अमोल उदगीरकर, चित्रपट समीक्षक
‘टायटॅनिक’ चित्रपटाला ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात तेरा पुरस्कार मिळाल्यानंतर एक विनोद सांगितला जायचा. टायटॅनिक जहाज हिमखंडाला धडकलं आणि जहाज बुडणार हे नक्की झाल्यावर जहाजाच्या कप्तानाने आपल्या सगळ्या सहकाऱ्यांना बोलवलं. ‘मित्रांनो तुम्हाला द्यायला माझ्याकडे एक चांगली बातमी आहे आणि एक वाईट बातमी आहे. सगळ्यात आधी वाईट बातमी. लवकरच आपलं जहाज बुडणार आहे.’
‘आणि चांगली बातमी?’
‘आपल्याला भविष्यकाळात ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात तेरा पुरस्कार मिळणार आहेत.’
ऑस्कर २०२३च्या पुरस्कार सोहळ्यात ‘ओपेनहायमर’ सिनेमाने वर्चस्व गाजवल्यावर वरचा विनोद थोडा बदल करून सांगता येईल. जगातली पहिली अण्वस्त्र चाचणी झाल्यावर रॉबर्ट ओपेनहायमर यांनी सगळ्या सहकाऱ्यांना बोलावून सांगितलं. ‘मित्रांनो माझ्याकडे एक वाईट बातमी आहे आणि एक चांगली बातमी आहे. वाईट बातमी म्हणजे जगाचा अनेकवेळा विध्वंस करू शकणारं अस्त्र बनवण्याकडे आपण महत्त्वाचं पाऊल टाकलं आहे. चांगली बातमी म्हणजे भविष्यकाळात आपल्याला सात ऑस्कर पुरस्कार मिळणार आहेत.’
विनोदाचा भाग वगळला तर ‘ओपेनहायमर’चं ऑस्करमधलं यश हे अपेक्षितच होतं. संकलन, छायाचित्रण, सर्वोत्कृष्ट अभिनेता, सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेता, संगीत, दिग्दर्शन आणि सर्वोत्कृष्ट चित्रपटांसाठीचे ऑस्कर मिळवून सिनेमाने घवघवीत यश मिळवलं. ‘ओपेनहायमर’ला ऑस्कर मिळण्यामागे अनेक कारणं आहेत. चरित्रपट आणि ऐतिहासिक घटनांवर आधारित चित्रपटांना ऑस्करमध्ये थोडं जास्त प्रेम मिळतं, हे तर आहेच. पण यानिमित्ताने एकाहून एक उत्तम सिनेमे देणाऱ्या ख्रिस्तोफर नोलान या जगभरात आणि भारतातपण प्रचंड लोकप्रियता मिळालेल्या दिग्दर्शकाला यानिमित्ताने ऑस्करची बाहुली उंचावण्याची संधी मिळाली आणि नोलानच्या चाहत्यांमध्ये समाधानाची लाट पसरली. सिलियन मर्फी या सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळालेल्या नटाबद्दलपण त्याच्या चाहत्यांना आनंद झाला. पण ‘ओपेनहायमर’ सिनेमात काही त्रुटी आहेत आणि हा सिनेमा काही नोलानचं सर्वोत्कृष्ट काम नाही असं मानणारापण अल्पसंख्य का होईना एक वर्ग आहे. त्या वर्गाने केलेली थोडी कुजबुज वगळता कुणालाही ‘ओपेनहायमर’च्या पुरस्कार दिग्विजयाबद्दल आक्षेप नव्हता.
एका विक्षिप्त शास्त्रज्ञाने त्याच्या प्रयोगांच्या माध्यमातून प्राण फुंकलेल्या बेलाची धमाल कथा दाखवणाऱ्या; पण सहजतेने सामाजिक-लैंगिक विषमतेवर भाष्य करणारा ‘पुअर थिंग्ज’ हा सिनेमापण या ऑस्कर सोहळ्यात लक्षवेधी ठरला. सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, सर्वोत्कृष्ट वेशभूषा, प्रॉडक्शन डिझाइन आणि सर्वोत्कृष्ट पेहराव श्रेणीत चार पुरस्कार मिळवून ‘ओपेनहायमर’च्या खालोखाल या सिनेमाने सर्वाधिक ठसा उमटवला. एमा स्टोनसारख्या चतुरस्त्र अभिनेत्रीला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा यावर्षी पुरस्कार मिळणार अशी खात्री बहुसंख्यांना होतीच. ‘बार्बी’सारख्या बॉक्स ऑफिसवर तुफान गल्ला जमवणाऱ्या चित्रपटाकडे पुरस्कारात झालेले काहीसं दुर्लक्ष हापण चर्चेचा विषय बनला.
