राही श्रु. ग. ज्युनिअर रिसर्च फेलो, जवाहरलाल नेहरू विद्यापीठ, दिल्ली
‘‘आज आपले कितीतरी विद्यार्थिमित्र देशातल्या घटनांबाबत निव्वळ अडाणी आहेत असं दिसतं. ते उच्चशिक्षित होतात; पण त्यांच्या बोलण्यामध्ये इतका बालिशपणा आणि भाबडेपणा दिसतो की, त्यांच्या या अजाणतेपणाबद्दल हळहळ वाटते. जे उद्या आपल्या देशाचं नेतृत्व करणार आहेत, त्या तरुणांना असं बिनडोक बनवण्याचे पद्धतशीर प्रयत्न सुरू आहेत. विद्यार्थ्यांचं मुख्य काम शिक्षण घेणं आहे, हे मान्य; मात्र आपल्या आजूबाजूच्या समस्यांबद्दल माहिती घेणं आणि त्यावर उपाय शोधणं हा शिक्षणाचा भाग नाही का? तसं नसेल तर आपलं शिक्षण केवळ कारकुनी काम शिकण्यासाठीचं आहे, त्याचा दुसरा काही उपयोग नाही. असलं शिक्षण काय कामाचं? काही धूर्त माणसं तुम्हाला म्हणतील, ‘बेटा, तू वाचन कर, विचार कर; पण राजकारणात कशाला पडतोस? एकदा तू शिक्षण पूर्ण केलंस, की मग या देशाला तुझा केवढा मोठा उपयोग होईल!’ अशा सल्ल्यांपासून आपण सावध राहिलं पाहिजे!’’
- पंजाबच्या ‘कीर्ती’ मासिकात १९२८ मध्ये प्रसिद्ध झालेल्या ‘विद्यार्थी आणि राजकारण’ या लेखातला हा तुकडा. लेखक होता एकवीस वर्षांचा भगतसिंग. या क्रांतिकारी तरुणाच्या शब्दांना जवळपास शंभर वर्षं उलटून गेली, तरी ते आपल्याला अजूनही स्पष्ट ऐकू येतात. ‘ज्यांचे कान बंद आहेत, त्यांना ऐकू जायचं असेल, तर आवाजही तेवढा मोठा असावा लागतो!’ हा भगतसिंगचा इशारा भारतातच नाही, तर अमेरिकेतही अजून निनादतो आहे.
गेल्या महिनाभरात आठशेहून अधिक अमेरिकन विद्यार्थ्यांना अटक झाली आहे आणि तरीही विविध विद्यापीठं आणि कॉलेजांमध्ये विद्यार्थ्यांच्या आंदोलनांचा जोर मुळीच कमी झालेला नाही. गेल्या काही महिन्यांमध्ये इस्रायलच्या जीवघेण्या हल्ल्यांनी कोलमडलेल्या पॅलेस्टाइनमधली स्थिती पाहून जग थिजून गेलेलं असताना या विद्यार्थ्यांनी आवाज उठवला आहे. अमेरिकेने जगाच्या विविध भागांवर आपली टाच राहावी म्हणून जिथे त्यांना सोयीचं आहे, तिथे युद्ध आणि नरसंहारांच्या आगीत तेल ओतलं आहे. या आंतरराष्ट्रीय वर्चस्वाच्या राजकारणात मुसलमानांविषयी सर्वत्र दहशत आणि द्वेष पसरवणं हा अमेरिकेच्या राजकारणाचा महत्त्वाचा भाग! याच अप्पलपोट्या राजकारणापायी आज एकविसाव्या शतकातला सर्वांत भीषण असा नरसंहार जग पाहतं आहे आणि हे होत असताना आम्ही शांतपणे पाहत राहू शकत नाही, असं अमेरिकन विद्यार्थी म्हणत आहेत.
“आमची विद्यापीठं खासगी कंपन्यांप्रमाणे गुंतवणुकी करतात. या गुंतवणुकींमधून गाझामध्ये नृशंस हिंसा करण्यासाठी इस्रायलला पैसा मिळतो. आमच्या फीचे पैसे हे तुमच्या युद्धाचं भांडवल नाही. तुमच्या गुंतवणुकींची माहिती सार्वजनिक करा आणि इस्रायलकडे जाणारा पैसा तातडीने थांबवा,’ अशी या विद्यार्थ्यांची मागणी आहे.
