शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: विनोद तावडे ठाकुरांच्याच कारमधून एकत्र का गेले? हितेंद्र ठाकुरांनी सगळे सांगितले...
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मला गोळ्या झाडा मी मरणार नाही, तुम्हाला सोडणार"; हल्ल्यानंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
3
Vinod Tawde: ज्या पैशांवरून राडा केला, ते माझे नाहीतच; ज्या खोलीत पैसे सापडले तिथे मी गेलोच नव्हतो : विनोद तावडे
4
“देवेंद्र फडणवीस यांची ही ‘लाडका विनोद’ योजना आहे का?”; काँग्रेसची खोचक टीका
5
"राहुलजी, याला पोरकटपणा म्हणायचं नाही तर काय..."; विनोद तावडे यांचे राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर
6
Indian Sports Honours 2024 : मनू, नीरज, स्मृतीसह यशस्वीचा सन्मान; पुरस्कार विजेत्यांची संपूर्ण यादी
7
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा
8
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात मोठा खुलासा; आरोपीने सांगितलं नाव, कोण होता मास्टरमाइंड?
9
आदित्य ठाकरेंविरोधात भाजपची निवडणूक आयोगाकडे तक्रार; आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा आरोप
10
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
11
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
12
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
13
Amol Kolhe : "पैशाच्या जोरावर महाराष्ट्र जिंकायचा, गुजरातच्या दावणीला बांधायचा"; अमोल कोल्हेंचा भाजपावर हल्लाबोल
14
'पैशासाठी दिल्ली कॅपिटल्सचा संघ सोडलेला नाही...', IPL 2025 लिलावापूर्वी Rishabh Pant च्या पोस्टने खळबळ
15
मतदान एका दिवसावर! महायुती की मविआ?... हे मुद्दे विचारात घेऊन मतदार मत देणार…
16
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
17
मणिपूरमध्ये वाद वाढला, एनडीएचा प्रस्ताव मैतेई संघटनेने फेटाळला; २४ तासांचा अल्टिमेटम दिला
18
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
19
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
20
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप

आजचा अग्रलेख: कसं घडलं, का बिघडलं...?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2022 7:55 AM

महाराष्ट्रातील आघाडी सरकारला हे जमले नाही. प्रत्येकच प्रश्नावर केंद्राकडे बोट दाखविण्याने काही साध्य होत नाही.

महाराष्ट्रातओबीसी आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक पावसाचा विचार करून पावसाळ्यात किंवा त्यानंतर घ्यावी, हे सर्वोच्च न्यायालयाचे मंगळवारचे निर्देश आणि पन्नास टक्के मर्यादेतील ओबीसी आरक्षणासहमध्य प्रदेशातील स्थानिक संस्थांमधील निवडणुकीची अधिसूचना काढावी, हा बुधवारचा आदेश, याचा अन्वयार्थ काय काढायचा? महाराष्ट्रात महाविकास आघाडीने न्यायालयाच्या निर्देशानुसार स्वतंत्र ओबीसी आयोग नेमून आवश्यक ती आकडेवारी जमा न करता जवळपास चौदा महिने टाळाटाळ केली, हा नाकर्तेपणा सिद्ध झाला की अजूनही आघाडीचे नेते दावा करतात तसे मध्य प्रदेशात आरक्षणाला हिरवा कंदील मिळाल्यामुळे महाराष्ट्राच्या आशाही पल्लवित झाल्या आहेत? ओबीसी आरक्षणाच्या आघाडीवर महाविकास आघाडी सरकार सपशेल अपयशी ठरल्याचा आरोप विरोधी पक्ष म्हणजे भारतीय जनता पक्ष करीत आहे. 

आघाडी सरकारला, सत्तेतल्या ओबीसी नेत्यांना आता या आरोपाला उत्तर देणे सोपे नाही. त्या आरोपांचा आवाज आता आणखी वाढेल. कारण, मध्य प्रदेशात भाजपची सत्ता आहे आणि तिथले मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान स्वतंत्र ओबीसी आयोगाच्या माध्यमातून इम्पिरिकल डेटा तयार करण्याबाबत दक्ष राहिले. परिणामी, सर्वोच्च न्यायालयातील यशाचा आनंद साजरा करण्याचे क्षण त्यांच्या वाट्याला आले. याउलट, जे करायला पाहिजे ते न करता भलतेच करीत राहण्याने आणि प्रत्येकच गोष्टीत पक्षीय राजकारण आणण्याने काय नुकसान होते, हे महाराष्ट्रात ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्याने दाखवून दिले. 

