कविवर्य लक्ष्मीनारायण बोल्ली यांनी आंतरभारतीची भूमिका घेऊन लेखन केले. तेलुगू आणि मराठी भाषेतील साहित्याचे विपुल प्रमाणात आदान - प्रदान केले. सर्वच साहित्यप्रकार त्यांनी लीलया हाताळले. रसिकांना आनंद देणा-या या कवी, चित्रकार, नाटककाराने २३ फेब्रुवारी रोजी या जगातून ‘एक्झिट’ घेतली.रंध्री रंध्री माझ्या़, आंध्री भाषा जरीमंद्र गीत उरी, मराठीचेमराठीचे झाड, होऊनि अश्वत्थकरिते अस्वस्थ, दिनरातसोलापूर ही बहुभाषिकांची नगरी. इथे मराठी, कन्नड, तेलुगू आणि उर्दू भाषिक सोलापूरकर म्हणून गुण्यागोविंदाने राहतात. नाटक, गाणं आणि साहित्यात रुची असलेले कलावंत-साहित्यिक आपल्या मातृभाषेच्या माध्यमातून जशी कलेची उपासना करतात, त्याआधी मराठीच्या दरबारात त्यांची सेवा रुजू झालेली असते. कविवर्य लक्ष्मीनारायण बोल्ली असेच मराठीचे थोर अमराठी उपासक. ते आवर्जून सांगतात, माझ्या रंध्रा रंध्रात तेलुगू अर्थात आंध्री भाषा आहे; पण उरातलं गीत मराठीचंच. अवघ्या मराठी साहित्यरसिकांना गेल्या चार दशकात आपल्या तरल, प्रांजळ कवितांचा अनुभव देणाºया या महान कवीने गत शुक्रवारी (दि. २३ फेब्रुवारी) साहित्यशारदेची सेवा करत करत अखेरचा श्वास घेतला. खरं तर बोल्ली म्हणजे एक आश्चर्यच! एका राजकारणी आणि उद्योजक घराण्यात या माणसाचा जन्म झाला. शिक्षण आणि कलेला घरातून कोणत्याही प्रकारचं प्रोत्साहन नव्हतं. शिक्षणही जेमतेम मॅट्रिकपर्यंतच; पण साहित्य, नाटक आणि चित्रकलेत या माणसानं हुकूमत गाजवली. कविता, कादंबरी, अनुवादापासून सर्वच साहित्यप्रकार त्यांनी हाताळले. तौलनिक अभ्यासाचे त्यांच्या लेखणीतून उतरलेले ‘तेलुगू फुलांचा मराठी सुगंध’, ‘दक्षिण भाषेतील रामायणे’ हे ग्रंथ अजोड आहेत. साहित्य आणि कलेच्या प्रांतात एखाद्या राजासारखं वावरणारा हा माणूस मात्र साधूवृत्तीचा होता. लहान-थोर, ज्ञानी-अज्ञानी कुणीही असो साºयांचे स्वागत ते ‘देवा’ असे संबोधूनच करायचे. वैराग्यभावही त्यांच्या ‘रंध्री रंध्री’ होता. एका अमराठी माणसानं मराठी साहित्यात अष्टपैलू कामगिरी करूनही त्याची समीक्षकांनी फारशी दखल घेतली नाही, याबद्दलची खंतही त्यांना कधी वाटली नाही.सर्वांना समजून घेणारे, सामावून घेणारे कविवर्य बोल्ली यांनी आयुष्यभर आंतरभारतीची भूमिका घेऊन लेखन केले. तेलुगू आणि मराठी भाषेतील साहित्याचे विपुल प्रमाणात आदान-प्रदान केले. अभंग कलश (वचनानुवाद), पंचपदी (तेलुगू कथांचा अनुवाद), संत वेमन्ना (तेलुगू वचनांचा अनुवाद), यकृत (नाट्यानुवाद), कमलपत्र (चरित्रानुवाद), राजर्षी शाहू छत्रपती (तेलुगू चरित्र) या त्यांच्या आंतरभारतीच्या साहित्यकृती. बोल्ली हे दीर्घकाळ कवितेच्या प्रांतात वावरले. त्यांचा कवितेचा प्रवास १९७८ साली ‘मैफल’ या काव्यसंग्रहाने सुरू झाला. बोरकरांची ‘मैफल’ला प्रस्तावना लाभली. १९८२ साली प्रकाशित झालेल्या ‘झुंबर’ या काव्यसंग्रहाची प्रशंसा पु.ल. देशपांडे यांनी केली. कुसुमाग्रजांच्या प्रस्तावनेसह ‘झुंबर’ रसिकांच्या हाती आलं. त्याकाळी मुलांचं ‘चांदोबा’ हे मासिक खूपच लोकप्रिय होतं. सर्व भारतीय भाषांमधून ते प्रकाशित व्हायचं. बोल्ली यांचे साहित्यात नाव झालेले होते. ‘चांदोबा’च्या प्रकाशकांना ते ठाऊक होतं. त्यांनी बोल्ली यांना ‘चांदोबा’च्या संपादकपदाची जबाबदारी दिली; पण ते चेन्नईत फारसे रमले नाहीत, पुन्हा सोलापुरी आले अन् मायमराठीची सेवा सुरू केली. ‘एका साळिया’ने या आत्मचरित्रातील त्यांनी मांडलेला स्वत:चा जीवनप्रवास थक्क करणारा आहे. जीवनावर प्रेम करणारा हा थोर कवी नेहमीच साहित्यानंदात मग्न असायचा अन् सांगत राहायचा, जगणं सुंदर आहे, मरणं सुंदर आहे, जगण्या-मरण्यातील उरणं सुंदर आहे!-रवींद्र देशमुख
जगणं, उरणं अन् मरणं सुंदर करून गेलेला एक साळिया!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2018 12:11 AM