- नंदकिशोर पाटीलआज सीएमचा मूड काही ठीक दिसत नव्हता. नेहमीच्या हसतमुख चेह-यावर रात्रभरच्या जागरणानं डोळ्यांभोवती काळी वर्तुळ आली होती. समोर टेबलावर बशीत ठेवलेली बिस्कीटं, काजू, बदाम, किसमिस आणि गरमागरम समोसे, वेफर्स तशीच होती. शिपायानं आणून ठेवलेला वाफाळलेला चहादेखील थंड होऊन गेला होता. ‘सीएम’ चिंतेत दिसत आहेत, हे एव्हाना कॅबिनेटच्या लक्षात आलं होतं. प्रत्येक जण एकमेकांना खुणेनंच विचारत होता, ‘काय झालं?’ आणि उत्तरही खुणेनंच येत होतं, ‘माहिती नाही!’ ‘सीएम’ सतत मोबाईलवर कुणाला तरी विचारत, ‘कुठंवर आलंय?’ पलीकडे कोण होते माहीत नाही. कॅबिनेटची वेळ झाली तसे दादा म्हणाले, ‘चला सुरू करूया’. त्यावर सीएमनी नुसतीच मान हलवली. मग कॅबिनेट सचिवांनी विषय पत्रिका पटलावर ठेवली. सीएमनी पुन्हा मोबाईल कानाला लावला. ‘कुठंवर आलंय?’ पुन्हा तोच प्रश्न! दादांनी खड्ड्यांचा विषय काढताच ‘ते जाऊ द्या हो खड्ड्यात’ म्हणत सीएमनी रागाने फाईल आपटली. सगळी कॅबिनेट चिडीचूप. तितक्यात धापा टाकत सदाभाऊंची एन्ट्री झाली. त्यांच्या हातात कसला तरी झाडपाला होता. सीएमनी न बोलता फक्त घड्याळाकडं बघितलं. हा इशारा काफी होता. ‘त्येचं काय झालं...’ सदाभाऊ सांगू लागले. तेवढ्यात सीएमनी पुन्हा फोन कानाला लावला. ‘कुठवर आलंय?’ पुन्हा तोच प्रश्न! ‘गड्या हो, लई मोठ्ठं संकट आलंया...अख्खं शिवारच्या शिवार करपून गेलंय... हे जित्राब कुठून आलंय त्येच कळंना...’ सदाभाऊ काकुळतीनं सांगण्याचा प्रयत्न करत होते. पण कोणाचंच लक्ष नव्हतं. तेवढ्यात सीएमचा मोबाईल ब्लिंक झाला. आलेला एसएमएस वाचून सीएम एकदम फ्रेश झाले. ‘सुटलो बुवा एकदाचे. संकट गुजरातकडं सरकलं!’दादांनी उत्सुकतेनं विचारलं, ‘कसल संकट?’ सीएम म्हणाले, ‘ओखी वादळाचं!!’ उत्तर ऐकून कॅबिनेटचा जीव भांड्यात पडला अन् सदाभाऊंनी कॅबिनेटला दाखवण्यासाठी आणलेली बोंडअळीनं करपलेली कपासी तशीच खिशात ठेवून दिली!!
कॅबिनेटमधील अळीमिळी अन्...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2017 4:12 AM