सुशांत सिंह राजपूत प्रकरणातला ‘सुकामेवा’ रडारवर
By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2020 04:28 AM2020-09-03T04:28:18+5:302020-09-03T04:34:07+5:30
प्रकरणे भल्या-बुऱ्या पद्धतीने हाताळण्याचा ‘सीबीआय’चा स्वत:चा एक इतिहास आहे. त्यांच्याकडून काही वेळा गुन्हेगार जाळ्यातून सुटले असतील किंवा राजकीय दबावामुळे तपासाला विलंबही झाला असेल.
- हरीष गुप्ता
(राष्ट्रीय संपादक, लोकमत समूह)
अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाकडे दिल्लीतील सत्ता वर्तुळात बारकाईने लक्ष ठेवले जात असून, ‘सीबीआय’ व ‘ईडी’ ज्या प्रकारे हे प्रकरण हाताळत आहेत त्याने या वर्तुळात कमालीची नाराजी आहे. या दोन्हीही केंद्रीय तपासी यंत्रणा अजूनही अंधारात चाचपडत आहेत. प्रकरणे भल्या-बुऱ्या पद्धतीने हाताळण्याचा ‘सीबीआय’चा स्वत:चा एक इतिहास आहे. त्यांच्याकडून काही वेळा गुन्हेगार जाळ्यातून सुटले असतील किंवा राजकीय दबावामुळे तपासाला विलंबही झाला असेल.
पण ‘सीबीआय’ने एखाद्या निरपराध व्यक्तीला मुद्दाम एखाद्या प्रकरणात कधी गोवल्याने गेल्या ४० वर्षांच्या अनुभवावरून मला तरी आठवत नाही. ‘ईडी’ सध्या प्रकाशझोतात असली तरी तपास करून यशस्वी अभियोग चालविल्याचे त्यांचे रेकॉर्ड काही फारसे चांगले नाही. शेवटी आता थेट केंद्रीय गृहमंत्रालयाच्या अखत्यारित असलेला ‘अंमली पदार्थविरोधी ब्युरो’ (एनसीबी) मैदानात उतरला आहे. या ब्युरोचे सध्याचे प्रमुख राकेश अस्थाना अमित शहा यांचे अत्यंत विश्वासू आहेत. सुशांत सिंहच्या प्रकरणात एखाद्या रोमांचकारी बॉलिवूड चित्रपटाप्रमाणे व्यसनाधीनता, लैंगिक संबंध, पैशाचा खेळ व परदेश वाºया असा सर्व प्रकारचा मसाला आहे. तात्काळ अटक करण्याचे अनिर्बंध अधिकार ‘एनसीबी’ला आहेत.
या प्रकरणात ‘सुकामेवा’ खरेदी करण्याच्या नावाखाली अंमली पदार्थांचा व्यापार करणाऱ्यांना लाखो रुपये दिल्याचे सुगावे चॅट््सच्या रूपाने उपलब्ध आहेत. शिवाय याला साथ द्यायला रिया आणि मंडळीही आहेत. ‘सीबीआय’ व ‘ईडी’ यांनी ‘आम्ही काही करू शकत नाही’, असे म्हणून हात झटकले की, ‘एनसीबी’ लगेच पुढे सरसावेल. किंवा ‘एनसीबी’ त्यांच्याकडचे डग्जचे प्रकरण तपासासाठी ‘सीबीआय’कडे सोपवेल, असे समजते.
तसे झाले तर ‘सीबीआय’ सर्व मुख्य संशयिताना अटक करेल व त्याने देशाच्या ‘दुखºया मना’वर फुंकर घातली जाईल. अशा ड्रग्जच्या प्रकरणात लवकर जामीन मिळत नाही व अपिलही करता येत नाही!
