- सचिन जवळकोटे
गावातील पोरांसोबत ‘सुरपाट्या’ खेळणारे अन् गाडी थांबवून रस्त्यावरची फळं खाणारे ‘भरणे मामा’ आपल्या जिल्ह्याला ‘पालक’ म्हणून लाभलेत. इंदापुरातील विरोधकांनी ज्यांना ‘पोरकटपणा’ ही उपाधी दिली, त्याच ‘दत्तामामां’च्या हातात तब्बल त्रेचाळीस लाख लोकसंख्येचा जिल्हाही सरकारनं ताब्यात दिलाय. अशातच ‘हे मामा आपल्याला किरकोळीत काढताहेत’ असा टाहो सोलापूरच्या ‘धनुष्य’वाल्या भाच्यांनी फोडलाय. त्यामुळं, रोगाची भीती राहिलीच बाजूला.. सुरपाट्या नेत्यांसोबतच्या उरफाट्या गेमागेमीचाच गवगवा जास्त झालाय. मात्र, हे असं का घडलं, यासाठी घ्यावा लागेल काही घटनांमागच्या कारणांचा शोध.
प्रसंग पहिला..
स्थळ : मोहोळ. गेल्या महिन्यात ‘होम मिनिस्टर देशमुख’ दौरा आटोपून सोलापुरातून परत निघाले होते. ते प्रथमच जिल्ह्यात आल्यामुळे त्यांच्या सत्कारासाठी ‘अनगरचे पाटील’ आपला लवाजमा घेऊन मोहोळच्या बाजार समिती कार्यालयात थांबलेले. अनेक तास त्यांना तिथं ताटकळतही बसावं लागलं. अखेर मंत्र्यांची गाडी लांबोटी पूल ओलांडून पुढं सरकली, तसा त्यांना निरोप मिळाला, ‘साहेबांकडं वेळ खूप कमी, ते आत गावामध्ये येणार नाहीत. पुलाजवळच या’ मग काय.. ‘पाटील’ येऊन उभारले हायवेच्या स्पीड ब्रेकरजवळ. गाडी आली, मंत्री उतरले.. उभ्या-उभ्याच सत्कार-बित्कार करून घेऊन काही क्षणातच गाड्या वळाल्या ढोक बाभळगाव रोडला. त्यानंतर तिथल्या एका बंगल्यात मात्र निवांतपणे चहा-पाणी-नाष्टा करून मग मंत्रीमहोदय गेले पुढच्या गावाला. ‘पाटील’ हे केवळ एक ‘अनगर’ अन् बारा वाड्यांचेच नव्हे तर अख्ख्या तालुक्याचे कर्ते-करविते. कर्ते-धर्ते, तरीही त्यांचा हार घाईघाईत रस्त्यावरच स्वीकारून लाल दिव्याची गाडी ज्या बंगल्यामसोर ‘रिलॅॅक्स’ झाली, तो होता ‘नरखेड’च्या तरण्याबांड ‘पाटलां’चा.तात्पर्य : ज्याच्या हातात सत्तेचा रिमोट, त्याचीच राहते चलती.. हा राजकारणातला पहिला नियम.
प्रसंग दुसरा..स्थळ : पंढरपूर. शासकीय महापूजेसाठी पंढरपुरात आलेल्या ‘उद्धव’ सरकारांनी कशा पद्धतीनं सा-यांना आपल्यापासून दूर ठेवलं, हे तर सविस्तर यापूर्वीच्या ‘लगाव बत्ती’मधून आपण जाणून घेतलेलंच. जिल्हाप्रमुख तर सोडाच, पक्षाच्या आमदारांनाही इथल्या ‘रेस्ट हाऊस’मध्ये होती ‘नो एन्ट्री’. मात्र अशाही वातावरणात सोलापूरच्या ‘प्रणितीताईं’ची गाडी थेट पोर्चसमोर येऊन थांबलेली. आतमध्ये ‘ठाकरे फॅमिली’शी बराच वेळ गप्पा मारून ‘ताई’ परत फिरलेल्या. ..नंतर सोलापुरात आलेल्या ‘थोरले काका बारामतीकर’ यांच्याही दौ-यात याच ‘ताई’ बराच वेळ ‘काकां’शी हक्कानं बोललेल्या. जिथं ‘काकां’च्या नावानं बँक चालविणाºया बिच्चाºया ‘मनोहरपंतां’ना पोलिसांनी रेस्ट हाऊसच्या फाटकासमोरच थांबवून ठेवलेलं, तिथं ‘ताई’ मात्र जणू त्यांच्याच पक्षाचा कार्यक्रम असल्यागत उत्साहात वावरलेल्या. खरंच.. ‘हात’वाली मंडळी खूप हुशार. आपल्या पक्षाची हुुकूमी सत्ता असताना स्वत:च्याच कार्यकर्त्यांकडं कधी ढुंकूनही नाही पाहणार; मात्र सत्ता नसताना झटकन् स्वत:ला बदलून घेत बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेणार.तात्पर्य : आपलं ध्येय साध्य करण्यासाठी कधी-कधी ‘ईगो’ही ठेवायचा असतो बाजूला.. हा राजकारणातला दुसरा नियम.
