शहरं
Join us  
Trending Stories
1
"फडणवीसांचा सुरुवातीचा काळ मला चांगला वाटला, पण आता..."; शरद पवारांचे मोठं विधान
2
अभिमानास्पद! गडचिरोलीचा बोधी रामटेके संयुक्त राष्ट्रसंघाच्या ‘ग्रॅज्युएट स्टडी प्राेग्राम’मध्ये!
3
दुर्दैवी! सुरतची लक्झरी बस सापुतारा घाटात कोसळली; दोन जण मृत्यूमुखी, पाच गंभीर जखमी
4
सिंधुदुर्ग-रत्नागिरी जिल्ह्यातील शाळांना अतिवृष्टीमुळे सोमवारी सुट्टी; शालेय शिक्षण मंत्र्यांची घोषणा
5
वाहतूक कोंडीमुळे मंत्री, आमदारांचे ‘वंदे भारत’; नाशिक- मुंबई रोडची दुरवस्था
6
लाडकी बहीण योजनेसाठी पैसे घेतले; इंटरनेट कॅफेच्या चालक, मालकाविरुद्ध गुन्हा दाखल
7
छत्तीसगडच्या बालसुधारगृहातून पळून गेलेल्या अल्पवयीन मुली नागपुरमध्ये ताब्यात
8
कुंडई औद्योगिक वसाहतीत संरक्षक भिंत कोसळल्याने तीन कामगार ठार, एक किरकोळ जखमी
9
'लाडकी बहीण' समितीत तालुका सचिव पदासाठी तहसीलदारांचे हात वर; कामाचा व्याप जास्त
10
मिहान परिसरात कनेक्टिव्हिटी वाढवणे, वाहतूक सुविधा सुधारण्याकरिता १५ जुलैपासून ई-बस सेवा
11
राज्याच्या औद्योगिक विकासाकडे लक्ष केंद्रित; विदर्भ, मराठवाड्यात उद्योगांच्या समस्या सोडविणार!
12
RFOच्या डोक्यावर नावालाच राजपत्रित मुकुट; ना पदोन्नती, ना संख्या वाढ!
13
कट, कमिशन व करप्शन ही काँग्रेसची त्रिसूत्री; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका
14
पुरीमध्ये भगवान जगन्नाथाच्या रथयात्रेत चेंगराचेंगरी; एकाचा मृत्यू, अनेक भाविक जखमी
15
"आरक्षणाची मर्यादा वाढवण्याचा ठराव विधिमंडळात घ्या अन् लोकसभेत पाठवा, आम्ही पाठिंबा देतो"
16
ZIM vs IND : भारताच्या 'युवा ब्रिगेड'ने पराभवाचा वचपा काढला; झिम्बाब्वेचा मोठ्या फरकाने पराभव केला
17
"माझे नाव इतिहासात नक्कीच लक्षात ठेवले जाईल"; निरोपाच्या भाषणात ऋषी सुनक यांचे विधान
18
भाजपच्या काही नेत्यांनी काँग्रेसला मतदान केले, सुशीलकुमार शिंदेंचा गौप्यस्फोट
19
पक्षप्रमुख उध्दव ठाकरे शेतकऱ्यांच्या बांधावर, शेतकरी बांधवांसोबत साधला संवाद
20
कोणती अभिनेत्री नाही पण लवकरच लग्नाची बातमी येईल; 'चॅम्पियन' खेळाडू नव्या इनिंगसाठी सज्ज

अद्भूत, अद्वितीय, अजिंक्य..क्रिकेटच्या इतिहासातील एका रोमांचकारी विजयाची नोंद

By ऑनलाइन लोकमत | Published: July 01, 2024 7:59 AM

क्रिकेट हा खेळ सांघिक काैशल्य व पराक्रमाचा. वैयक्तिक कामगिरीपेक्षाही संघातील अकरा खेळाडूंचे सामाईक योगदान अधिक महत्त्वाचे.

कोट्यवधी भारतीयांचे डोळे दूरचित्रवाहिनीच्या पडद्यावर खिळलेत. जगात भारताची मान उंचावणाऱ्या क्षणांचा दुष्काळ संपावा यासाठी प्रार्थना होताहेत. आपला संघ जागतिक अजिंक्यपदाच्या शर्यतीत असल्याचा आनंद अवर्णनीय आहे. संपूर्ण स्पर्धेत तो अजेय असल्याने जेतेपदाचा विश्वास असला तरी मनामनांत अनामिक हुरहुर आहे. मंच मोठा व प्रतिस्पर्धी तोलामोलाच्या ताकदीचा आहे. चेंडूगणिक जय-पराजयाचे पारडे, यशापयशाचा लंबक हेलकावतोय. एकाक्षणी डाव जवळपास हरला असे वाटते. ...आणि चमत्कार घडतो. अविश्वसनीय सांघिक कामगिरीची नोंद होते. संघ पिछाडीवरून आघाडीवर येतो. क्रिकेटच्या इतिहासातील एका रोमांचकारी विजयाची नोंद होते. प्रतिस्पर्ध्यांच्या जबड्यात हात घालून चषक खेचून आणला जातो.

