- विनय सहस्रबुद्धे, भाजपचे उपाध्यक्षसुषमा स्वराज या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाच्या नेत्या होत्या. सुरुवातीच्या काळात अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, पुढे राजकारणासोबतच त्यानंतरच्या काळात प्रशासनातही त्यांनी कुशल नेतृत्वगुणाचा ठसा उमटवला. त्या भाजपच्या पहिल्या महिला प्रवक्त्या, दिल्लीच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री आणि देशाच्या पहिल्या पूर्णकालीन परराष्ट्रमंत्री होत्या. त्यांच्या कार्यशैलीत संघटनात्मक गुण आणि प्रशासकीय कौशल्य सुस्पष्ट होते. सर्वसामान्य नागरिक असो, कार्यकर्ता असो किंवा मोठा नेता, प्रत्येकालाच त्या आपली बहीण किंवा घरातील सदस्य आहेत, असे वाटायचे. त्यांच्या स्वभावातील याच आपलेपणामुळे राजकीय पक्षांच्या सीमा त्यांनी सहज पार केल्या.परराष्ट्र मंत्रालयाला राष्ट्रीय ओळख मिळवून देण्यासाठी आणि आंतरराष्ट्रीय नेत्यांसोबत भारताचे सलोख्याचे संबंध प्रस्थापित करण्यासाठी यशस्वी ठरलेल्या परराष्ट्रमंत्र्यांच्या यादीत त्यांचेही नाव आदराने घेतले जाईल. त्यांनी परराष्ट्र मंत्रालयाला लोकाभिमुख केले. देशाबाहेर आलेल्या आपत्तीचा सामना करून तेथे अडकलेल्या लोकांना सुखरूप सोडवणे, मदत व बचावकार्य उपलब्ध करून देणे यासाठी त्या सदैव तत्पर असायच्या. त्या म्हणायच्या, ‘बचाव कार्य हे फक्त एक ट्विट करण्याइतपच बाकी आहे.’ मदत-बचाव कार्यात त्यांनी मिळवलेल्या याच यशामुळे अमेरिका, ब्रिटन, ऑस्ट्रेलिया, येमन आणि अन्य देशांत अडकलेल्या आपल्या नागरिकांच्या सुटकेसाठी आग्रह होऊ लागला. सुषमाजींच्या मनात सर्वांप्रति असलेले प्रेम, चातुर्य, कौशल्य आणि राजनैतिक दृष्टिकोन यामुळेच हे शक्य होऊ शकले. जे अमेरिकेला शक्य झाले नाही, तेदेखील त्यांनी करून दाखवले.भारताला लाभलेली सांस्कृतिक संपदा हे अनमोल देणे. त्याच्या विकासासाठी त्यांनी ‘आयसीसीआर’ला (भारतीय सांस्कृतिक संबंध परिषद) विकसित करण्यासाठी बरीच मेहनत घेतली. नेपाळमध्ये भारतविरोधी सूर आळवला जात असल्याचे लक्षात येताच त्यांनी त्या वेळी अशा विद्यार्थ्यांची माहिती मागवली, ज्यांना आयसीसीआरच्या माध्यमातून शिष्यवृत्ती देण्यात आली असेल. आयसीसीआरद्वारे दरवर्षी हजारो परदेशी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात येते. मात्र, त्या वेळी अशा प्रकारे शिष्यवृत्ती देण्यात आलेल्यांची नोंद ठेवण्याची व्यवस्था नव्हती. ही अतिशय साधी, परंतु महत्त्वपूर्ण बाब होती. त्यामुळेच सर्वांत आधी त्यांनीच यासाठी ‘अॅडमिशन टू अॅल्यूमिनाय’ डेटाबेसची व्यवस्था तयार केली.सुषामाजींनी दूतावासाला लोकाभिमुख केले. यामुळे पासपोर्ट, व्हिसा आणि अन्य कामांसाठी दूतावासांकडे जबाबदारीचे भान आले. अटलजींच्या कार्यकाळात माहिती आणि प्रसारणमंत्रिपदाची जबाबदारी त्यांनी चोखपणे बजावली. त्यांनी चित्रपटनिर्मितीला व्यवसायाचा दर्जा दिला. चित्रपटांची निर्मिती करणे सोपे झाले. याचप्रमाणे ज्या कोणत्या क्षेत्रात त्यांनी काम केले तेथे आपल्या कर्तृत्वाचा अमीट ठसा उमटवला. मी त्यांना प्रतिष्ठित राजकारणाची प्रतिनिधी मानतो. राजनैतिक स्पर्धा असूनही कौतुकास्पद काम करून सर्वांसोबत सलोख्याचे संबंध, उत्तम संपर्क प्रस्थापित करण्याच्या कामात त्या कायम अग्रस्थानी राहिल्या.
कुशल नेतृत्वाचा अमीट ठसा उमटविणारे व्यक्तिमत्त्व
By ऑनलाइन लोकमत | Published: August 08, 2019 4:23 AM