कांदा आता उत्पादकांनाच रडवत आहे, भाजीपाल्याचे दर उतरले आहेत, डाळी उतारावर आहेत पण साखर मात्र कडू होण्याच्या बेतात आहे. यंदा सारखेचे उत्पादन कमी होणार हे स्पष्ट असल्याने त्याचा परिणाम लगेच बाजारावर दिसून येत आहे. एका अहवालानुसार भारतात या वर्षी साखरेचे उत्पादन कमी होऊन ती आयात करावी लागणार आहे. जगात साखर उत्पादनात भारत दुसऱ्या क्रमांकावर असून सलग दोन वर्षे दुष्काळ पडल्याने ऊसाचे क्षेत्र कमी झाले व उत्पादनावर परिणाम झाला. दुष्काळामुळे ३.७ दशलक्ष टन उत्पादन घसरले आहे. जागतिक पातळीवर खांडसरीची किंमत ३० टक्यांनी वाढल्याने भाववाढीला ते सुद्धा एक कारण आहे व त्याचाही साखर उत्पादनावर परिणाम होईल. चालू वर्षांत देशाची साखरेची गरज २६ दशलक्ष टनांची आहे. ऊसाचे क्षेत्र आणि अपेक्षित उत्पादन याचा ताळेबंद ३०.६ दशलक्ष टनाचा मांडला गेला असला तरी कागदावरची आकडेवारी प्रत्यक्षात उतरवणे हे अवघड काम आहे. कारण प्रत्यक्ष लागवड आणि तिची सरकारी नोंद यात कमालीची तफावत असते. परिमामी उत्पन्नाचा अंदाज हमखास कोलमडतो. अर्थात भाववाढीचे हे एकच कारण नसते. देशात या वर्षीं टमाटे आणि बटाट्याचे उत्पादन भरघोस होणार असा सरकारी अंदाज आहे; पण अगदी नावापुरती टंचाई असतानाही त्यांचे भाव वधारले. हा खेळ बाजारातील खेळीयांचा व तो प्रत्येक उत्पादनात असतो. जगाचा विचार करता आशिया खंडातील परिस्थिती प्रतिकूल दिसते. ‘अल निनो’च्या प्रभावामुळे दुष्काळाने चित्र बिघडवले आणि उत्पादनात तूट निर्माण झाली. तिकडे युरोप आणि ब्राझीलमध्ये अनुकूल स्थिती असली तरी साखरेची जागतिक तूट ही साडे पाच दशलक्ष टनांची असेल. महाराष्ट्राचा विचार केला तर गेल्या वर्षी ८.४१ मेट्रीक टन साखरेचे उत्पादन झाले होते. ते या वर्षीं ५.३ टन होईल असा अंदाज आहे. ही घसरण अटळ आहे. २०१०-११ आणि ११-१२ मध्ये नऊ मेट्रीक टन उत्पादन होते; पण पुढील चार वर्षे ७.९१, ७.४७, ८.४१ आणि २०१५-१६ मध्ये ५.३० मेट्रीक टन अशी घसरण होत गेली. दोन वर्षांच्या दुष्काळाने शेतीतील ऊस मोडला त्यामुळे क्षेत्र कमी झाले. आजारी, कर्जबाजारी साखर कारखाने हा सुद्धा महत्त्वाचा घटक आहे. साखरेचे जागतिक भाव गेल्या चार-पाच वर्षांपासून पडल्यामुळे साखर स्वस्त होती आणि त्याचा फटका ऊस उत्पादकांना बसला. ऊसाचे क्षेत्र कमी होण्याचे हेसुद्धा एक कारण आहे. सणासुदीचे दिवस आले आहेत; साखरेची मागणी वाढणार व त्यात हा भाववाढीचा फटका अनिवार्य दिसतो. साखरेच्या गोड कहाणीचे दिवस पुढील काही काळासाठी तरी संपले हेच खरे.