- सुकृत करंदीकर(सहसंपादक, लोकमत, पुणे)
इतिहासात रमण्यात काही अर्थ नसतो हे क्रिकेटमध्ये शंभर टक्के सत्य आहे. त्यातही हे क्रिकेट ‘ टी-ट्वेन्टी ’चं असेल तर, मग इतिहास अगदी निरर्थक ठरतो. आजवरच्या वन-डे आणि टी-ट्वेन्टी विश्वचषकातल्या सलग बारा सामन्यांत पाकिस्तानला भारताने नमवले हा इतिहास होता. ही परंपरा कायम राहावी अशी भारतीय क्रिकेटप्रेमींची स्वाभाविक इच्छा होती. पण, कधीतरी ही परंपरा भंग पावणार हेही सच्चा क्रिकेटप्रेमी जाणून होता. तेराव्या सामन्यात तेच घडले. पाकिस्तानने दहा गडी राखून भारताला चारीमुंड्या चीत केले. खरे तर, बाबर आझमच्या ज्या संघाने विराटच्या संघाला हरवले त्या पेक्षा कितीतरी उच्च गुणवत्तेचे संघ पाकिस्तानकडे यापूर्वी होते. इम्रान, वकार, अक्रम, सकलेन यासारख्या ‘ऑल टाईम ग्रेट’ गोलंदाजांच्या तगड्या तोफखान्यालाही भारताला कधी हरवता आले नाही.
इंझमाम, सईद अन्वर, जावेद मियांदाद सारख्या ‘क्लासिक’ फलंदाजांना भारतीय गोलंदाजी नेस्तनाबूत करता आली नाही. या दिग्गजांच्या तुलनेत किरकोळ असलेल्या बाबर आझमच्या पाकिस्तानने भारताला सहज हरवले. विश्वचषकात पाकिस्तान भारताला हरवू शकत नाही, हा इतिहास त्यांनी दमदार कामगिरीने पुसून टाकला. दहा गडी आणि तेरा चेंडू राखून प्रचंड विजय मिळवला. हीच तर आहे क्रिकेटमधली सुंदर अनिश्चितता ज्यासाठी चाहते क्रिकेटसाठी वेडे होतात. वास्तविक वन-डे असो की, टेस्ट क्रिकेट ; पाकिस्तान नेहमीच भारताला वरचढ ठरला आहे. ऐंशी-नव्वदच्या दशकापर्यंत पाकिस्तान विरुद्धच्या आखातातील सामन्यांमध्ये ‘शारजा म्हणजे हार जा’ असे समीकरण बनून गेले होते. धारदार आणि भेदक गोलंदाजी हे पाकिस्तानचे अत्यंत प्रभावी अस्त्र राहिले आहे. एका मागून एक जागतिक दर्जाचे वेगवान गोलंदाज पाकिस्तानातून पैदा होतात. दुसरीकडे तंत्रशुद्ध, दर्जेदार फलंदाज हे भारताचे शक्तिस्थळ. पण, बहुतेकदा पाकिस्तानी गोलंदाजांच्या आक्रमक अविर्भावापुढेच भारतीय फलंदाजी कोसळायची.
नव्वदीच्या उत्तरार्धात हे चित्र हळूहळू बदलत गेले. २००० नंतर तर, भारताचा संघ पाकिस्तानला सातत्याने हरवू लागला. विशेषतः विश्वचषकात भारताचे हे सातत्य वाखाणण्याजोगे होते. क्रिकेटमधले तंत्र, कौशल्य, तंदुरुस्ती या सगळ्यांमध्ये आलेली व्यावसायिकता आणि सफाईदारपणा याला कारणीभूत होता. त्याहीपेक्षा महत्त्वाची होती ती मानसिकता. पाकिस्तानविरुद्ध खेळतानाची पारंपरिक पराभूत मानसिकता भारतीय क्रिकेटपटूंनी झटकली. पाकिस्तानी खेळाडूंना समजेल अशा इरसाल भाषेत प्रत्युत्तर देण्यात भारतीय क्रिकेटपटू मागे हटत नव्हते. दीडशे किलोमीटर प्रति तास वेगाने चेंडू फेकण्यासाठी कोणी अख्तर किंवा उमर गुल अंगावर धावत आला तरी भारतीय क्रिकेटपटू निधड्या छातीने त्याला क्रिज सोडून, स्टंप सोडून हवे तिकडे फेकू लागले.
