नमस्कार मुख्यमंत्री भाऊ, आमी ऊसतोड कामगार महिला. ऊसतोड कामगारांमध्ये आम्हा बायांचं प्रमाण निम्म्यापेक्षा जास्त अन् कामाचा वाटाबी निम्म्यापेक्षा जास्त. आता बाई म्हनल्यावर घरकामाचा बोजा बी असतोच की, तो कुठे सरत न्हाय. भाऊ, आमच्याकडं ‘वावर पन न्हाय अन् पावर पन न्हाय’, तरी एक बाई म्हणून ऊसतोडीचं काम करताना जो त्रास भोगावा लागतोय त्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री म्हणून तुम्हास्नी सांगाव म्हणून हे पत्र लिव्हतोय.
साखर कारखाने आणि शासनाच्या नजरेत आमी माणूस न्हाई का? वर्षातील जवळपास ६ महिने नवीन गावात एका साध्या १०/१० च्या खोपीत राहतो. तिथे न पाण्याची सोय ना शौचालयाची. ऊसतोडीच्या काळात पाऊस पडला तर सोबतचं सगळं अन्न-धान्य पण पावसामुळे खराब होतंय. बरं त्या ६ महिन्यांत आमच्या गावातलं आमच्या हिश्श्याचं रेशनबी मिळत नाई. आमी काय खावं, कसं जगावं? आमचा दिस पाटे तीनलाच सुरू होतो. आमी तोडलेल्या उसाची मोळी बांधतो अन् गाडी आली की तेच्यावर टाकतो. एक मोळी ४०-५० किलोची असती. गाडी किती बी वाजता आली तरी भरून द्यायलेच लागते. गरोदर बायाले बी तसंच सिढीवर चढून गाडी भराव लागते आणि लय बारीला तर उतरताना दोरी पकडून खाली उडी टाकाय लागते. आमाले नवव्या मैन्यापर्यंत काम कराया लागतं. बाळंतपणाच्या सातव्या दिवशी बाई ऊसतोडीला उभी आसती. रोज १५ तासापेक्षा जास्त राबती. सुटी घेतली की दिवसाले एका जोडीमागं हजार रुपये दंड उलट आमालेच टोळीला द्याय लागते.
इतकं करून उचल नवऱ्याच्या नावाने देत्यात. आमी म्हणजे आमच्या नवऱ्याचे फुकटचे कामगारच. आमच्या लेकरांच्या शिक्षनाचं तर पार वाटोळंच होतंय. तान्ही लेकरं पाचटावरच झोपलेली असत्यात. रात्री अंधारात पाचटीत झोपलेल्या मुलांच्या अंगावरून ट्रॅक्टर जातोय. फडावर आमच्या मुलांना पाळणाघर असावं. त्यांना चांगला आहार भेटावा आणि शिक्षण पन मिळावं.. लय वेळा गावातील पोरं आमच्या पोरींची छेड काढत्यात. त्या पाण्याला गेल्यावर त्यांची वाट अडवत्यात. गावातील पुरुष बहाण्यानं त्यांच्याशी लगट करत्यात. म्हणून पोरी वयात आल्या की, लगेच त्यांचं लगीन उरकून टाकतो. कोवळ्या पोरींची लग्न लावून द्यायला जीव धजत नाय. पण काय करायचं?
पाळीच्या दिवसातलं तर काय सांगावं? कपडा बदलायला कुठे बी आडोसा नसतोय. उसाच्या पाचटीतून साधा माणूस चालू शकत न्हाय. अशात गरोदर बायका ५० किलोची जड मोळी घेऊन चालत जात्यात. बरं गरोदरपनाची गावात नोंद झाली तर ठीक, नाई तर आमाला गरोदर अन् बाळंत बाईला हायेत त्या कोणत्याच योजनांचा फायदा भेटत नाई. आशाताई येत नाय. काही जणींच्या गर्भपिशव्या २०-२२ व्या वर्षीच काढलेल्या हायेत.
आमच्यासाठी सरकारनं कायतरी ठरवलं पायजे; पण सरकारकडं आमची आकडेवारीच नाय, भाऊ! दोन वरीस झाले शासनाने ग्रामसेवकाकडे नोंदणी करायसाठी कायदा केला हाय. गावातल्या बायांच्या सह्या घेऊन आम्ही ग्रामसेवकाला यादी बी दिली मागल्या वर्षी. तरी तेंनी नोंदणी केली नाई. मग कोशीश करून मागल्या वर्षी बीडमध्ये नोंदणी सुरू झाली; पण नोंद करताना ग्रामसेवक पूर्ण कुटुंबाचं मिळून एक ओळखपत्र देतो म्हणतोय, असं कसं चाललं? कामगार म्हणून दोघं राबणार अन् ओळखपत्र फक्त पुरुषाच्या नावानं! आमाले बी कामगार म्हणून स्वतंत्र ओळख दिली पायजे आणि पगार बी आमच्या हातात मिळाला पाहिजे.
या सगळ्या मागण्यांसाठी आमी ऊसतोड कामगार बायकांची वेगळी संघटना काढली हाय. आमी मागे लागत राहणार. बायकांची वेगळी नोंदणी आणि ओळखपत्र द्या या मागणीसाठी आमी बीड आणि हिंगोलीमध्ये मिळून ८० गावांमधे ४७१० बायकांचं सह्या बी घेतल्या. तो सह्यांचा गठ्ठा जिल्हाधिकाऱ्याले बी दिला. आमी प्रत्येक गावातून मिळालेल्या सह्यांचा गठ्ठा तुमाला बी पाठवला हाय. तुमी आमच्या मागण्यांकडे लक्ष द्याल असं आमाले वाटते. आमी अजुनबी तुमच्या उत्तराची वाट पाहू राहिलो. तर मुख्यमंत्री भाऊ, ऊसतोड बायांचा एकदा विचार करा अन् आमचाही ऊसतोड कामगार म्हणून स्वतंत्र हक्क हाय हे मान्य करून तुमच्या कारभाऱ्यांना तशी सूचना बी द्या अशी इनंती करतो.
- महिला ऊसतोड कामगार (तुमच्याच माय-लेक, बहिणी) mahilaustod@gmail.com
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"