महाराष्ट्र शासनाच्या निर्णयामुळे आज ७ नोव्हेंबरला विद्यार्थी दिवस राज्यभर साजरा होणार आहे. उद्या तो देशभर साजरा होईल व कालांतराने तो जगभर साजरा होईल. त्यानिमित्ताने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे जीवन चरित्र लहानपणीच सर्व विद्यार्थ्यांना कळेल. त्यांच्या प्रेरणेतून आदर्श विद्यार्थी घडतील.डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे या जगताचे आदर्श विद्यार्थी होते. ते आजन्म विद्यार्थी राहिले. त्यांचा आदर्श डोळ्यापुढे ठेवून चांगले आदर्श विद्यार्थी घडावेत या भावनेतून विद्यार्थी दिवस साजरा करण्याची मागणी जुनीच आहे. नागपुरात १४ एप्रिल १९९६ ते १४ एप्रिल २००० वर्षापर्यंत डॉ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती समारोह समितीद्वारे विद्यार्थी दिवस साजरा करण्यात येत असे. कालांतराने त्यात खंड पडला. तरीही काही शैक्षणिक संस्था आपल्या शाळांमध्ये विद्यार्थी दिवस उत्स्फूर्तपणे साजरा करीत. परंतु शासन स्तरावर सर्व शाळा महाविद्यालयातून हा दिवस साजरा व्हावा, अशी जनतेतून मागणी होती. त्या संबंधाने मागील १५ वर्षांपासून सरकारांना अनेक निवेदन देऊन झाली परंतु निर्णय झाला नव्हता.विधानसभेत १६ मार्च २०१६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा शाळा प्रवेश दिवस विद्यार्थी दिवस घोषित करण्यात यावा, यासाठी मी औचित्याच्या मुद्याद्वारे सरकारचे लक्ष वेधले. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना त्याचदिवशी या आशयाचे पत्र दिले. जवळपास दीड वर्षे या विषयाला सरकारकडे लावून धरले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची १२५ वी जयंती साजरी होत असताना या निर्णयाला फार महत्त्व होते. शेवटी २७ आॅक्टोबर २०१७ रोजी शासन निर्णयाची गोड बातमी कानावर आली. अनेक वर्षांच्या केलेल्या प्रयत्नांना यश आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या शालेय जीवनाची माहिती घेत असताना ७ नोव्हेंबर १९०० रोजी प्रतापसिंग हायस्कूल राजवाडा चौक, सातारा येथे त्यांचा शाळा प्रवेश झाल्याची माहिती मिळाली. सुभेदार रामजी मालोजी सपकाळ (बाबासाहेबांचे वडील ) हे सैन्यातून महु येथून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी रेल्वे कॉन्ट्रक्टर, सातारा यांच्याकडे खासगी नोकरी पत्करली. त्यानिमित्ताने ते साताºयाला वास्तव्यास आले होते. तेव्हा बाल भीमाचे नाव या शाळेत घातले गेले. तो दिवस अत्यंत महत्त्वाचा ठरला. याच शाळेत त्यांंना वर्गाबाहेर बसविण्यात येत होते. पिण्याचे पाणीही सार्वजनिक ठिकाणी पिण्याची मनाई होती. तरीही त्यांनी निमूटपणे शिक्षण घेतले. जातीवादाचे हे चटके सहन करीत त्यांनी विद्याव्यासंगाला सदैव जपले. त्यातून ज्ञान संपादित करून समाजाची व राष्ट्राची सेवा केली. देशात व जगात समाजाच्या अनेक घटकांचे दिवस साजरे केले जातात. परंतु समाजाचा अत्यंत महत्त्वाचा घटक विद्यार्थी याचा कुठलाही दिवस नाही. आता या घटकाची दखल घेतली गेली आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या हक्काचा दिवस मिळाला आहे. आज देशातील तर उद्या जगातील सर्व विद्यार्थी एकाच धाग्यात गुंफले जातील. विद्यार्थ्यांचा मान-सन्मान होईल, सत्कार होईल. शिक्षकांनादेखील विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यासाठी, त्यांच्या सोबतीप्रमाणे वागण्यासाठी, शिक्षक-विद्यार्थी या नात्यातील तणाव दूर करण्यासाठी एक चांगला दिवस प्राप्त झाला आहे. यामुळे विद्यार्थ्यांना नवचेतना मिळेल.- आ. डॉ. मिलिंद माने, (editorial@lokmat.com)
विद्यार्थ्यांना हक्काचा दिवस मिळाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 07, 2017 3:52 AM