आॅलिम्पिक चॅम्पियन स्पेनच्या कॅरोलिना मरिनला रविवारी नमवून पी.व्ही. सिंधूने इंडियन ओपन सुपर सीरिज बॅडमिंटन स्पर्धेचे जेतेपद जिंकून सर्वांनाच आश्चर्याचा आणि आनंदाचा धक्का दिला. शिवाय आपण भारतीय बॅडमिंटनची पुढील ‘फुलराणी’ असल्याचेही तिने सिद्ध केले. मुळात फुलराणी म्हटल्यावर आपल्या डोळ्यांसमोर उभी राहते सायना नेहवाल. परंतु, रिओ आॅलिम्पिक स्पर्धेपासून सिंधूने सायनाच्या साम्राज्याला हादरे द्यायला सुरुवात केली आणि त्याचबरोबर बॅडमिंटनची महासत्ता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चीनच्या वर्चस्वालाही आव्हान दिले. अपर्णा पोपटनंतर जागतिक बॅटमिंटनमध्ये भारतीय चेहरा म्हणून सायना गाजली. सायनाने केलेला पराक्रम तोपर्यंत आपण केवळ स्वप्नातच पाहत होतो. मग ते आॅल इंग्लंड स्पर्धेचे यश असो, आॅलिम्पिक पदक असो किंवा थेट जागतिक क्रमवारीत काबीज केलेले अव्वल स्थान असो... सायनाने भारतीयांच्या मनात बॅडमिंटनमध्ये यश मिळवून देण्याचा विश्वास दिला. याच विश्वासाचे आत्मविश्वासामध्ये रूपांतर सध्या सिंधू करून दाखवते आहे. जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत दोन पदके, आॅलिम्पिकमध्ये रौप्य पदक, सुपर सीरिज आणि ग्रांप्री स्पर्धेतील वर्चस्व... दखल घेण्याची बाब म्हणजे सिंधूने अभिमानाने तिरंगा फडकावताना चिनी वर्चस्वाला झुंजवले. त्यामुळेच सायनानंतर सिंधूकडे भारताची ‘फुलराणी’ म्हणून बघितले जाते. ज्या खेळाडूविरुद्ध आॅलिम्पिक अंतिम सामन्यात पराभव पत्करावा लागला, त्याच कॅरोलिनाला सरळ दोन गेममध्ये लोळवून सिंधूने आॅलिम्पिक पराभवाचा वचपा काढला. इंडियन ओपनमध्येही सिंधूने आपल्याहून सीनिअर असलेल्या सायनाला दोन गेममध्ये पराभूत करून स्वत:ला सिद्ध केले. दुखापतीमुळे सायनाच्या कामगिरीवर सध्या मोठा परिणाम होत असला, तरी भारतीय बॅडमिंटनकडे सिंधू नावाचे ट्रम्प कार्ड आहे. एकूणच, सायनाने यशाचे जे मार्ग खुले केले, त्याच मार्गावरून आता सिंधूची वाटचाल सुरू आहे, असे म्हटले तरी वावगे ठरू नये.
सुपर सिंधू
By admin | Published: April 04, 2017 12:01 AM