पुणे जिल्ह्यामध्ये गेल्या काही वर्षांत औद्योगिक क्षेत्रामध्ये जी काही प्रगती झालेली आहे ती निश्चितच उल्लेखनीय अशा स्तरावरची आहे. एका बाजूला हिंजवडी, चंदननगर, खराडी या परिसरात मोठ्या प्रमाणावर आटी पार्क साकारली. केपीओ-बीपीओ कंपन्यांनी जाळे विस्तारले. त्याच्या जोडीला उद्यमनगरी म्हणून पिंपरी चिंचवड परिसरात जे उद्योग एकवटलेले होते. त्यांचाही एमआयडीच्या रुपाने चाकण, राजगुरूनगर, शिरुर या ठिकाणी विस्तार झाला. जगभरात अत्यंत नावाजलेल्या अशा जीई, जीएम, मर्सिडीज, वोक्सवॅगन या सारख्या कंपन्यांनी आपले बस्तान बसवले. आता या विस्तार-विकासाची घोडदौड सुरू असताना शासनानेही त्यांचा ‘लालफितीचा कारभार’ जरा आवरून अशा कंपन्यांसाठी ‘लाल पायघड्या’ अंथरल्या. मात्र या सर्व परिस्थितीत अडथळा होता आणि आहे तो एकच. तो म्हणजे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या विमानतळाचा. लोहगाव येथील विमानतळ हे वायूदलाच्या अखत्यारित असलेल्या जागेत असल्याने तेथील विस्ताराला मुळातच मर्यादा होत्या. त्यामुळे तातडीने पावले उचलून एक नवे आंतरराष्ट्रीय विमानतळ साकारणे ही काळाची गरज होती. पण ‘भिजत घोंगडे’ ही उपमाही फिकी पडावी इतका काळ केवळ जागा निश्चित करण्यासाठी घालवला गेला. तब्बल १२ वर्षे हा प्रस्ताव अजूनही कागदावरच आहे. सुरुवातीला खेड तालुक्यात प्रकल्प उभारण्याच्या घोषणा झाल्या. त्यानंतर तिथल्याच जागा आलटून पालटून बदलत राहिल्या. तेही थोडे म्हणून मग प्रस्तावित विमानतळाच्या विरोधात शेतकºयांचे आंदोलन उभे राहिले. खासदार-आमदारांच्या भूमिका सोयीस्कर बदलत राहिल्या. सत्तांतरानंतर नव्याने धुरा सांभाळलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी थेट पुरंदरला आंतरराष्ट्रीय विमानतळ होईल सांगत नवीनच गुगली टाकली. सगळ््यांचे लक्ष खेडकडून पुरंदरकडे वळले. तिकडे जागांचा शोध, पाहणी सुरू झाली आणि आता पुन्हा एकदा तांत्रिक कारण उपस्थित करून जागा पुन्हा बदलली जाऊ शकते असे पिल्लू जिल्हाधिकाºयांनी सोडले. यामागचे राजकारण आणि राजकारण्यांचे आडाखे काही असोत पण शहर व जिल्ह्याच्या प्रगतीचा आलेख उंचावण्यासाठी आंतरराष्ट्रीय विमानतळाचे टेक आॅफ गरजेचे आहे. त्यासाठी योग्य वेळेत तत्पर व नियोजनबद्ध पावले उचलायला हवीत. उड्डाणाच्या पोकळ वल्गना ठरू नयेत, तर विकासाचा रनवे सुकर व्हावा हीच अपेक्षा आहे.
अडून बसलेले ‘टेकआॅफ’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 01, 2017 12:45 AM