- आ य आ य टी प्र वे शा ची गु रु कि ल्ली आ ता म हा रा ष्ट्रा त ही...अभियांत्रिकी शिक्षणाची देशातील सर्वोच्च संस्था म्हणून ओळख असलेल्या आयआयटीमध्ये प्रवेश हवा असेल, तर जेईई या पूर्वपरीक्षेमध्ये सर्वोत्तम गुण मिळवण्याचे आव्हान विद्यार्थ्यांसमोर असते. खासगी कोचिंग क्लासेस तर या परीक्षेच्या तयारीसाठी पालकांकडून लाखो रुपये उकळतात. मात्र एकही पैसा न भरता बिहारसारख्या राज्यातून ‘सुपर ३०’ प्रकल्पाच्या मदतीने गेल्या १३ वर्षांत ३९०पैकी ३३३ विद्यार्थ्यांनी ही प्रवेश परीक्षा उत्तीर्ण होत आयआयटी आणि एनआयआयटीमध्ये प्रवेश मिळवला. लिम्का बुकसह देश-परदेशातील अनेक नामांकित संस्था आणि व्यक्तींनीही या प्रकल्पाची दखल घेतली. आता हा प्रकल्प लवकरच महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठीही खुला होतोय. नेमका काय आहे हा ‘सुपर ३०’ प्रकल्प? त्याच्या यशामागील रहस्य काय? आणि राज्यातील विद्यार्थ्यांना त्याचा कसा फायदा होईल? हे जाणून घेण्यासाठी ‘सुपर ३०’चे जनक आनंद कुमार यांच्याशी ‘लोकमत - कॉफी टेबल’मध्ये साधलेला हा संवाद...‘सुपर ३०’ प्रकल्प कसा सुचला?वडिलांची इच्छा होती की मी शिक्षक व्हावे. त्यामुळे हलाखीच्या परिस्थितीत शिक्षण घेताना सायंकाळी गणित विषयाची शिकवणी घ्यायचो. त्यातूनच १९९२-९३ साली विद्यार्थ्यांसाठी रामानुजन स्कूल आॅफ मॅथेमॅटिक्स (आरएसएम) ही संस्था सुरू केली. संस्थेतून शालेय शिक्षण घेतल्यानंतर बहुतेक विद्यार्थ्यांनी आयआयटी जेईई परीक्षेची शिकवणी घेण्याचे आवाहन केले. आर्थिकदृष्ट्या मागास असल्याने त्यांना खासगी क्लासेसची फी परवडणे शक्य नव्हते. त्यांच्या मागणी आणि प्रोत्साहनातूनच २००२ साली ‘सुपर ३०’ प्रकल्पाची सुरुवात झाली.‘सुपर ३०’च का?खरे म्हणजे या प्रकल्पाला सुरुवात झाल्यानंतर नाव काही ठेवले नव्हते. तसेच नेमके किती विद्यार्थ्यांना प्रशिक्षण द्यायचे हेही ठरले नव्हते. शिकवणीतून जमा होणाऱ्या पैशांतून त्या वेळी तरी ३० विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देणे शक्य झाले. त्यामुळे प्रकल्प सुरू झाल्यानंतर दोन वर्षांनंतर ३० विद्यार्थ्यांची बॅच असल्याने ‘सुपर ३०’ हे नाव पडले. आजही ३० जागांसाठी १ हजार विद्यार्थी प्रवेशपूर्व परीक्षा देतात.प्रकल्पात काही अडचणी किंवा कोणाची मदत?