काँग्रेसमधील संकटाचे ‘फॅमिली कनेक्शन’
काँग्रेसमधल्या अंतर्गत संकटाशी समाजवादी पक्षाच्या खासदार जया बच्चन यांचा काय संबंध असू शकतो? गांधी व बच्चन कुटुंबांचे ३० वर्षांपूर्वीच बिनसले आहे; पण काँग्रेसमधील सध्याचे संकट अनाहूतपणे या माजी बॉलिवूड अभिनेत्रीमुळे उभे ठाकलेले असू शकते. गेल्या वर्षी संसदेच्या हिवाळी अधिवेशनात भाजपच्या एका खासदाराने राज्यसभेत व्यक्तिगत चारित्र्यहनन होईल अशा प्रकारे राहुल गांधी यांच्यावर असंसदीय भाषेत टीका करायला सुरुवात केली. त्यावेळी जया बच्चन सभागृहात हजर होत्या. त्यांनी तो सदस्य वापरत असलेल्या भाषेला जोरदार आक्षेप घेतला. त्या उठून विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांच्या आसनापर्यंत गेल्या व त्यांनी ही बाब त्यांच्या निदर्शनास आणली. आझाद यांनी जया बच्चन यांच्या सांगण्याकडे बहुधा फारसे लक्ष दिले नाही. मग जया बच्चन यांनी हरकतीचा मुद्दा उपस्थित करून पीठासीन अधिकाºयांना त्या वक्त्याला थांबविणे भाग पाडले. दुसºया दिवशी सोनिया गांधींनी मुद्दाम भेटून जया बच्चन यांचे आभार मानले. पण त्याचबरोबर आझाद यांच्या बेफिकिरीवर सोनियाजी खूप नाराज झाल्या होत्या. काही महिन्यांनी मल्लिकार्जुन खारगे यांना अचानकपणे राज्यसभेवर निवडून आणले गेले. आझाद यांनाही पुन्हा उमेदवारी दिली गेली नाही. आझाद यांची विरोधी पक्षनेतेपदाची मुदत येत्या फेब्रुवारीत संपली की ते पद खारगे यांच्याकडे जाईल, असे समजते. त्यामुळे आपण विरोधी पक्षनेते होऊ हे आनंद शर्मा यांचे स्वप्नही धुळीला मिळाले आहे. आता गांधी घराण्याच्या नेतृत्वाविरुद्ध ज्या २३ काँग्रेस नेत्यांनी (जी-२३ क्लब) सोनियाजींना पत्र लिहिले त्यात आझाद व शर्मा हे दोघेही नाराज आत्मे आहेत. हे सर्व होण्यात जया बच्चन यांचा म्हटले तर थेट काहीच संबंध नाही. पण त्यांनी अनाहुतपणे सोनियाजींच्या दुखºया नसेवर बोट ठेवले व त्याची किंमत आझाद यांना मोजावी लागली. पुढच्या वर्षी ते खºया अर्थाने ‘आझाद’ होतील!
भाजपची फेररचना बारगळली
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा नाराज असण्याची अनेक कारणे आहेत. अध्यक्ष होऊन वर्ष झाले; पण त्यांना अजून हवे तसे पक्ष संघटनेत बदल करता आलेले नाहीत. राजस्थानमध्ये ‘बंडा’च्या माध्यमातून काँग्रेसकडून सत्ता हिसकावून घेणे त्यांना जमले नाही. राजस्थानचे प्रकरण थेट ते हाताळत नव्हते व अशा नाजूक गोष्टी शेवटी ‘नॉर्थ ब्लॉक’मध्ये बसलेली व्यक्ती काय करते यावरच बव्हंशी अवलंबून असतात. पक्षातील संघटनात्मक फेररचनेचाही मंत्रिमंडळात होणाºया फेरबदलांशी संबंध असतो. बहुधा मोदींनी आपल्या ६५ मंत्र्यांच्या टीमची फेररचना करण्याबाबत अद्याप अंतिम निर्णय केला नसावा. आजपासून ‘पितृपक्ष’ सुरू होईल व आणखी काही दिवसांनी संसदेचे पावसाळी अधिवेशनही सुरू होईल. प. बंगालमधील वजनदार नेते मुकुल रॉय, मध्य प्रदेशचे ‘सिंह’ ज्योतिरादित्य शिंदे, भूपेंद्र यादव व जद (यू)मधील काही जण मंत्रिपदासाठी बाशिंग बांधून बसले आहेत. पण त्यांनाही काही काळ प्रतीक्षा करावी लागेल. राज्यसभेचे विद्यमान उपसभापती हरिवंश यांची याच पावसाळी अधिवेशनात पुन्हा त्या पदावर फेरनिवड होईल की बिहार विधानसभा निवडणुकीचे निकाल लागेपर्यंत त्यांनाही थांबावे लागेल, हेही अद्याप नक्की नाही.