एअर सर्जिकल स्ट्राइक यशस्वी झाले, हे अभिनंदनीय आहे़ तरी भारत-पाक संबंधांच्या दृष्टीने अंतिम आणि निर्णायक नाही, हे लक्षात घेतले पाहिजे. भारत-पाक दरम्यानचा हा गेल्या अनेक वर्षांपासूनचा प्रश्न राजकीय मार्गानेच सोडविला, तर अंतिम निर्णय प्राप्त होऊ शकतो आणि त्याकरिता अपेक्षित प्रयत्न झाले पाहिजेत़ गेल्या अनेक वर्षांपासून भारत-पाक दरम्यान बॉक्सिंगचा खेळ सुरू असून सारे विश्व त्यांचे अंपायर आहे, ही परिस्थिती अशीच चालू राहाणार नाही, याकरिता नियोजनबद्ध प्रयत्न होणे गरजेचे आहे.
सन १९७१ नंतर भारताने एलओसी दरम्यान ही कारवाई केली आहे. त्यावर पाकिस्तान आता प्रत्युत्तर कारवाई करणार, हे स्वाभाविक आहे. तशी तयारी भारतानेही करायला हवी, परंतु या सर्व परिस्थितीत देशातील जनतेला, विशेषत: सीमा भागातील जनतेला जे भोगावे लागते, त्याचा विचार करून अंतिम निर्णयास आणि तेही राजकीय मार्गाने पोहोचणे अत्यावश्यक आहे, तरच दोन्ही देशांतील नागरिकांचा नाहक बळी जाणार नाही. भारत-पाक उभय देशांत सुसंवाद साधण्यासाठी भारत-पाक शांतता मैत्री समितीचा एक प्रयत्न झाला आहे. त्याला यश येण्यासाठी काही काळ द्यावा लागेल, परंतु हा प्रयत्न उभय देशांनी संहारापेक्षा संवादाला महत्त्व देऊन राजकीय पाठबळाने केल्यास नक्की फरक पडू शकेल़
यासाठी दोन्ही देशांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. उभय देशांकडे अतिसंहारक शस्त्र आहेत, याचा विचार उभय देशांनी गांभीर्याने करणे आवश्यक आहे. ती वापरावी लागूच नयेत, याकरिता आवश्यक परिस्थिती निर्माण करण्यासाठी आपले प्रयत्न असले पाहिजेत़- एल.रामदास,माजी नौदल प्रमुख