- विजय बाविस्कर महाराष्ट्र वाल्मीकी ग.दि. माडगूळकर यांच्या स्मृती गेली ४१ वर्षे जतन करणाऱ्या गदिमा प्रतिष्ठानच्या वतीने गदिमांच्या जन्मशताब्दी वर्षातील मानाचे पुरस्कार विख्यात लेखिका, दिग्दर्शिका सई परांजपे, ज्येष्ठ अभिनेत्री भारती मंगेशकर, प्रसिद्ध लेखक व वक्ते प्रा. मिलिंद जोशी आणि गायिका केतकी माटेगावकर यांना साहित्य संमेलनाध्यक्ष डॉ. अरुणा ढेरे यांच्या हस्ते आज पुण्यात प्रदान करण्यात येत आहेत.गीतरामायण या अजरामर कलाकृतीमुळे मराठी माणसांच्या हृदयावर अधिराज्य करणारे ग.दि. माडगूळकर हे अलौकिक प्रतिभावंत होते. त्यांच्या प्रतिभाप्रकाशाने कलेचे क्षेत्र उजळून निघाले. या थोर सारस्वताच्या चिरंतन स्मृती जपण्याचे काम गदिमा प्रतिष्ठान निष्ठेने करीत आहे. गदिमांच्या स्मृतिदिनी प्रतिवर्षी १४ डिसेंबरला पुण्यात गदिमा प्रतिष्ठानच्या वतीने चार प्रतिभावंतांचा सन्मान केला जातो. गदिमांच्या जन्मशताब्दी वर्षातील या पुरस्काराचे मोल वेगळेच आहे. त्यानिमित्ताने पुरस्कारांच्या मानकºयांविषयी लिहिणे महत्त्वाचे आहे.सई परांजपे यांनी आकाशवाणी पुणे केंद्रावरील ‘बालोद्यान’ या बालमित्रांसाठीच्या कार्यक्रमाच्या निर्मितीपासून करिअरचा प्रारंभ केला, त्या वेळी गोपीनाथ तळवलकर आणि नेमिनाथ उपाध्ये यांची साथसंगत त्यांना मिळाली. त्यातूनच मुलांमधल्या नाट्यगुणांना व्यासपीठ मिळवून देणाºया ‘चिल्ड्रन्स थिएटरची’ सुरुवात झाली. या चळवळीने मोहन आगाशे, यशवंत दत्त, सुहास जोशी यांच्यासारखे गुणी कलावंत मराठी रंगभूमी आणि चित्रपटाला दिले. मराठी नाट्य आणि चित्रपट क्षेत्रातील सई परांजपे यांचे योगदान खूप मोलाचे आहे. स्पर्श, चश्मेबद्दूर, कथा, दिशा यासारखे अप्रतिम चित्रपट त्यांनी निर्माण केले. ते पुरस्कारप्राप्त ठरले. त्यांनी निर्माण केलेले अनुबोधपट वैशिष्ट्यपूर्ण ठरले. नांदा सौख्यभरे, सख्खे शेजारी, तुझी माझी जोडी, माझा खेळ मांडू दे ही त्यांची यशस्वी झालेली नाटके. अस्सल प्रतिभा, नावीन्याचा ध्यास आणि प्रयोगशीलता यांची कास धरून आपली ठसठशीत नाममुद्रा कलाक्षेत्रात उमटविण्याºया सई परांजपे यांना मिळणारा गदिमा पुरस्कार समस्त मराठी जनांना अपार आनंद देणारा आहे.विद्याताई माडगूळकर यांच्या स्मरणार्थ दिल्या जाणाºया ‘गृहिणी सखी सचिव’ पुरस्काराच्या मानकरी आहेत भारती मंगेशकर. ख्यातनाम संगीतकार पं. हृदयनाथ मंगेशकर यांच्या पत्नी असलेल्या भारतीतार्इंना अभिनयाचा वारसा त्यांचे पिताश्री नटश्रेष्ठ दामूअण्णा मालवणकर यांच्याकडून मिळाला. ‘साष्टांग नमस्कार’ या आचार्य अत्रेंच्या नाटकापासून अभिनय कारकिर्दीला प्रारंभ करणाºया भारतीतार्इंची सुंदर मी होणार, लग्नाची बेडी, देव देव्हाºयात नाही, अबोल झाली सतार, घनश्याम नयनी आला ही नाटके गाजली. गदिमा लिखित आधी कळस मग पाया, गरीबाघरची लेक सारख्या मराठी आणि हिंदी चित्रपटांतल्या त्यांच्या भूमिकांनी त्यांना अभिनेत्री म्हणून वेगळी ओळख मिळवून दिली. पं. हृदयनाथ मंगेशकरांची गृहिणी सखी सचिव हे पद भूषविल्यानंतर स्वत:चे अभिनयगुण विसरून त्या हृदयनाथजींच्या सर्जनशील सहजीवनाच्या साथीदार झाल्या.