कोणत्याही खेळाडूने जेतेपद पटकावले की त्याच्या खेळातील सातत्याची कायम चर्चा होते. मुळात जेतेपद पटकावल्यानंतर ते टिकवून ठेवणे हेच मोठे आव्हान असते. भारताच्या वैयक्तिक खेळातील खेळाडूंचा विचार केल्यास अशा बाबतीत विश्वनाथन आनंद, पंकज अडवाणी, पी. व्ही. सिंधू, सायना नेहवाल, लिएंडर पेस अशा खेळाडूंची नावे आघाडीवर घेता येतील. क्रिकेटमध्ये सध्या विराट कोहलीचे नाव सातत्यपूर्ण कामगिरीसाठी सर्वांत आघाडीवर आहे. असेच सातत्य राखून आज देशभरात आपली स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करण्यात मुंबईच्या सुनीत जाधवला यश आले आहे. शरीरसौष्ठवसारख्या महागड्या आणि अत्यंत कठीण अशा खेळामध्ये त्याने सलग पाचवेळा ‘महाराष्ट्र श्री’ किताब पटकावला. विशेष म्हणजे आता २३-२५ मार्चला तो पुण्यात सलग तिसºयांदा ‘भारत श्री’ पटकावण्यास सज्ज होईल.कोणत्याही खेळातील प्रतिष्ठेच्या स्पर्धेत सलग पाच वर्षे जेतेपद पटकावणे सहजसोपी गोष्ट नाही आणि शरीरसौष्ठवसारख्या खेळात तर अजिबात नाही. एका सर्वसामान्य कुटुंबातून पुढे आलेल्या सुनीतने आर्थिक अडचणींना तोंड देत आपला ठसा उमटविला. या खेळासाठी सर्वप्रथम त्याला आपल्या कुटुंबीयांच्या विरोधाला सामोरे जावे लागले. सुरुवातीच्या काळात विभागीय स्पर्धांमध्ये यश मिळविल्यानंतर त्याने राज्यस्तरीय स्पर्धांमध्येही आपले वर्चस्व राखले; यानंतर मात्र त्याने मागे वळून पाहिले नाही. स्पर्धा कोणतीही असो एका बाजूला सुनीत आणि एका बाजूला इतर सर्व प्रतिस्पर्धी खेळाडू असे एक समीकरणच तयार होऊ लागले. ठरविलेले लक्ष्य गाठण्याचा तुमचा निर्धार पक्का असेल आणि त्यासाठी कठोर परिश्रम करण्याची तयारी असेल, तर तुम्हाला यशापासून कोणीही रोखू शकणार नाही, असा संदेश सुनीतने आज आपल्या कामगिरीतून युवा खेळाडूंना दिला आहे. आज अनेक शरीरसौष्ठवपटू असे आहेत जे यश मिळविल्यानंतरही आर्थिक बाजू सक्षम नसल्याने खेळ सोडतात. सुनीतनेही अशाच परिस्थितीला तोंड दिले आहे. पण त्याने कधीही खेळ सोडण्याचा निर्णय घेतला नाही. यासाठी त्याने अनेक ठिकाणी अर्धवेळ नोकरी केली, अतिरिक्त वेळ व्यायामशाळेत घालवून दुसºयांना टेÑनिंग देत स्वत:चाही सराव केला. सुनीतने कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्या शरीरयष्टीकडे दुर्लक्ष केले नाही. त्यामुळेच आज आपल्याला सलग पाचव्या वर्षी तो ‘महाराष्ट्र श्री’च्या रूपाने कायम दिसला. हीच मेहनत तो यापुढेही कायम ठेवेल यात शंका नाही; आणि याच जोरावर आता आपल्यापुढे सलग तिसºयांदा ‘भारत श्री’च्या रूपाने सुनीत दिसेल.
यशाचा चढता आलेख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 03, 2018 4:50 AM