सचिन जवळकोटे
गेल्या तीन महिन्यांत माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी सोलापूर लोकसभा मतदारसंघात प्रचाराची एक फेरीही पूर्ण केली; मात्र आजच्या क्षणापर्यंत भाजपाचा उमेदवार कोण असेल, हे खुद्द पक्षाचे नेतेही ठामपणे सांगू शकेनासे झालेत. मध्यंतरी मुख्यमंत्र्यांच्या यंत्रणेने केलेल्या सर्व्हेत येथील भाजपाच्या विद्यमान खासदारांचे भवितव्य धोक्यात आल्याचा अहवाल प्राप्त होताच वरिष्ठ पातळीवर हालचाली सुरू झाल्या.
विद्यमान खासदार शरद बनसोडे यांना पर्याय देण्यासाठी अनेक नावांचा शोध सुरू झाला. सोलापूर लोकसभा मतदारसंघ राखीव असल्याने बारामती येथील भाजपाचे नेते अमर साबळे यांचेही अलीकडे सोलापूर दौरे वाढले. ‘आपल्याकडे फक्त प्रचाराची जबाबदारी आहे’ असं सांगत त्यांनी कसा अन् किती प्रचार केला, हेही त्यांच्याच कार्यकर्त्यांना समजलं नाही. साबळे हे राज्यसभेचे खासदार आहेत. त्यांचे नाव सोलापूरकरांसाठी नवे असल्याने ते विजय प्राप्त करण्याइतपत चालतील का? याविषयी पक्षातच साशंकता होती. त्यांच्यासाठी सहकारमंत्री सुभाष देशमुख गटाने जोर लावला असला तरी सोलापूरचे पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी मात्र शेवटच्या क्षणी नवं नाव पुढं आणलं. अक्कलकोट तालुक्यातील गौडगाव मठाचे प्रमुख डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांची थेट मुख्यमंत्र्यांशी भेट घालून दिली. त्यांच्यासाठी अनेक ठिकाणी बैठका घेऊन वातावरण निर्मितीही केली.
डॉ. जयसिद्धेश्वर हे आजपर्यंत प्रवचन देणारे धार्मिक साहित्यिक. येथील लिंगायत समाजात त्यांना श्रद्धेचं स्थान. त्यामुळं अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, मंगळवेढा तालुक्यांसह सोलापूर शहरातील लिंगायत समाज बांधवांमध्ये ते चमत्कार घडवू शकतात, हे लक्षात येताच काही विरोधकांमधून चलाखीनं वेगळी चाल खेळली जातेय. धर्मगुरूंनी राजकारणात उतरू नये, समाज आजपर्यंत ज्यांच्या पाया पडत होता, आता मत मागण्यासाठी ते लोकांच्या पाया पडणार का?’ असा प्रश्न उपस्थित केल्याने सोलापुरात गदारोळ निर्माण झालाय. मात्र इतर धर्मगुरूंनी या महास्वामींसोबत राहण्याचा ठाम निर्णय घेतल्यानं सुभाष देशमुख गटही अत्यंत सावधपणे पावले टाकत आहे. कारण देशमुखांच्या दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघात लिंगायत समाजाचे प्राबल्य असल्याने या बांधवांना दुखवून चालणार नाही, हे ओळखून ते उघड भूमिका घेण्यास तयार नाहीत. मात्र, बारामतीच्या साबळेंपेक्षा स्थानिक महास्वामी जास्त चालू शकतात, हे लक्षात आल्यानं पक्षाचे वरिष्ठही याच नावावर अधिक विचार करत आहेत.
सुशीलकुमार २०१४ साली मोदी लाटेत पराभूत झाले होते. मात्र त्यांनी पुन्हा कंबर कसली असून, गावोगावी भेटीगाठीचा सपाटा लावलाय. यामुळे ‘प्रत्येक छोट्या-मोठ्या कार्यक्रमाला ते हजेरी लावताहेत’ अशा सुरात विरोधकांनी टीका केली असली तरीही यंदा कोणतीच रिस्क घेण्याची त्यांची मानसिकता नाही. काँग्रेसमधील सर्व गटांना एकत्र आणून पराभवाचा शिक्का पुसण्यासाठी त्यांनी आटोकाट प्रयत्न सुरू केलाय. २०१४ मध्ये मोदींनी येथील प्रचारसभेत ‘शिंदेंनी सोलापूरसाठी काय केले?’ असा सवाल केला होता. आता तेच वाक्य घेऊन शिंदेंची टीम मैदानात उतरलीय, ‘मोदींनी सोलापूरसाठी काय केले?’
सध्याची परिस्थिती
- सोलापुरात उद्योगधंदे नसल्याने बेकारांची संख्या अधिक, त्यामुळे मोठ्या प्रमाणावर स्थलांतर. सोलापूर शहर स्मार्ट सिटी घोषित झाल्यापासून कामाचा वेग कमीच. गेल्या तीन वर्षांपासून एकाच रस्त्याचे काम झाले आहे.
- उजनी ते सोलापूर पाण्याची दुसरी पाईपलाईन टाकण्याच्या कामास वेळेनुसार सुरुवात नाही. यंदा गतवेळच्या विजेत्या शरद बनसोडे यांचे तिकीट कापण्याची शक्यता असल्याने त्यांच्या जागी कोणाला तिकीट मिळेल याबाबतीत खल सुरू
२०१४ मध्ये मिळालेली मते
- 5,17,879
शरद बनसोडे(भारतीय जनता पक्ष)
- 3,68,205
सुशीलकुमार शिंदे(काँग्रेस)
- 19,041
संजीव सदाफुले(बहुजन समाज पार्टी)