- सविता देव हरकरेउन्हाची चाहूल लागतेय. पारा वाढू लागलाय. यंदाचा उन्हाळा अधिक कडक असणार असा अंदाज वर्तविला जातोय. त्याची अनुभूतीसुद्धा व्हायला लागलीय. आपल्याला येणाºया दिवसात भीषण उष्णतेचा सामना करावा लागणार आहे. हवामान खात्याच्या सांगण्यानुसार यंदा मार्च ते मे महिन्यापर्यंत तापमान गेल्या ५० वर्षांच्या तुलनेत १ अंश सेल्सिअसने जास्त असणार आहे. तसे तर देशभरातच तापमान फार जास्त राहण्याची शक्यता आहे. परंतु उत्तर भारतात या काळात सूर्य अधिक आग ओकेल, असा अंदाज आहे. दिल्ली, हरियाणा, पंजाब आणि राजस्थानात सामान्यापेक्षा दीड अंश जास्त तापमान राहील, अशी शक्यता आहे. हिमाचल प्रदेश, उत्तराखंडसारख्या पहाडी भागांमध्ये तर ते सामान्यापेक्षा २.३ अंश सेल्सिअसवर जाईल, अशी भीती आहे. इकडे मुंबईसह महाराष्टÑात उष्णतेच्या झळा बसू लागल्या आहेत. फेब्रुवारीच्या अखेरीसच तापमान सामान्यापेक्षा जास्त होते. दरम्यान वाढत्या उष्म्यासोबतच ठिकठिकाणी पाणी टंचाईचा प्रश्नही उद्भवू लागलाय. अनेक जिल्ह्यांमध्ये धरणातील पाणीसाठ्याच्या भरवशावर मार्चपर्यंत पिण्याच्या पाण्याची समस्या राहणार नसली तरी त्यानंतरचे तीन महिने मात्र कठीण असणार आहेत. विदर्भातील भंडारा, गोंदिया, यवतमाळ आदी जिल्ह्यांमध्ये तर आतापासूनच पाण्याचे दुर्भिक्ष जाणवू लागलेय. मराठवाड्यातील निम्म्या भागात यंदा अत्यल्प पाऊस झाला. या क्षेत्रात येणाºया हजारो गावांमध्ये पाणी टंचाईचे सावट आहे. औरंगाबाद, नांदेड, जालना आदी जिल्ह्यातील अनेक गावात टँकरने पाणीपुरवठा सुरू करावा लागला असल्याची माहिती आहे. तसे बघता दरवर्षी उन्हाळा आला की पाणी टंचाईची समस्या निर्माण होणे हे काही नवीन नाही. पण ‘नेमेची येतो पावसाळा...’ असे मानत आम्ही तहान लागल्यावर विहीर खोदायला निघतो. अनेक जिल्हा प्रशासनाने आता कुठे पाणीटंचाई निवारणासाठी आराखडे तयार करणे सुरू केले आहे. काहींनी यासाठीच्या विविध योजनांवर होणाºया खर्चाची माहिती शासनदरबारी कळविली आहे. पण त्यावर वेळीच योग्य कार्यवाही होणे अपेक्षित आहे. आपल्या पूर्वजांना हजारो वर्षांपूर्वी पाण्याचे महत्त्व समजले होते. यामुळेच त्यांनी कुंड, तलाव, जोहड, बावड्या अशा पाणी साठविण्याच्या वेगवेगळ्या व्यवस्था विकसित केल्या. पण विकासाच्या हव्यासापोटी आम्ही ही व्यवस्था नष्ट केली. एकेकाळी वर्षभर पाण्याने तुडुंब भरून राहणारे गावागावांमधील लहानलहान तलाव आणि कुंड आता ओसाड पडले आहेत. अनेक तलाव तर अतिक्रमणाच्या विळख्यात नष्ट झाले. पाणी संचयनाच्या या जुन्या पद्धतींचे महत्त्व आम्ही जाणले नाही, हे आमचेच दुर्दैव म्हणायचे. नद्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. आदीम काळापासून मानवी संस्कृती नद्यांच्या काठाकाठाने, तिच्या मदतीनेच फुलली, बहरली. परंतु इतर नैसर्गिक संसाधनांप्रमाणेच पाण्याचाही अतिवापर, प्रदूषण तसेच वाढत्या अतिक्रमणामुळे मानवच या नद्यांचा सर्वात मोठा शत्रू बनला आहे. जंगलांवरील अतिक्रमण, अंदाधुंद वृक्षतोड, औद्योगिकरण, वाढते प्रदूषण आणि इतर कारणांमुळे पावसाचे संपूर्ण तंत्रच बिघडवून टाकले आहे. दुसरीकडे भूजल साठे वेगाने कमी होत आहेत. भारताचा विचार केल्यास भूजलाचा ७२ टक्के उपसा आपण केला आहे. महाराष्टÑातील परिस्थिती तर आणखी भीषण आहे. अशात आपल्याकडे उपलब्ध असलेल्या पाणीसाठ्याचा योग्य आणि काटकसरीने वापर करणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे.
उन्हाची चाहूल, पाणीटंचाई अन् नागरिकांची जबाबदारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2018 12:25 AM