- अपर्णा वेलणकर(फीचर एडिटर, लोकमत)
इन्फोसिस फाउण्डेशनच्या अध्यक्ष, ख्यातनाम लेखिका आणि भारतातील सर्वाधिक श्रीमंतांच्या यादीत नाव असलेल्या सुधा मूर्ती रस्त्यावर ताज्या भाजीचे देखणे दुकान मांडून बसल्या आहेत.. साधा सुती सलवार-कमीज घातलेल्या सुधाताई हसतमुखाने भाजी विकत आहेत.. असा एक फोटो गेले दोन दिवस समाजमाध्यमांमध्ये वेगाने ‘व्हायरल’ झाला. मागोमाग जाणकारांनी केलेले ‘फॅक्ट चेक रिपोर्ट’सुद्धा आले. ते रिपोर्ट्स सांगतात, की हा फोटो चार वर्षांपूर्वीचा आहे आणि सुधाताई भेंडी-भोपळे-काकड्यांच्या गराड्यात दिसत असल्या तरी त्या भाजी विकायला बसलेल्या नसून बंगलोरमध्ये त्यांचे निवासस्थान असलेल्या जयानगर परिसरातल्या राघवेंद्र स्वामींच्या मठाबाहेर बसून त्या साधकांच्या भोजनासाठी आलेल्या भाज्यांची विगतवारी करत आहेत. कारण त्या ‘स्टोअर मॅनेजर’ म्हणून मठात ‘सेवा’ देत आहेत.
या मठात दरवर्षी तीन दिवसांचा ‘राघवेंद्र आराधना महोत्सव’ होतो. त्या महोत्सवात सेवा देण्यासाठी सुधा मूर्ती भल्या पहाटेच मंदिरात जातात. तिथे स्वच्छतागृहांच्या सफाईपासून साधकांच्या स्वयंपाकाची तयारी, भाज्या चिरणे, भांडी घासणे अशी सर्व प्रकारची कामे करतात आणि नऊच्या सुमारास पुन्हा आपल्या कार्यालयात परतून आपल्या नेहमीच्या कामाला लागतात. स्वत:च्या मना-स्वभावाला कुठल्याही प्रकारचा अहंभाव चिकटला असेल, तर तो गळून जावा म्हणून राघवेंद्र स्वामींच्या मठात सेवा देण्याचे काम आपण दरवर्षी करतो, असे सुधातार्इंनी स्वत:च एका मुलाखतीत सांगितले असल्याचा दाखलाही कुणीतरी ट्विट केला. राघवेंद्र मठाच्या अधिकाऱ्यांनीही ‘फोटोत दिसतात त्या सुधा मूर्तीच असून, त्या मठासाठी स्टोअर मॅनेजरची जबाबदारी पार पाडताना भाज्यांची देखरेख करत आहेत’, असा निर्वाळा दिल्याचीही बातमी मागोमाग आली.
सध्या अत्र-तत्र-सर्वत्र सगळाच ‘सोशल-चिखल’ उडत असताना अचानक समोर आलेला हा निर्मळ फोटो एक सुखद दिलासा ठरला, हे मात्र खरेच ! सुधा मूर्ती या इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांच्या पत्नी आणि इन्फोसिसच्या महत्त्वाच्या भागधारक. सध्याची त्यांची व्यक्तिगत संपत्तीच काही हजार कोटी रुपयांच्या घरात असल्याचा तपशील उपलब्ध आहे... पण ही सुधा मूर्ती यांची खरी ओळख नव्हे ! १९९०च्या दशकात वेगाने उदयाला आलेल्या आणि कोणतीही पूर्वपुण्याई, वाडवडिलांचा सांपत्तिक/औद्योगिक वारसा नसताना केवळ स्वत:च्या बुद्धिमत्तेच्या जोरावर मोठी साम्राज्ये स्थापन करून यशवंत-कीर्तिवंत-धनवंत झालेल्या भारतीय मध्यमवर्गाचा अग्रणी चेहरा कोणता असे विचारले, तर त्याच्या उत्तरात ‘इन्फोसिस’चा समस्त परिवार येईलच. त्यातही अग्रभागी असेल ते अर्थातच मूर्ती दांपत्य!