आयुष्यात खूप कमी वेळा वाट्याला येणारा असा देवदुर्लभ अनुभव वीस षटकांच्या झटपट क्रिकेटमधील अंतिम सामन्याने जगभर विखुरलेल्या भारतीयांना दिला. जागतिक अजिंक्यपदाचा अकरा वर्षांचा, मर्यादित षटकांच्या विश्वचषकाचा तेरा वर्षांचा तर टी-२० अजिंक्यपदाचा सतरा वर्षांचा दुष्काळ राेहित शर्माच्या नेतृत्वातील भारतीय संघाने वेस्ट इंडिजमधील बार्बाडोस बेटावर, ब्रिजटाउनच्या केनसिंग्टन ओव्हल मैदानावर संपविला. भारत आता दोनवेळा विश्वचषक जिंकणाऱ्या इंग्लंड व वेस्ट इंडिजच्या रांगेत आहे. अमेरिका व वेस्ट इंडिज बेटांवर खेळल्या गेलेल्या या नवव्या टी-२० विश्वचषकाने भारतीयांना संस्मरणीय क्षणांचा ठेवा दिला. भारताचा हा तिसरा तर दक्षिण आफ्रिकेचा पहिलाच अंतिम सामना होता. दोन्ही संघांना मोक्याच्या क्षणी गळाटणारे अर्थात ‘चोकर्स’ म्हणून हिणवले जाते. भारताने ती घातक परंपरा मोडली.

उलट मोक्याच्या क्षणी खेळाचा दर्जा उंचावला. दक्षिण आफ्रिका मात्र खरी ‘चोकर्स’ ठरली. दक्षिण आफ्रिकेसाठी तीस चेंडूत तीस धावा हे विजयाचे सोपे समीकरण असताना भारतीय तंबूवर निराशेचे मळभ होते. परंतु, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग व हार्दिक पांड्या या तिघांनी चमत्कार घडविला. त्याआधी संपूर्ण स्पर्धेत सूर न गवसलेला विराट कोहली व अक्षर पटेल या दाेघांनी अनेक वर्षे लक्षात राहील अशी फलंदाजी केली. शिवम दुबे याने बहुमूल्य योगदान दिले. त्यामुळे टी-२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यांमधील सर्वोच्च धावसंख्या भारताने नोंदविली. कोणताही खेळ असो, स्पर्धा अथवा सामन्यांसोबत काही क्षणही सुवर्णाक्षरे लेवून येतात. १९८३ साली लिंबूटिंबू समजल्या जाणाऱ्या भारताने विश्वविजेत्या वेस्ट इंडिजला धूळ चारून विश्वचषक जिंकला. तेव्हा, अंतिम सामन्याला कलाटणी देणारा, कर्णधार कपिल देव याने टिपलेला ‘द ग्रेट’ व्हिवियन रिचर्डसचा झेल मोजक्याच रसिकांनी याचि देही याचि डोळा पाहिला होता. उरलेल्यांसाठी ती आयुष्यभराची रुखरुख होती. तथापि, सूर्यकुमार यादवने काल डेव्हिड मिलरचा तसाच रोमांचक झेल नव्हे सामना व चषकच टिपला आणि कोट्यवधींच्या मनातील ती रुखरुख संपून गेली.

क्रिकेट हा खेळ सांघिक काैशल्य व पराक्रमाचा. वैयक्तिक कामगिरीपेक्षाही संघातील अकरा खेळाडूंचे सामाईक योगदान अधिक महत्त्वाचे. म्हणूनच अखेरचा अडथळा मिलरला बाद करणारा हार्दिक व सीमारेषेवर अद्वितीय झेल घेणारा सूर्यकुमार दोघेही मोठे. हे सहज घडत नाही. अलीकडे हा खेळ मैदानावर दिसतो तेवढाच नसतो. स्पर्धेची तयारी कितीतरी आधीपासून करावी लागते. ती संघाची निवड, प्रशिक्षण, मानसिक व शारीरिक तयारी एवढ्यापुरती नसते. त्याहून अधिक काम प्रतिस्पर्ध्यांची शक्तिस्थळे व कच्च्या दुव्यांवर केले जाते. क्रीडा विज्ञान आता अत्यंत प्रगत झाले आहे. उदयोन्मुख गुणवान खेळाडूचे कच्चे दुवे लगेच शोधले जातात. त्यांना चुका करण्यासाठी भाग पाडले जाते. त्यामुळेच अनेकजण धुमकेतूसारखे येतात व जातात.

दैवी गुणवत्ता लाभली असे मात्र वर्षानुवर्षे चमकत राहतात. प्रशिक्षक राहुल द्रविड किंवा विराट कोहली व रोहित शर्मा हे असेच जीनिअस. विश्वचषक जिंकताच विराटने मैदानावर, तर रोहित व रवींद्र जडेजाने सामन्यानंतर आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यांमधून निवृत्ती जाहीर केली. त्यामुळे क्रिकेटरसिक भलेही निराश होतील. परंतु, आनंददायी बाब ही की, कारकिर्दीच्या अत्युच्च शिखरावर असताना निवृत्तीचे भाग्य त्यांना लाभले. त्यांची शिखरावरील प्रतिमाच अखेरपर्यंत चाहत्यांच्या हृदयावर कोरलेली असेल. आता अशा सामन्यांमध्ये रोहित व विराट भारतीय संघात दिसणार नाहीत, ही खंत आहेच. तथापि, पांढऱ्या चेंडूचा बादशाह बुमराह, तसेच अर्शदीप सिंग, अक्षर पटेल, कुलदीप यादव असे या स्पर्धेतून गवसलेले अन्य अनमोल हिरे भारताचे अत्युच्च स्थान कायम राखतील.

टॅग्स :T20 World Cupट्वेंटी-20 वर्ल्ड कप 2024Indiaभारत