या दोन घटनांमधून दिला गेलेला संदेश ‘धनुष्यबाण’वाल्या ‘पुरुषोत्तमां’साठी खूप महत्त्वाचा. ‘अवंतीनगरी’चे हे नेते म्हणजे पाव जिल्ह्याचे प्रमुख. चार जिल्हाप्रमुख म्हणून पाव जिल्हा बरं का. मात्र यांचं दमदार व्यक्तिमत्त्व तसं संपूर्ण जिल्ह्याचं नेतृत्व करण्याजोगं.. तरीही कोण-कुठले बाहेरचे ‘पालक’ आपल्याला गिनत नाहीत, असा सूर काढून आळवत बसणं सैनिकांसाठी जणू लाजीरवाणं. जिथं ‘सीएम’च ज्यांच्या पक्षाचे, त्यांनी कसं रुबाबात प्रशासनावर रोब राबविला पाहिजे. ते राहिलंच बाजूला, उलट विरोधकांसारखी अन्यायाची भाषा करणं, भलतंच धक्कादायक.
खरंतर, सेनेचा हा ‘रिटर्न ऑफ दि जिल्हाप्रमुख’ सोलापुरात एकेकाळी ओळखला जायचा ‘डॉन’ म्हणून. शहरातील दोन नंबर धंद्याविरुद्ध कमिशनर ऑफिससमोर आंदोलन करण्याइतपत दाखविलं होतं धाडस. अनेक प्रकरणात घेतली होती आक्रमक भूमिका; मात्र सुरुवातीला काढलेली पत्रकं अन् दिलेल्या घोषणा नंतर कुठं गायब (!) झाल्या, याचा कधी लागलाच नाही शोध सोलापूरकरांना. सरस्वती चौकातल्या एका हॉटेलातून सुरू केलेल्या राजकारणानं त्यांना पोहोचविलं थेट जिल्ह्याच्या नेतृत्वापर्यंत. तरीही ते का अडकून पडले गल्ली-बोळातल्या गटबाजीतच ?कदाचित हा त्यांचाही नसावा दोष. राज्यात त्यांचीच सत्ता. पालिकेतही तेच सर्वात मोठे विरोधक. तरीही शहराच्या राजकारणात म्हणावा तसा मान न मिळण्यामागची कारणं खूप. ज्यांच्या नेतृत्वाखाली पालिकेत तब्बल बावीस मेंबर निवडून आले, ते ‘महेशआण्णा’च मुळात वॉर्डाच्या राजकारणातून कधी बाहेरच पडू न शकलेले. ‘स्टँडिंग कमिटी म्हणजे जीव की प्राण’ याच मानसिकतेचा आदर्श इतर सहका-यांनीही घेतलेला. वॉर्डातल्या साध्या दोन-पाच ‘पेटीं’च्या गटार कामातही हात धुऊन घेण्याची चटक लागलेली. त्यामुळंच नेहमी बलाढ्य ‘खोक्या’त रमणाºया ‘हात-घड्याळ’वाल्या मंडळींनी कधीच दिलं नाही यांना जवळ फिरकू. यांची ‘पोहोच’ त्यांना समजलेली, मात्र त्यांचा ‘आवाका’ यांना कधीच न कळालेला. त्याचाच परिपाक म्हणजे ‘भरणे मामां’नी यांना आजपावेतो अक्षरश: किरकोळीत काढलेलं.
मात्र ‘थोरल्या काकांचा विश्वास जपत धाकट्या दादांना हँडल करणं’ ज्यांना जमलं, त्या ‘मामां’ना सोलापूरची राजकीय परिस्थिती हाताळणं तसं खूप अवघड. असो. पोरांसोबत मैदानात रमणा-या अन् रस्त्यावरचे पेरू खाण्यात मग्न होणा-या पाहुण्या मंडळींचा स्वभाव बदलवत बसण्याच्या भानगडीत न पडता स्थानिक ‘धनुष्य’वाल्यांनी आता एकच काम करायला हवं, सत्तेचा रिमोट हातात ठेवायचा असेल तर ईगो सोडून दुश्मनांना मित्र बनवायला हवं, तरच ‘माजी पालकां’च्या म्हणजे ‘देशमुखां’च्या गाडीतल्या एसीची सवय लागलेल्या शरीराला मिळेल पुन्हा एकदा थंडगार हवा. लगाव बत्ती.
जाता-जाता : जिल्ह्याला नवा ‘धनुष्य’वाला ‘प्रभू’ मिळणार, ही ब्रेकिंग न्यूज परस्पर लिक करणा-या मोहोळच्या ‘क्षीरसागरां’ना सोलापुरातून तत्काळ कॉल गेलेला, ‘आम्हीच प्रमुख हाव, आमच्यावर अतिक्रमण करायचं नाय !’ आता आलं का लक्षात ? आमच्यामुळेच जिल्ह्यात नवा बदल घडतोय, हे दाखविण्यासाठी तर नसेल ‘मामां’वर साधला उगीउगी निशाणा ? लगाव बत्ती...
(लेखक 'सोलापूर लोकमत'चे निवासी संपादक आहेत.)