प्रचंड धनसंचय म्हटला म्हणजे भारतात गृहीतच धरले गेलेले व्यक्तिगत डामडौलाचे, पेज-थ्री दर्जाच्या चैनचंगळीचे, अति-वैभवशाली जीवनशैलीचे, तामझाम आणि छुप्या मगरुरीचे निकष पहिल्यांदा उतरवून ठेवले ते टाटा कुटुंबाने ! अर्थात, टाटांसारखी मोजकी अभिजात कुटुंबे खानदानी रईस ! नारायण आणि सुधा मूर्ती हे दोघेही कनिष्ठ मध्यमवर्गीय. प्रियाराधनाच्या काळात दोघांसाठी दोन कॉफी आॅर्डर करणेही ज्यांना परवडत नसे असे जोडपे. त्यांनी इन्फोसिसचा पसारा मांडला तो प्रचंड वेगाने बदलत्या काळातली बौद्धिक आव्हाने अंगावर घेण्याची प्रचंड जिजीविषा अंगी होती म्हणून ! काळाने साथ दिली म्हणूनही ! त्यातून कंपनी उभी राहिली. त्या उलाढालीतून कधी कल्पनाही केली नव्हती असा पैसा आला!!
- पैसा आला, मागोमाग ‘स्थान’ आले, ‘जागतिक प्रतिष्ठा’ आली; पण यातले काहीही मूर्ती दांपत्याला ‘चिकटू’ शकले नाही, याचे कारण त्या दोघांनी जिवापाड जपलेली आणि कल्पनेपल्याड आर्थिक ऐपत बदलत गेली तरी सहजतेने कायम राखलेली जीवनमूल्ये! भारतातील नव-मध्यमवर्गाच्या यशाच्या कहाण्या पहिल्या नवलाईने सांगितल्या जात तेव्हा नारायण मूर्ती इन्फोसिसच्या कॅफेटेरियामध्ये लंच अवर सुरू असताना इतर कर्मचाऱ्यांच्या रांगेत कसे आपले ताट घेऊन शांतपणे उभे असतात, अब्जाधीश असूनही छोट्या जुन्याच घरात राहातात, त्यांच्या घरी नोकरचाकर नाहीत, सुधा मूर्ती वर्षातून दोनच साड्या कशा घेतात याचे वर्णन केले जात असे. नंतर सुधा मूर्ती यांनी अचानक आयुष्यात आलेल्या पैशाबरोबरचे आपले नाते आपण कसे विचारपूर्वक बांधत नेले याबाबत विस्ताराने लिहिलेही.
आपण मध्यमवर्गात वाढलो; पण आपली मुले समृद्धीत वाढत होती, त्या वाढीच्या वयात त्यांना श्रमाचे मूल्य समजावे, म्हणून आपल्याला कसे झगडावे लागले, याहीबद्दल सुधाताई सतत मोकळेपणाने बोलत असतात. पुढे ‘इन्फोसिस फाउण्डेशन’ स्थापन करून त्यांनी आपल्या कमाईतला मोठा हिस्सा समाजोपयोगी कामांकडेच वळवला. हे जोडपे त्या अर्थाने जागतिकीकरणोत्तर भारताचे ‘कॉन्शस कीपर’ आहे असेच म्हटले पाहिजे. - पण दुर्दैव हे, की मूर्ती दांपत्यासारख्यांनी ‘निर्माण केलेल्या’ संपत्तीतला आपला वाटा उचलायला जीवतोड कष्ट केलेल्या भारतीय मध्यमवर्गाने त्यांची मूल्ये मात्र समाजमाध्यमात कौतुकाच्या पोस्टी पाडण्यापुरतीच वापरली ! नाहीतर घरात आलेल्या पैशाआधी मनात शिरलेली उपभोगाची हाव, मगरुरी आणि बेफिकीर अप्पलपोटेपणा हा भारतीय नवमध्यमवर्गाचा स्वभाव बनता ना ! फोटो जुना का असेना, भाजीच्या गराड्यात बसलेल्या सुधातार्इंच्या डोळ्यातले निखळ, निर्भर सुख आपण कुठे गमावले, हे शोधायचे तर हा हिशेब मांडावा लागेलच !