आपण भारतीय अति उत्सवप्रिय आहोत. गणपती उत्सव हा दहा दिवसांचा आनंदी उत्सव. पण लोकमान्य टिळकांचा उद्देश बुडीत खात्यात जमा होऊन या उत्सवाचे बाजारीकरण होत गेले. धार्मिकतेतून शुद्धता जाऊन व्यावसायिक स्पर्धा आणि आर्थिक इमल्यांचे राज्य निर्माण होत गेले. चित्रपट क्षेत्रातील एखादा सेलीब्रिटी त्या गणपतीच्या दर्शनाला येऊन गेला की माध्यमांचे कॅमेरे सरसावतात आणि आपल्या प्रिय गणेशभक्तांची भली मोठीच्या मोठी रांग लागते आणि मग भक्तीचे वलय जाऊन त्याला मनोरंजनाचे स्वरूप येत जाते. दुसरी गोष्ट म्हणजे मूर्तीची उंची. जितका जास्त मोठा गणपती तेवढी जास्त गर्दीे. या समाजमनाच्या अज्ञानामुळे चलाख व्यवहारी माणसांचे त्यात फावते व मग मागच्या दरवाजांचे भाव ठरले जातात. हे आता सर्वश्रुत आहे. तिसरी आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे श्रीगणेशाचे विसर्जन. इतक्या अवाढव्य मूर्ती मग विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी भग्न अवस्थेत दिसून येतात आणि मग त्यांचे व्हिडीओ व्हायरल होतात आणि पुन्हा गणेशभक्तांच्या भावना दुखावल्या जातात. यात भावना निसर्गाच्याही आपण दुखावत असतो. प्लास्टरचे ढिगारेच्या ढिगारे जे विरघळू शकत नाहीत, अशामुळे मग प्रदूषण वाढते. यावर तोडगाही निघालाच पाहिजे. म्हणून काही सुशिक्षित मंडळी पुढे आली. मुंबईतील भांडुपच्या युवा फाउंडेशनच्या वतीने शाडूच्या मातीपासून शालेय मुलांना गणपती करून दाखवीत होते आणि विद्यार्थी ते शिकत होते. यामागचे कारण असे होते, प्रत्येक विद्यार्थ्याने स्वत:च्या हाताने गणपती बनवून स्वत:च्या घरी बसवायचा. आकाराने छोट्या असलेल्या गणपतीचे विसर्जन शेजारच्या तलावात करायचे. निसर्गाकडून घेतलेली मूर्तीसाठीची माती निसर्गाला पुन्हा अर्पण करायची; ज्याने प्रदूषण होणार नाही व उंचीचा प्रश्न निकालात निघेल.या उपक्र्रमातील अनेक विद्यार्थ्यांचे मत होते की, श्रीगणेश ही अभ्यासाची देवता असल्याने त्यातून आम्हाला अभ्यासासाठी स्फूर्ती मिळेल. भांडुपच्या युवा फाउंडेशनचे कौतुक करावे तितके थोडेच आहे. -विजयराज बोधनकर
विद्यार्थी आणि गणेश
By admin | Published: September 06, 2016 3:42 AM