जितक्या अडचणी आल्या, त्याहून अधिक मदत मिळाली. प्रकल्पासाठी कोणत्याही सरकारकडून किंवा खासगी संस्थेकडून आर्थिक मदत घ्यायची नाही, असे ठरविले होते. ‘सुपर ३०’ला मिळालेल्या यशानंतर अनेक शत्रू तयार झाले. खासगी कोचिंग क्लासेसने अनेकवेळा पैशांचे आमिष दाखविले. गेल्या आठवड्यात १० कोटीची आॅफरही मिळाली. पैशांनी खरेदी करू शकले नाही म्हणून काहींनी जिवे मारण्याची धमकी दिली, तर काहींनी तसा प्रयत्नही केला. त्यामुळे आता सरकारने सुरक्षा दिलेली आहे. मात्र कुटुंबीयांंनी नेहमीच साथ दिली. जेईई देताना आवश्यक असलेल्या गणित, फिजिक्स आणि केमिस्ट्री या तीन विषयांपैकी मी केवळ गणिताचे तास घेतो; तर फिजिक्स आणि केमिस्ट्रीसाठी इतर शिक्षक मदत करीत आहेत. माझी पत्नी आणि भावाची बायको या दोघीही आयआयटीयन्स असल्याने त्या प्रश्नपत्रिका तयार करण्याचे काम करतात. तर जेवणाची मदार आईवर सोपवलेली आहे. सर्व व्यवस्थापन भाऊ पाहतो.राजकीय व्यक्तींची भूमिका कशी आहे?सुरुवातीला काही राजकीय व्यक्तींनीही धास्ती घेतली होती. त्यांना वाटले की मी निवडणुकीला उभा राहिलो, तर त्यांची एक जागा कमी होईल. काही पक्षांनी धमकी दिली होती, तर काहींनी आॅफर. मात्र राजकारणात रस नसल्याचे मी स्पष्ट केले; शिवाय यापुढेही राजकारणात जाणार नसल्याचे सांगितले. शिक्षणाबाबत सरकारची भूमिका चांगली असली, तरी शासकीय अधिकारी चांगले नाहीत. बाहेरच्या राज्यातून आलेला अधिकारीही या ठिकाणी आल्यावर बिघडतो. इच्छाशक्ती असली, तरी इमानदारी दिसत नाही. त्यामुळेच येथील गुन्हेगारीचे प्रमाण अधिक आहे.शिक्षणात कोणते बदल अपेक्षित आहेत?शिक्षकांना प्रोत्साहन देऊन विद्यार्थ्यांना कशा प्रकारे शिक्षण द्यायचे, याबाबतचे प्रशिक्षण द्यायला हवे. येथे आजही रिक्षावाल्याचा मुलगा प्रशासकीय अधिकारी झाला, तर बातमी होते. मात्र ही तर शरमेची बाब आहे. कारण याचाच दुसरा अर्थ गरिबांच्या मुलांना आजही अपुरे शिक्षण मिळते आहे, असा होतो. मुळात चीनप्रमाणे शालेय जीवनापासूनच मुलांना कोणत्या गोष्टींमध्ये रुची आहे, त्याचे प्रशिक्षण द्यायला हवे. त्यातूनच संशोधनाकडे अधिकाधिक विद्यार्थी वळतील. याउलट सद्य:स्थितीत भारतात प्रथम प्राधान्य आयआयटी, यूपीएससीसारख्या परीक्षांना असते. त्यानंतर उरलेली मुले संशोधनाकडे वळतात. म्हणजेच मॉडेल टिचिंगची अपेक्षा आहे.शिकवण्याच्या पद्धतीबाबत काय सांगाल?प्रत्येक विद्यार्थ्यामधील शिक्षणाची भावना जागृत करण्याचे काम संपूर्ण कुटुंब करीत असते. विद्यार्थी पूर्णवेळ एकत्र असल्याने त्यांच्यात अभ्यासाचीच चर्चा होत असते. प्रश्न असो वा अडचणी ते स्वत:च मार्ग काढण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे केवळ घोकम्पट्टी न करता त्यांना फॉर्म्युला बेस शिक्षण देण्याचा प्रयत्न असतो. संकल्पना काय आहे, हे समजून सांगताना त्यामागील गंभीरताही समजावली जाते. त्यातूनच नव्या कल्पनांचा जन्म होतो. नवे काहीतरी शोधण्याची संधी दिली जाते. त्यासाठी सुरुवातीला फळा आणि खडूची मदत घेतली जाते, तसेच कधीकधी मल्टीमीडियाचा वापरही केला जातो. त्यासाठी काही काल्पनिक पात्रांचाही वापर केला जातो.