- प्रल्हाद जाधवमधमाशा फुलातील मध गोळा करून पोळ्यात आणून साठवतात हे सर्वांनाच माहीत आहे. पण हा प्रवास खोलात जाऊन समजून घेणे आनंदाचा बोनस मिळवण्यासारखे आहे. काही फुलातील मध गोड असतो, काहीतील आंबट, काहीतील तुरट, काहीतील खारट तर काही फुलांतील चक्क विषारी असतो. हा सर्व मध पोळ्यात एकत्र आल्यानंतर हळूहळू स्वयंप्रक्रि येने तो गोड होत जातो आणि मग खाण्यालायक होतो. पक्षिनिरीक्षक आणि लेखक मारुती चितमपल्ली यांच्या तोंडून ऐकलेली ही गोष्ट ! आपण फुलातील मध असा शब्दप्रयोग करतो; पण भाषेच्या दृष्टीने त्यात थोडी सुधारणाही करायला पाहिजे. फुलात असतो तो मकरंद आणि पोळ्यात असतो तो मध. इंग्रजीत हे शब्द अनुक्रमे नेक्टर आणि हनी म्हणून वापरले जातात. मधमाशांचे जे पोळे असते त्यातील प्रत्येक घर षटकोनी आकाराचे असते. ते का, तर कमीत कमी जागेत जास्तीत जास्त मध साठवता यावा म्हणून ! षटकोनात स्पेस जास्त मिळतो हे आपल्याला माहीत आहे. मधमाशांच्या जगात कार्पेट आणि बिल्टप असा हिशेब नसतो तिथे फक्त कार्पेट हा शब्द अस्तित्वात असतो. शिवाय षटकोनाचे ज्ञान मिळवण्यासाठी मधमाशांना कोणत्याही अभियांत्रिकी महाविद्यालयात शिकायला जावे लागत नाही. आणखी एक विशेष म्हणजे, पोळे बांधण्यासाठी जे मेण लागते ते मधमाशांना बाहेरून आणावे लागत नाही तर त्याचे उत्पादन त्या आपल्या पोटातूनच करत असतात. प्रत्येक फुलातील मकरंद जसा वेगळ्या चवीचा तसेच प्रत्येक माणूस वेगळ्या स्वभावाचा ! कोणी प्रेमळ, कोणी रागीट. कोणी गर्विष्ठ, कोणी नम्र. कोणी मुत्सद्दी, तर कोणी भाबडा ! पण अशी सारी माणसे जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्यांचा समाज बनतो. माणसे समूहाने एकत्र येतात तेव्हा त्यांचा एकच चेहरा झालेला असतो. सार्वजनिक ठिकाणी माणसांचे वर्तन सभ्य आणि सुसंस्कृत असते. साऱ्यांचे बरे-वाईट स्वभाव एकत्र मिसळून त्यातून एक गोड स्वभाव जन्माला आलेला असतो. माणसाच्या एकजिनसीपणातून आणि एकत्रित कृतीतून सामाजिक विकासाचे नवनवे प्रकल्प उभे रहात असतात, रचनात्मक कार्याच्या नवनव्या दिशा उदयाला येत असतात. मधाचे पोळे हे अशा समाजाचे एक प्रतीक आहे असे मला वाटते. कार्यकर्त्यांचे मोहोळ हा सुंदर शब्दप्रयोगही जाणिवेच्या याच झऱ्यातून उमललेला असणार यात शंका नाही. माणसाला सोशल अॅनिमल असे का म्हटले जाते आणि त्याने तसे का असावे याचे ते एक सुंदर उदाहरण आहे.
मधाचा गोडवा
By admin | Published: March 10, 2017 5:35 AM