- सुधीर गाडगीळ (ख्यातनाम लेखक, संवादक)
मराठी चित्रसृष्टीच्या इतिहासात, मराठी मनावर अधिराज्य गाजवलेले संगीतकार सुधीर फडके. ‘जगाच्या पाठीवर’, ‘लाखाची गोष्ट’, ‘सुवासिनी’, ‘ऊन-पाऊस‘, ‘प्रपंच..’ अशा गाजलेल्या चित्रपटांतील त्यांची गाणी अनेकांच्या ओठांवर रेंगाळलेली. ती गाणी गुणगुणतच रसिकांच्या तीन पिढ्या वाढल्या आणि ‘आपणही गाऊ शकू’ हा आत्मविश्वास, बाबूजींच्या सोप्या सुरावटींनी दिला.एखादी कला, तत्त्वनिष्ठ विचार, छंद जोपासायचा म्हणजे त्यात स्वत:ला संपूर्णपणे झोकून द्यायचं याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे बाबूजी ऊर्फ सुधीर फडके. बालगंधर्व आणि हिराबाई बडोदेकर हे बाबूजींचे आदर्श, तर ‘सावरकर’ हे दैवत. वाल्मीकीची प्रतिभा लाभलेल्या ग. दि. माडगूळकरांशी आणि त्यांच्या शब्दांशी बाबूजींचे सूर विशेष जुळले. स्वत: माडगूळकर आपल्या या सुरेल सहकाऱ्याबद्दल बोलताना म्हणाले होते, ‘पाखरू पंख घेऊन जन्माला येतं, तसं बाबूजी गाणं घेऊनच जन्माला आले आणि आयुष्यभर रसिकांना सुरांच्या हिंदोळ्यावर झुलवत राहिले.’बाबूजींच्या दादरच्या शिवाजी पार्कच्या घरी जाण्याचा योग पन्नास वर्षांपूर्वी पत्रकारिता करत असताना अनेकदा आला. बहुतांशी वेळेला लेंगा, हाफ गुरू शर्ट या वेषात ते असत. ‘जेऊनच जायचं’ असा आग्रह धरत. मूळ अरुणाचलच्या, ‘लेकी फुन्सो’ (दीपक) नावाच्या विद्यार्थ्याला त्यांनी आपल्या घरी सांभाळलं होतं. तो त्यांचा मानसपुत्र आता तिकडे वरिष्ठ अधिकारी आहे. बाबूजींच्या संस्कारांमुळे उत्तम मराठी बोलतो.मराठी भाषेचं, साहित्याचं, संस्कृतीचं अविभाज्य भाग बनलेलं महाकाव्य गीतरायामण. ते १९५५ सालीच स्वरबद्ध करून, रसिकांच्या मनात त्यांनी रूजवलं. वीर सावरकर चित्रपटाची निर्मिती निष्ठेनं केली. आशाताई मला म्हणाल्या होत्या, ‘शब्दांचं नेमकं शब्दोच्चारण माझ्याकडून घडवून घेणारे बाबूजी. ‘जीवलगा’मध्ये तर प्रत्येक कडव्याला वेगळ्या रागात गाण्याचं आव्हान त्यांनी मला दिलं होतं.’ अमराठी लोकांनीही डोक्यावर घेतलेलं बाबूजींच गाणं म्हणजे ‘ज्योती कलश छलके’ आणि ‘खुश है जमाना आज पहली तारीख है’. दरमहा एक तारखेला सादर होणारं बाबूजींचं हे गाणं, त्यांची आठवण जागती ठेवेल. (समाप्त)