ऑस्कर नामांकनामध्ये अनेकदा वेगवेगळ्या विषयांवर बनलेल्या सिनेमांचं वैविध्य असतं. यावर्षीपण ऑस्करनेही परंपरा जपली. ‘अमेरिकन फिक्शन’, ‘होल्डओव्हर्स’, ‘मॅस्टरो’ ,‘किलिंग ऑफ फ्लॉवर मून’, ‘द झोन ऑफ इंटरेस्ट’ , ‘पुअर थिंग्ज’, ‘बार्बी’, ‘पास्ट लाईव्ज’ आणि ‘ॲनॉटॉमी ऑफ अ फॉल’ या सिनेमांनापण अनेक श्रेणींमध्ये नामांकनं होती. कलाक्षेत्रातल्या बाजारूपणावर आणि तिथं काम करणाऱ्या लोकांवर असणाऱ्या स्टिरिओटाइप्सच्या प्रभावावर खुसखुशीत भाष्य करणाऱ्या ‘अमेरिकन फिक्शन’ या सिनेमाला सर्वोत्कृष्ट आधारित पटकथेचा पुरस्कार मिळाला. ही एक फार चांगली निवड होती.
मागच्या वर्षी ब्रेंडन फ्रेजर या अभिनेत्याला ‘द व्हेल’ सिनेमातल्या भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला होता. या अभिनेत्याचं हे स्वप्नवत पुनरागमन होतं. संपला संपला असं जग म्हणत असताना वापसी केलेल्या या अभिनेत्याच्या आयुष्याच्या खडतर प्रवासाच्या प्रेरणादायी कथा समाजमाध्यमातून सगळीकडे पसरायला लागल्या. यावर्षी हेच घडलं ते सर्वोत्कृष्ट सहअभिनेत्याचा पुरस्कार मिळवलेल्या रॉबर्ट डाउनी ज्युनिअर या ‘आयर्न मॅन’ची भूमिका करून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्याबाबत. एकेकाळी ड्रग्जमुळे तुरुंगवास भोगलेल्या, आयुष्य उद्ध्वस्त झालेल्या डाउनीने नंतर निग्रहाने यातून बाहेर येऊन पुनरागमन केलं. त्याला यावर्षीचा ऑस्कर मिळाल्यावर त्याची प्रेरणादायी कथा सगळीकडे ऐकवल्या जाऊ लागली.
यावर्षीचा अजून एक चर्चित आणि लक्षवेधी पुरस्कार म्हणजे ‘गॉडझिला मायनस वन’ सिनेमाला मिळालेला ‘व्हिज्युअल इफेक्ट’साठीचा पुरस्कार. हा पुरस्कार महत्त्वाचा यासाठी की, या सिनेमाचं बजेट अवघे दहा ते पंधरा मिलियन डॉलर्स (भारतीय चलनात साधारणतः एकशेवीस कोटींच्या घरात) होतं. एवढं मर्यादित बजेट असून पण सिनेमात कथानकाला पूरक असे उत्तम इफेक्ट्स आहेत. आपल्याकडच्या पाचशे-सहाशे कोटी बजेट असणाऱ्या आणि सुमार व्हीएफएक्स असणाऱ्या सिनेमांशी संबंधित लोकांनी हा चित्रपट पुन्हा पुन्हा बघून आपले बेसिक्स पक्के करण्याची नितांत गरज आहे.
ऑस्कर पुरस्कार अनेकदा सिनेमाबाह्य कारणांमुळे पण गाजतात. लगेच आठवणारं उदाहरण म्हणजे विल स्मिथचं ‘स्लॅपगेट’. यावर्षी पण जॉन सिना या अभिनेत्याने स्टेजवर केलेली ‘न्यूड एंट्री’, अरनॉल्ड श्वेझनार्गर आणि डॅनी डिव्हिटो यांनी त्यांच्या बॅटमॅन सिनेमातल्या भूमिकांवर केलेला विनोद आणि त्याला बॅटमॅनची भूमिका करणाऱ्या मायकेल किटनने दिलेला प्रतिसाद, स्वतःला आणि ऑस्कर पुरस्कारांना अजिबात अतीगंभीर्याने न घेणारं जिमी किमेलचं खुशखुशीत सूत्रसंचालन ही यावर्षीच्या ऑस्कर सोहळ्याची वैशिष्ट्ये म्हणता येतील .