गेल्यावर्षी महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने थांबविले. २०१० मधील के. कृष्णमूर्ती खटल्यातील निवाड्यानुसार, ट्रिपल टेस्ट म्हणजेच स्वतंत्र आयोग स्थापन करून इतर मागासवर्गीयांच्या राजकीय प्रतिनिधित्वाचे सर्वेक्षण व त्याचा इम्पिरिकल डेटा न्यायालयात सादर करणे व अनुसूचित जाती-जमातींचे घटनादत्त आरक्षण जमेस धरून एकूण आरक्षण पन्नास टक्क्यांवर जाणार नाही या मर्यादेत ओबीसींना आरक्षण, असे स्पष्ट निर्देश न्यायालयाने दिले. त्यानुसार, आकडेवारी तयार करणे, तो अहवाल सर्वोच्च न्यायालयाला सादर करणे ही केंद्र विरुद्ध राज्य राजकीय लढाई, आरोप-प्रत्यारोप यापलीकडे राज्य सरकारची घटनात्मक जबाबदारी होती. 

त्याबद्दल राज्य सरकार कमालीचे बेफिकीर राहिले. बरेच महिने आयोगच गठित झाला नाही. तो स्थापन झाल्यानंतर त्याला पुरेसा निधी, पुरेशी जागा किंवा कार्यालयीन कर्मचारी मिळाले नाहीत. इम्पिरिकल डेटाचे काम प्राधान्याने करण्याऐवजी पुन्हा पुन्हा सर्वोच्च न्यायालयात फेरविचाराचा अर्ज करणे, आयोगाचा अंतरिम अहवाल सादर करून आरक्षणासह निवडणुकीची परवानगी मिळविण्याचा अयशस्वी प्रयत्न करणे, या मार्गाने आम्हीही ओबीसींच्या राजकीय प्रतिनिधित्वासाठी खस्ता खात आहोत, असा आभास करण्याचा प्रयत्न झाला. याउलट, गेल्या १० मे रोजी महाराष्ट्राप्रमाणेच ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घेण्याचा आदेश आल्यानंतर मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी परदेश दौरा थांबवून दिल्ली गाठली. 

वकिलांसोबत मसलत केली. मध्य प्रदेशच्या ओबीसी आयोगाने दोन दिवसांत, १२ तारखेला अगदी महापालिका, जिल्हा परिषदनिहाय ओबीसी आरक्षणाच्या स्थितीचा सुधारित अहवाल न्यायालयात सादर केला. शिवराजसिंह चौहान कुशल प्रशासक असल्याची जणू पावतीच यातून मिळाली. ओबीसी आरक्षण हाताळणारे न्यायमूर्ती अजय खानविलकर यांचा बुधवारचा आदेश तपशिलात वाचला तर लक्षात येते की, सादर केलेली आकडेवारी अगदीच बिनचूक असल्याची खात्री नसली तरी मध्य प्रदेश सरकारच्या प्रयत्नांमधील प्रामाणिकपणा त्यांना भावला. 

महाराष्ट्रातील आघाडी सरकारला हे जमले नाही. प्रत्येकच प्रश्नावर केंद्राकडे बोट दाखविण्याने काही साध्य होत नाही. आरक्षणासारख्या संवेदनशील मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयच आपपरभाव करीत असल्याच्या अप्रत्यक्ष आरोपाने किंवा राजकीय टाळ वाजवित राहण्यानेही काही साधणार नाही. आतापर्यंत ओबीसी आरक्षण हा महाराष्ट्र सरकारसाठी तिढा होता. मध्य प्रदेशच्या यशाने त्याचा राजकीय फास बनला आहे. त्याचा सामना आघाडीला करावा लागेल. तूर्त कोणत्या भागात पावसाचा जोर कधी असतो वगैरे पाहून ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुकीला सामोरे जाण्याशिवाय महाराष्ट्राला गत्यंतर नाही. 

टॅग्स :OBC Reservationओबीसी आरक्षणMaharashtraमहाराष्ट्रMadhya Pradeshमध्य प्रदेशSupreme Courtसर्वोच्च न्यायालय