स्टारबक्स आणि मॅकडोनाल्डसारख्या अमेरिकन कंपन्यांनी इस्रायलला पैसा पुरवल्याची माहिती पुढे येताच तिथे नियमितपणे जाणाऱ्या विद्यार्थ्यांनी या कंपन्यांवर बहिष्कार घातला. या संघटित ताकदीमुळे यातल्या बऱ्याच कंपन्यांच्या शेअर्सवर परिणाम झाला. विद्यापीठं असोत नाहीतर कॉफीची दुकानं, तिथून तयार होणारा नफा युद्ध चालवण्यासाठी वापरला जाणार असेल, तर त्यांना ते ताबडतोब थांबवावं लागेल, हाच स्पष्ट संदेश विद्यार्थी देत आहेत. ‘हो, आम्ही हे सरकार निवडून दिलं; पण जर हेच नेते एका विशिष्ट समुदायाविषयी द्वेष पसरवत असतील, तर आम्ही गप्प बसणार नाही!’ असं सांगणारे या आंदोलनांमधले फलक मोठे बोलके आहेत. अर्थात, तरीही अमेरिकन राष्ट्राध्यक्ष त्यांच्या विद्यार्थ्यांना ‘आंदोलनजीवी देशविघातक शत्रू’ म्हणत नाहीत!
हे चित्र पाहताना आपल्या देशाचा गेल्या दशकाचा इतिहास पाहिल्यावाचून राहवत नाही. जो भारत एका देशव्यापी आंदोलनातून जन्माला आला, त्या देशामध्ये आंदोलनं आणि आंदोलकांना सरकार आणि माध्यमांनी पुन्हा पुन्हा हिणवलं आहे. रोहित वेमुलाच्या मृत्यूनंतर देशभर उसळलेलं आंदोलन असो किंवा सीएए-एनआरसीच्या विरोधातली आंदोलनं असोत, विद्यार्थी रस्त्यावर आले, तेव्हा तेव्हा काही लोकांनी विद्यार्थ्यांना ‘आपल्या अभ्यासाकडे लक्ष’ देण्याविषयी सूचना करायला सुरूवात केली. भगतसिंगने याच ‘धूर्त सल्ल्या’पासून सावध राहण्याचा इशारा विद्यार्थ्यांना दिला होता. ‘शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा’ या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दाखवलेल्या मार्गावरून चालणाऱ्या विद्यार्थ्यांवर विद्यमान सरकार आणि प्रशासनाने पुन्हा पुन्हा हल्ले केले आहेत.
एकीकडे केवळ स्वतःपुरता विचार करून झापडं लावून करिअर घडवण्याचे धूर्त सल्ले आणि दुसरीकडे आवाज उठवला तर काय होईल, याची प्रचंड दहशत, या कात्रीत आपल्या देशातला एक मोठा तरुणवर्ग बधिर होऊन बसला आहे. हा बधिरपणा इतका गंभीर आहे, की शिक्षणाची पातळी कितीही घसरली, उच्चशिक्षित बेरोजगारीने कितीही उच्चांक गाठले तरीही या झोपेतून जाग येत नाही. उलट ‘आमचा आणि राजकारणाचा काही संबंध नाही’ ही अभिमानाने सांगायची गोष्ट वाटू लागते! ज्यांना आपल्याच गंभीर परिस्थितीची जाणीव होत नाही, त्यांना गाझा पट्टीतल्या लहान मुलांच्या डोळ्यांतले अश्रू काय दिसणार?
आज भारतामध्ये वय वर्ष पस्तीसपेक्षा कमी वय असणाऱ्यांचं प्रमाण ६५ टक्क्यांपेक्षा जास्त आहे. तेव्हा तरुणांनी ठरवलं तर देशाची चाकं फिरू शकतात. आपल्या मनातला स्वप्नलोक वास्तवात उतरवणं, ही जशी प्रेमाची व्याख्या आहे तशी राजकारणाचीही! म्हणूनच जगभरातले तरुण पुन्हा पुन्हा म्हणतात- ‘करेंगे पॉलिटिक्स, करेंगे प्यार, जुलमी सत्ता खबरदार!’