नम्रता फडणीस,पुणे- गानसरस्वती किशोरीताई आमोणकर यांना मानवंदना देण्यासाठी आयोजित केल्या जाणाऱ्या ‘गानसरस्वती’ महोत्सवाच्या निमित्ताने ‘लोकमत’ने त्यांची गेल्या वर्षी विशेष मुलाखत घेतली होती. या वेळी रागातील भावच हरपला असल्याचे सांगत, सध्या फ्युजनच्या सादरीकरणावर नाराजी व्यक्त केली होती. सध्याच्या संगीतावर किशोरीतार्इंनी मांडलेले रोखठोक विचार मांडले होते. पाश्चिमात्य संगीताच्या प्रभावातून निर्माण झालेले ‘फ्युजन’ हे जिग्सॉ पझलसारखे आहे. रागाचे तुकडे करून ते रसिकांसमोर सादर करणे याला संगीत म्हणता येणार नाही, यामुळे रागातील भावच हरपला असल्याचे सांगत, गानसरस्वती किशोरी आमोणकर यांनी ‘फ्युजन’च्या सादरीकरणावर नाराजी व्यक्त केली. ‘लोकमत’शी संवाद साधताना भारतीय संगीताचे स्थान, सूरांमधील रसानुभूती, फ्युजन आणि रिअॅलिटी शोमधून लहान मुलांची हरपत चाललेली निरागसता, यावर अत्यंत पोटतिडकीने त्यांनी आपले विचार मांडले. सूर हा दयाळू आईसारखा आहे, जीव ओतून मागितले, तर तो दोन्ही ओंजळीने भरभरून देतो. रागातील भाव गायकीमध्ये उतरवले पाहिजेत, असा मौलिक सल्लाही किशोरीतार्इंनी युवा पिढीला दिला.‘सूर’ हा शुद्ध आणि निर्मळ आहे. सुरांच्या अंतरंगात जाताना एक शांती हवी. भारतीय संगीताला दैवी परंपरा आहे, त्याचा प्रत्येक सूर हा शांततेकडे नेणारा आहे. मात्र, आजच्या संगीताला स्थैर्य नाही. त्यातील ‘दिव्यत्व’ आपण घालवून बसलो आहोत. नैसर्गिक असे काहीच राहिलेले नाही. एक प्रकारे ते रसातळालाच गेले आहे, भारतीय विचाराने ते जपले असते, तर नक्कीच पुढे गेले असते, असे सांगून किशोरीताई म्हणाल्या, जगात संगीताविषयी जे चालले आहे, त्याचा अभ्यास केला पाहिजे आणि आपल्या संगीताचे मूळ वाढवले पाहिजे. मात्र, परदेशातले विचार घेऊन आपण भारतीय संगीत शाश्वत ठेवण्याचा प्रयत्न करीत आहोत. हे संगीत स्वस्थता हरपणारे आणि अतिउत्साही करणारे आहे. याला भारताचे संगीत म्हणता येणार नाही. हेच करायचे असेल, तर पाश्चिमात्य गाणेच गावे.>रिअँलिटी शोमधून लहान मुलांचा गैरवापर चुकीचासहा वर्षांची मुलगी श्रृंगारिक लावणी म्हणते आणि आपल्याला पटत असल्यासारखे आपण ते पाहातो. यात दोष फक्त पालकांचा नाही, तर दूरचित्रवाहिन्या आणि जनतेचाही आहे. कारण तुम्हाला हे चालते, म्हणूनच त्याचे सादरीकरण होते. तुमच्या कथा यशस्वी होण्यासाठी मुलांचा वापर करणे चुकीचे आहे. रिअॅलिटी शोमधून मुलाचे नाव झाले, तर एखाद्या मालिकेचे शीर्षक गीत एवढेच पालकांना हवे आहे का? याचा विचार केला पाहिजे, अशा शब्दांत किशोरीतार्इंनी पालकांच्या डोळ्यात अंजन घातले.>संगीताला जात, धर्म नसतो : पाकिस्तानी कलाकारांना भारतात सादरीकरण करण्यासाठी विरोध केला जातो, त्यावर संगीताला जात धर्म नसतो, हे ठाऊक नाही का? असा मार्मिक टोला त्यांनी लगावला. नाट्यपद गायचे असेल तर सुरांना सोडा : कलाकारांचे लक्ष आपल्याला कार्यक्रम किती मिळतील, प्रसिद्धी कशी मिळेल याकडे असते, पण नाट्यपद गायची असतील, तर सुरांना सोडा, असा सल्ला त्यांनी कलाकारांना दिला. संगीत हे ’युनिव्हर्सल’आहे, संगीत म्हणजे सूरांची भाषा. संगीत हा विषय आहे, ते घराणे किंवा मनोरंजनाचे साधन नाही. संगीत हे घराण्यांमधून टिकविले जाते, हा समजही खोटा आहे. घराण्यांच्या संगीतामधून जेवढे संस्कार मिळतात, तेवढेच आपण गातो, पण स्वत:च्या ज्ञानामध्ये भर घालून ते संगीत वृद्धिंगत करण्याचा प्रयत्न झाला पाहिजे. सूरांशी युद्ध, तालांशी झगडा करून रागातील भाव गायकीमध्ये उतरवले पाहिजेत. ‘श्रोता’ हा संगीताचा आत्मा आहे. त्याला शरण जाऊन त्यांचे दर्शन व्हावे, अशी इच्छा अंगी बाळगायला हवी. मात्र, या भावनेतून कलेचे सादरीकरण करणारा विद्यार्थी वर्ग दिसत नाही. आपले खूप नाव झाले, म्हणजे अक्कल आली असे नाही. ‘बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल’, ‘अवघा रंग एक झाला’, ‘या पंढरीचे सुख’ असे अनेक अभंग, भजने आणि जाईन विचारत रानफुलासारखी गाणी आपल्या स्वरांनी अजरामर करणाऱ्या किशोरीताई आमोणकर यांनी काल मुंबईत अखेरचा श्वास घेतला. त्यांच्यावर मंगळवारी संध्याकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. आयुष्यभर सुरांच्या साथीने जगलेल्या किशोरीताई ‘मी माझे मोहित राहिले निवांत, एकरूप तत्त्व देखिले गे माये; द्वैताच्या गोष्टी हरपल्या शेवटी, विश्वरूपे मिठी देत हरी’ या त्यांनीच गायलेल्या ओळींशी एकरूप झाल्या...
सूर हा दयाळू आईसारखा!
By admin | Published: April 05, 2017 5:14 AM