवर आधारित मूल्यमापनात विद्यार्थ्याला केवळ लेखी परीक्षा, प्रकल्पावर आधारित मूल्यमापन यापेक्षाही प्रत्यक्ष काम करून दाखवावे लागते. ठरावीक निकषांवर स्वयंमूल्यमापनाचा प्रयोगही करता येईल. विषयाची समज विद्यार्थी बोलण्यातून कशी दाखवतात हेही पाहता येईल. एकदा परीक्षा घेण्यापेक्षा विद्यार्थी एखाद्या कामात कसा सहभागी होतो यावर मूल्यमापन करण्याची पद्धत विकसित करता येईल. हे झाले शैक्षणिक व्यवस्थापकाचे काम. पण विद्यार्थ्यांनीही काही गोष्टी केल्या पाहिजेत. गोष्टी वेळच्या वेळी करणे, शारीरिक आणि मानसिक आरोग्य सांभाळणे, पुरेशी झोप, जलपान, अतिरिक्त कॅफिनचे सेवन तसेच जंक फूड टाळणे, व्यायाम, योगासने, संगीत ऐकणे, ध्यानधारणा या गोष्टी विद्यार्थ्यांना करता येतील. सरतेशेवटी सकारात्मक दृष्टिकोनातून तणाव व्यवस्थापन करावयाचे आहे.