जगभरच्या सर्वोत्तम खेळाडूंना घेऊन खेळली जाणारी इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) अवतरल्यानंतर भारतीय क्रिकेटपटूंमधल्या गुणवत्तेला आणखी धार आली. जगातील अव्वल खेळाडूंसोबत नेट्समध्ये खेळण्याची संधी मिळाल्याने भारतीय खेळाडूंचा आत्मविश्वास वाढला. हे सगळे त्यांच्या देहबोलीत दिसू लागले. पण, जे भारतीय खेळाडूंच्या बाबतीत घडले तीच संधी जगभरच्या खेळाडूंनाही मिळाली. पाकिस्तानी खेळाडूंना भलेही आयपीएल मध्ये स्थान नसेल, पण, ते ऑस्ट्रेलिया, श्रीलंका, बांगलादेश, कॅरेबियन बेटे आदी विविध ठिकाणच्या ‘टी-ट्वेन्टी लीग’मध्ये नियमितपणे खेळतात. साहजिकच आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळण्याचा आत्मविश्वास त्यांच्याकडेही तितकाच आहे. ऐंशी-नव्वदच्या दशकातला पाकिस्तानी संघही दबावाखाली कोलमडून जायचा. अव्वल फलंदाज तंबूत परतले की, उर्वरित फळी मान टाकायची. कपिल देवच्या भारताने दिलेले सव्वाशे धावांचे आव्हान पेलताना इम्रान खानचा संघ ८७ धावात गुंडाळला गेला होता. त्याच दुबईत परवा रात्री मोहम्मद रिझवान आणि आझम बाबर या दोघांनी दीडशे पार विजयी धाव घेईपर्यंत क्रिज सोडले नाही यातून त्यांची व्यावसायिकता दिसून आली.
टी ट्वेन्टी विश्वचषकाच्या पहिल्याच सामन्यात विक्रमी आणि ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर भारतीय क्रिकेट प्रेमींमध्ये निराशेच्या, संतापाच्या लाटा उसळल्या आहेत. पाकिस्तानात फटाके फुटत आहेत. पण, पाकिस्तानी कर्णधार बाबर आझम हा स्वतः एका मर्यादेपलीकडे भारावून गेला नाही. विराट कोहलीही खचलेला नाही. कारण ही मंडळी गेली अनेक वर्षे आंतरराष्ट्रीय स्तरावर उच्च पातळीचे क्रिकेट खेळत आहेत. टी-ट्वेन्टी मधली स्पर्धात्मकता कोणत्या टोकावर जाऊन पोहोचली आहे याची त्यांना पक्की जाण आहे. एखादा विजय तुमचे वर्चस्व सिद्ध करण्यासाठी तोकडा असतो याचे भान त्यांना आहे. त्यातही स्पर्धेतला हा पहिलाच सामना आहे. १९९२ च्या वन-डे विश्वचषकात पाकिस्तानला पहिल्या पाचपैकी एकच सामना जिंकता आला होता. पण, शेवटी त्यांनी विश्वचषक जिंकला. ‘टी-ट्वेन्टी’त एक-दोन षटकातली चौकार-षटकारांची बरसात, दोन-तीन चटकन गेलेले बळी यामुळे निकाल फिरतो. त्यामुळे पहिल्याच घासाला खडा लागला हे भारतासाठी बरेच झाले. गेल्या २९ वर्षांचे ओझे त्यांच्या खांद्यावरून एकदाचे कायमचे उतरले. आता विराट सेनेला त्या ‘एक्स्ट्रा’ दडपणाशिवाय खेळता येईल. वेस्ट इंडिजमध्ये २००७ च्या वन-डे विश्वचषकात पोर्ट ऑफ स्पेनचा सामना कोणता भारतीय क्रिकेटप्रेमी विसरेल?, सचिन, सेहवाग, गांगुली, द्रविड, युवराज, धोनी, हरभजन, झहीर खान असे एक से एक अव्वल खेळाडू होते. तरी बांगलादेशाने हरवल्याने विश्वचषकातून बाहेर पडण्याची नामुष्की तेव्हा भारतावर ओढवली होती. या तुलनेत यंदाच्या ‘टी-ट्वेन्टी’ तला पाकिस्तानविरुद्धचा दुबईतला पराभव सुसह्य आहे.
फक्त आणि फक्त जिंकण्यासाठीच खेळणारा विराटसारखा जिद्दी खेळाडू आणि मनातले भाव चेहऱ्यावर उमटू न देणारा ‘मेंटॉर’ महेंद्रसिंग धोनी पराभवानंतर पाकिस्तानी खेळाडूंशी संवाद साधत असल्याचे जगाने पाहिले. शुद्ध व्यावसायिकता होती ती. पण, पुन्हा पाकिस्तानविरुद्ध लढण्याची वेळ येईल तेव्हा हाच विराट चवताळून मैदानात उतरेल, हे वेगळे सांगायला नको. कोणी सांगावे ? यंदाच्याच टी-ट्वेन्टी विश्वचषकात भारत पाकिस्तान पुन्हा आमनेसामने येतील आणि तेव्हा पाकिस्तानवर गाशा गुंडाळण्याची वेळ येईल.