वाचनीय लेख - ताळतंत्र सुटले, भाजप नेत्यांची जीभ घसरली आहे!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2024 10:14 AM2024-04-12T10:14:47+5:302024-04-12T10:15:25+5:30
विरोधकांची निंदानालस्ती आणि अभद्र, बीभत्स वक्तव्ये हे अभिव्यक्ती स्वातंत्र्य नव्हे! पण, भाजपला त्याचा विसर पडला आहे, हेच मुनगंटीवारांनी सिद्ध केले!
अतुल लोंढे
लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजल्यानंतर देशात पहिल्या टप्प्याचे मतदान १९ एप्रिलला होत आहे. वाढती महागाई, बेरोजगारी, शेतमालाला मातीमोल भाव, दलित, आदिवासी व महिलांविरोधातील वाढते अत्याचार आदी प्रमुख मुद्दे या निवडणुकीत आहेत. ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था पूर्णतः मोडकळीस आली आहे. नैसर्गिक आपत्तीने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. मात्र, शेतकऱ्यांबाबत कोणतीही चांगली धोरणे ठरविण्यात अपयशी ठरलेल्या भाजपने त्यावर मौन साधले आहे. लोकांमध्ये सरकारविषयी मोठा रोष असल्याने लोकांशी संबंधित मुद्यावर बोलण्यापेक्षा, त्यांना सामोरे जाण्याची हिंमत नसलेल्या सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने विरोधकांबाबत अभद्र भाषेचा प्रयोग करणे सुरू केले आहे. बेटी बचाओ बेटी पढाओ ही भाजपची घोषणा फक्त दाखवण्यापुरतीच आहे, भाजपच्या नेत्यांचे वागणे मात्र त्याच्या विपरीत आहे. यावरून भाजपचे दाखवायचे दात आणि खायचे दात वेगळे आहेत हे सातत्याने सिद्ध होत आहे.
राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अभद्र वक्तव्याने जनमानसात अत्यंत संतापजनक प्रतिक्रिया उमटल्या आहेत. त्याबाबत काँग्रेसनेनिवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. वास्तविक निवडणूक आयोगाने यापूर्वीच अभद्र भाषेचा प्रयोग, महिलांविषयी अश्लील आणि अपमानजनक वक्तव्य करणे याबाबत गंभीर चिंता व तीव्र नापंसती व्यक्त केली होती. विरोधकांची निंदानालस्ती करणे, चारित्र्यहनन हे अभिव्यक्ती स्वातंत्र्य नव्हे, असे भारत निवडणूक आयोगाने स्पष्टपणे बजावले आहे. धर्माचा जाहीरपणे उल्लेख करणे, जातधर्माला प्रोत्साहन देणे, दोन समाजात तेढ निर्माण करणे आदींबाबतची आचारसंहिता भारत निवडणूक आयोगाने स्पष्ट केलेली आहे. बहीण-भावाच्या पवित्र नात्याबाबत मुनगंटीवार यांनी अत्यंत संतापजनक, बीभत्स टिप्पणी चंद्रपुरात मोरवा विमानतळाजवळ झालेल्या प्रचारसभेत केली. विशेष म्हणजे या सभेला पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही व्यासपीठावर होते. दुर्दैवाने भाजपची नेतेमंडळी त्यांच्या भाषणाचे समर्थन करत आहेत. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसकडून दिवंगत खासदार बाळूभाऊ धानोरकर यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर निवडणूक लढवित आहेत. त्यांच्या प्रश्नांना विकासाच्या मुद्यांवर उत्तरे देण्याचे सोडून जातीय तणाव वाढविण्याचे काम मुनगंटीवार त्यांच्या भाषणातून करत आहेत.
भाजपकडून हे पहिल्यांदा घडलेले नाही. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या संदर्भात सातत्याने खोटी व बदनामीकारक विधाने केली जातात. भाजपच्या नेत्यांमध्ये गांधी-नेहरू कुटुंबावर चिखलफेक करण्याची जणू स्पर्धा लागलेली असते. भाजपच्या प्रवक्त्यांनी तर विरोधकांवर बेछूट आरोप करताना मर्यादा सोडली आहे. जातीय तेढ निर्माण करणाऱ्या भाषेमुळे समाजात भीती आणि आक्रमकपणा वाढला आहे. दहशतीचे वातावरणही तयार झाले आहे. बेटी बचाओ, बेटी पढाओ म्हणायचे आणि महिलांचे शोषण व महिलांविरोधातील शेरेबाजीचे समर्थन करायचे, हीच भाजपची नीती आहे.
स्वर्गीय अटबिहारी वाजपेयी हे शब्दांबाबत कायम आग्रही असायचे. भाषा हे संवादाचे माध्यम आहे, विसंवादाचे नव्हे, असे ते सातत्याने सांगत. मात्र, आता नवीन परंपरा समोर येत आहेत. लोकसभेच्या कामकाजादरम्यान भाजप खासदार रमेश बिधुरी यांनी बसपाचे दानिश अली यांना ‘दहशतवादी’ संबोधले. रमेश बिधुरी यांनी अनेक शिव्यांची लाखोली भर संसदेत वाहिली. संसदेत महिला खासदार बाजूला आहेत, याचेही त्यांना भान राहिले नाही. लोकनियुक्त खासदाराला भर संसदेत शिव्यांची लाखोली वाहिलेला व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला. त्यातून समाजात काय संदेश गेला, याचेही भाजपला भान नाही. निवडणूक आयोगाने आता यावर बारीक लक्ष ठेवले पाहिजे, ही काँग्रेसची विनंती आहे.
शेतकरी आंदोलकांना नक्षलवादी, देशद्रोही, चीनचे एजंट ठरविले गेले. देशातील जनतेला त्यांच्या प्रश्नांसाठी आता आंदोलनाचीही परवानगी नाही, असा संदेश भाजपने विविध आंदोलने चिरडून दिला आहे. गंगेच्या घाटावर भ्रमंती करताना संत कबीर शेकडो वर्षांपूर्वी म्हणाले होते, ‘शब्द संभाले बोलिए, शब्द के ना हाथ पांव, एक शब्द औसध करें, एक करे घाव.’ भारतीय राजकारणाच्या घसरत्या स्तरावर अंकुश ठेवण्याची मोठी जबाबदारी निवडणूक आयोगावर आहे, त्यांनी त्यात कसूर करू नये, एवढीच आमची अपेक्षा आहे.
(लेखक महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ता आहेत)