चैत्रबन पुरस्काराचे मानकरी असलेले प्रा. मिलिंद जोशी हे प्रसिद्ध लेखक आणि प्राचार्य शिवाजीराव भोसलेंची वक्तृत्व परंपरा पुढे नेणारे समर्थ वारसदार म्हणून महाराष्ट्राला परिचित आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यातील माणकेश्वर या छोट्याशा खेड्यात शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या प्रा. जोशींनी आपल्या वाङ्मयीन कर्तृत्वातून सांस्कृतिक विश्वात स्वत:चे वेगळे स्थान निर्माण केले. दगड, माती आणि विटा यांच्याशी निगडित बांधकामाचे शास्त्र भारती विद्यापीठाच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात शिकविणारे प्रा. मिलिंद जोशी शब्दांचे बांधकाम किती उत्तम करतात याचा अनुभव वाचकांनी आणि श्रोत्यांनी घेतला आहे. विद्वत्ता, व्यासंग आणि वक्तृत्व यामुळे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला वेगळे परिमाण लाभले. त्यांच्या चित्तस्पर्शी लेखणीतून साकारलेली चरित्रे, कथासंग्रह, व्यक्तिचित्रे, ललित आणि वैचारिक असे विविधांगी लेखन वाचकांना भावणारे आहे. उत्तम वाङ्मयीन जाण असलेले नेतृत्व संस्थेला लाभले की किती चांगले काम करता येते हे त्यांनी महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कार्याध्यक्षपदाची धुरा सांभाळताना दाखवून दिले आहे. लिहिणे आणि बोलणे या दोन्ही गोष्टींवर मनापासून प्रेम करणाºया या प्रतिभावंतांचा सन्मान वाचक श्रोत्यांना आनंद देणारा आहे.विद्याप्रज्ञा पुरस्काराची मानकरी आहे नव्या पिढीची आघाडीची गायिका आणि अभिनेत्री केतकी माटेगावकर. आई-वडिलांकडून लाभलेला संगीताचा समृद्ध वारसा तिने साधनेने समृद्ध केला. केतकीने देवकी पंडित आणि रघुनंदन पणशीकर यांच्याकडे शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेतले. वयाच्या सहाव्या वर्षी तिचा ‘आता खेळा नाचा’ हा अल्बम प्रसिद्ध झाला तेव्हापासून तिच्या करिअरचा आलेख उंचावत गेला. फिल्म फेअरची ती मानकरी ठरली. शाळा, काकस्पर्श या चित्रपटांतल्या तिच्या भूमिका खूप गाजल्या. अशा या गुणी गायिकेचा आणि अभिनेत्रीचा सन्मान तिच्या चाहत्यांना आनंद देणारा आहे.(लेखक सहसमूह संपादक आहेत.)
‘गदिमा पुरस्कारा’ने आज प्रतिभावंतांचा सन्मान
By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2018 4:35 AM