माजी विद्यार्थ्यांची काही मदत?काही माजी विद्यार्थी आत्ता मदतीला पुढे आले आहेत. आयटीआयमध्ये शिक्षण घेतल्यानंतर बहिणीचे लग्न, घरखरेदी अशी काही स्वप्ने पूर्ण केल्यानंतर हे विद्यार्थी माझ्या मदतीसाठी येतात. ९० टक्के विद्यार्थ्यांनी मदत करण्याची तयारी दाखविली. १० टक्के मात्र विसरले.प्रकल्पाचा पुढील टप्पा महाराष्ट्रातच सुरू करण्याचे का ठरविले?गेल्या २-३ वर्षांपासून देशातील विविध राज्यांतून प्रकल्पात सामील होण्यासाठी विद्यार्थ्यांची पत्रे आणि ईमेल येत आहेत. त्यात सर्वाधिक पत्रे महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची आहेत. शिक्षणाबाबत मराठी आणि महाराष्ट्रीय विद्यार्थ्यांमध्ये अधिक जिज्ञासा दिसली. त्यामुळे महाराष्ट्राचा दौरा केला; तर इथेही कोचिंग क्लासेसचा बाजार दिसला. त्यामुळे मराठी विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्याचा निश्चय केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत दोनवेळा चर्चा झाली. त्यांनी लागेल ती मदत करण्याचे आश्वासन दिले. मात्र केवळ परीक्षेचे आयोजन करण्यात सहकार्य करा, इतकीच अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.म्हणजेच सुपर ३० आता सुपर ४० होईल का?होय. ‘सुपर ३०’चे ‘सुपर ४५-५०’ किंवा जास्तीतजास्त ‘सुपर ६०’ करण्याचा निश्चय केला आहे. त्यासाठी येथील विद्यार्थ्यांचे सहकार्य लागेल. पुढील वर्षी नागपूर, औरंगाबाद, पुणे, मुंबई अशा मुख्य शहरांत प्रवेशपूर्व परीक्षा घेतली जाईल. त्यातून प्रशिक्षणासाठी विद्यार्थ्यांची निवड केली जाईल. कोणत्याही जातीच्या आणि धर्माच्या विद्यार्थ्यांना परीक्षा देता येईल. अट एकच, विद्यार्थी आर्थिकदृष्ट्या मागास आणि त्यांच्यात शिकण्याची जिद्द असावी. येत्या दोन वर्षांत हेच प्रशिक्षण आॅनलाइन पद्धतीने देण्याचा मानस आहे. त्यासाठी तयारी सुरू आहे. प्रथम हिंदी आणि नंतर मराठी भाषेत प्रशिक्षण देण्याचा प्रयत्न केला जाईल.शहरातील विद्यार्थ्यांवर इतका भर का?सध्या शहरातील शासकीय शाळांची अवस्था अधिक बिकट आहे. अनेक शाळा बंद झाल्या आहेत किंवा बंद होण्याच्या मार्गावर आहेत. गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना या शाळांचा आधार आहे. मात्र त्यानंतर उच्च शिक्षण घेणे विद्यार्थ्यांच्या अवाक्याबाहेर जात आहे. परिणामी, शासकीय शाळांमधील विद्यार्थ्यांना चांगली संधी मिळावी म्हणून हा उपक्रम सुरुवातीला मुख्य शहरांत सुरू केला जाईल. त्यानंतर आदिवासी भागांतही त्याचा विस्तार केला जाईल.कोणत्या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी अर्ज करता येईल?दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना या प्रवेशपूर्व परीक्षेसाठी अर्ज करता येतील. फरक एवढाच की, दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना दोन वर्षांचे प्रशिक्षण, तर बारावीच्या विद्यार्थ्यांना एक वर्षाचे प्रशिक्षण दिले जाईल. आर्थिक मागासलेपणाची अट इथेही असेल.बिहारमधील पटनामध्ये सुरू असलेल्या प्रकल्पाला मुलींचा प्रतिसाद मिळतोय का?प्रतिसाद तर मिळतोय. मात्र अजूनही शैक्षणिकदृष्ट्या मागास असलेल्या या राज्यात एक वर्ष शिक्षणासाठी मुलीला पाठवण्याची मानसिकता तयार झालेली नाही. येथील मुलींना शिक्षिका करण्याचा विचार केला जातो. तरीही सरासरी ३० विद्यार्थ्यांमध्ये २ ते ३ मुली प्रशिक्षणासाठी येऊ लागल्या आहेत. नागपूरमधील टिष्ट्वंकल जैन ही मुलगी प्रशिक्षणासाठी आली होती. तिला नागपूर एनआयटीमध्ये प्रवेश मिळाला.काय आहे ‘सुपर ३०’ प्रकल्प?आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या हुशार विद्यार्थ्यांना बारावीनंतर आयटीआय या सर्वोत्तम अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश मिळावा म्हणून आनंद कुमार यांनी २००२ साली हा प्रकल्प सुरू केला. या प्रकल्पात ३० विद्यार्थ्यांना आयटीआय प्रवेशपूर्व परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी वर्षभर मोफत प्रशिक्षण दिले जाते. प्रशिक्षणार्थींना शिक्षणासाठी कुमार यांच्या घरी कुमार कुटुंबीयांसोबत राहावे लागते. सर्व प्रशिक्षणार्थींचा दैनंदिन खर्चापासून शिक्षणाचा खर्च कुमारच करतात. त्यासाठी गेल्या २४ वर्षांपासून ते सायंकाळची खासगी शिकवणी देत आहेत. या शिकवणीतून येणारा सर्व पैसा ते या प्रकल्पासाठी खर्च करीत आहेत. सरकार आणि खासगी कंपन्यांकडून प्रकल्पासाठी आर्थिक मदत घेण्यास त्यांनी नकार दिला.मै ही हू व्हीआयपीआनंद कुमार मुंबईत पोहोचण्याआधीच इथे त्यांच्या सुरक्षेसाठी पोलीस तैनात झाले होते. काही पोलिसांना त्यांनी एवढ्या सुरक्षेचे कारण विचारल्यावर पहारा देत असलेल्या पोलिसांनी ‘‘कोई व्हीआयपी आनेवाला है,’’ असे सांगितले. ही सुरक्षा आपल्यासाठीच असल्याचे कळाल्यावर ‘‘मै ही हू वो व्हीआयपी,’’ असे सांगत त्यांना जाण्याची विनंती केली. सिक्रेट आॅफ सक्सेस‘सुपर ३०’च्या यशामागचे सिक्रेट काय? असे विचारल्यावर दुर्बल घटकातून येऊन मेहनत, चिकाटीवर यशस्वी होणारे विद्यार्थी हेच यशामागचे गमक असल्याचे त्यांनी सांगितले. एक रूपयात आॅनलार्ईन क्लास भविष्यात आॅलिंम्पियाड आणि स्पर्धात्मक परीक्षांसाठी सुरू होणाऱ्या आॅनलाईन प्रशिक्षणाचे शुल्क प्रत्येकी एक रूपया घेण्यात येणार असल्याचे आनंद कुमार यांनी सांगितले. (संकलन - चेतन ननावरे)
‘सुपर ३०’चे होणार ‘सुपर ६०’!
By admin | Published: February 28, 2016 2:20 AM