- हमीद दाभोलकर(कार्यकर्ता महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती)
प्रत्यक्षात भूत या कल्पनेला कोणताही शास्त्रीय आधार आजपर्यंत मिळाला नसला, तरी भुताखेतांच्या गोष्टी या मानवी जीवनाच्या अगदी सुरुवातीच्या टप्प्यापासून आपल्या सोबतीला राहिलेल्या आहेत. भुतांचे सिनेमे आणि कादंबऱ्या याचे आकर्षण इतके आहे की, ते कायम बेस्ट सेलर यादीत असतात. भुताखेतांचा विषय परत चर्चेत येण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे भारतातील विज्ञान-तंत्रज्ञान क्षेत्रातील सर्वोच्च संस्था मानल्या जाणाऱ्या आयआयटीचे मंडी येथील नवनियुक्त डायरेक्टर लक्ष्मीधर बेहरा यांनी नुकतेच केलेले वक्तव्य!
लक्ष्मीधर बेहरा हे मानवी मेंदू आणि संगणकाच्या माध्यमातून निर्माण होणारी कृत्रिम बुद्धिमता यांचा परस्परांशी काय संबंध असेल याविषयीचे भारतातील प्रमुख अभ्यासक आहेत! या पार्श्वभूमीवर त्यांच्या दाव्याची तपासणी करणे आवश्यक आहे. आयुष्यभर विज्ञान संशोधन केलेल्या आणि शंभरच्या आसपास पीएचडी विद्यार्थ्यांचे मार्गदर्शक राहिलेल्या व्यक्तीने भुतांच्या अस्तित्वाविषयी दावा करत असताना तसे तगडे पुरावे देणे आवश्यक होते. प्रत्यक्षात त्यांनी स्वत:ला आलेला अनुभव पुरावा म्हणून सांगितला आहे. आपल्या एका मित्राला आणि त्याच्या कुटुंबाला भुताने झपाटले होते, तेव्हा आपण त्यांचे भूत उतरवण्यासाठी मंत्रतंत्राचा वापर केला होता, असे ते म्हणाले.
टोकाच्या भावनिक ताणाखाली असलेले लोक अनेक वेळा, सकृत दर्शनी वेगळे वाटावे असे वागतात, तसेच अनेक मानसिक आजारांमध्येदेखील ती व्यक्ती सामान्य माणसासाठी विचित्र वाटावी अशी वर्तणूक करते. हे आधुनिक मानसशास्त्रातील अगदी प्राथमिक ज्ञान आहे. मेंदूतील काही रसायनांमध्ये बदल झाल्याने कोणीही बोलत नसले तरी, बोलण्याचा आवाज येणे किंवा समोर काही नसतानादेखील व्यक्ती दिसल्याचा भास होणे अशी देखील लक्षणे असू शकतात. हे कशाने होते त्याचे कारण माहीत नसल्याने ग्रामीण भागातील लोक अजूनदेखील त्या व्यक्तीला भुताखेताने झपाटले आहे असे समजून मांत्रिकाकडे नेतात. प्रत्यक्षात त्या व्यक्तीला मानसोपचाराची गरज असते.
अशा वेळी महत्त्वाच्या शास्त्रीय पदावरील व्यक्तीने भुताखेतांविषयी ठोसपणाने विधान करणे लोकांची दिशाभूल करणारे आहे. मृत्यूनंतर ज्यांच्या काही इच्छा अपूर्ण राहिल्या असतील तर आत्मे अतृप्त राहतात आणि मग तेच आत्मे भुताच्या रूपात आपल्या आजूबाजूला असतात, असा एक खोलवर रुजलेला समज आहे. विज्ञानाने हे सिद्ध केले आहे की माणसाच्या मृत्यूनंतर त्याच्या शरीरातील सर्व गोष्टींचे विघटन होते. त्यामुळे आत्मा या संकल्पनेला कोणताही शास्त्रीय आधार नाही. मृत्यूपश्चात आयुष्य हीच एक मोठी अंधश्रद्धा आहे. त्यामुळे भुतांचे अस्तित्व सिद्ध करण्यासाठी काहीही शास्त्रीय आधार उरत नाही. काही महिन्यांपूर्वीएका प्रथितयश विद्यापीठाने भूतविद्या याविषयी अभ्यासक्रम सुरू करण्याचा घाट घातला होता, हे आपण जाणतो.
करमणूक म्हणून भुताखेतांच्या गोष्टी आणि सिनेमे आवडणे आणि प्रत्यक्षात भुताखेतांवर विश्वास ठेवणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत हे आपण समजून घेतले पाहिजे. गेली तीस वर्षे सातत्याने महाराष्ट्र अंनिस याविषयी समाजप्रबोधन करीत आली आहे. ‘भुतांच्या शोधात स्मशान सहल’ हा शालेय मुलांसाठी असलेला कार्यक्रम अनेक वर्षे अंनिस राबवीत आहे. कोकणात भुताखेतांच्या गोष्टींचा खूप अधिक प्रभाव होता, म्हणून तीस वर्षांपूर्वी अंनिसने ‘शोध भुताचा बोध मनाचा’ नावाची एक प्रबोधन मोहीम कोकणात राबविली होती. भूत या संकल्पनेचा सर्वव्यापी प्रभाव पाहता ती देशभरात राबविण्याची गरज अजूनदेखील आहे असे वाटते. या पार्श्वभूमीवर लक्ष्मीधर बेहरा यांना भुतांविषयीचा त्यांचा दावा सिद्ध करण्यासाठी महाराष्ट्र अंनिस एकवीस लाखांचे आव्हान देणार आहे. ते स्वीकारले जाते की नाही ते आपल्याला लवकरच कळेल, तोपर्यंत अज्ञान आणि भीतीचे हे भूत आपल्या मानगुटीवर बसणार नाही याची आपण सर्वांनी काळजी घेतली पाहिजे.hamid.dabholkar@gmail.com