२०२१ मध्ये तालिबाननेअफगाणिस्तानची सत्ता पुन्हा एकदा बळकावल्यानंतर महिलांवर जेवढे म्हणून निर्बंध लादता येतील तेवढे लादायला त्यांनी सुरुवात केली आहे. आताचा नवा फतवा तर महिलांचं तोंड अक्षरश: बंद करणारा आहे. सार्वजनिक ठिकाणी महिलांना बोलण्यासही आता बंदी घालण्यात आली आहे. त्याचं कारण काय, तर म्हणे, महिलांच्या केवळ आवाजानंही पुरुष चाळवू शकतात. त्यांचं मन भरकटू शकतं!
महिलांचं स्वातंत्र्य संपवण्याचा चंगच जणू तालिबाननं आखला आहे. त्यामुळे महिलांसंदर्भात आधीचेच जाचक असलेले कायदे तालिबाननं आणखी कडक केले आहेत. घराबाहेर पडण्याचे, सार्वजनिक ठिकाणी वावरण्याचे कायदे त्यांनी अक्षरश: मध्ययुगीन कालखंडात आणून ठेवले आहेत. महिलांना आपली संस्कृती, परंपरा जपताना सार्वजनिक ठिकाणी आता आणखी सावधगिरी बाळगावी लागणार आहे. संपूर्ण शरीर झाकणारे कपडे घालायची सक्ती तर त्यांच्यावर आहेच, पण हे कपडेही कुठल्याही अर्थानं झिरझिरीत, पातळ नसावेत. त्यांनी परिधान केलेल्या वस्त्रांतूनही त्यांच्या शरीराचा कुठलाही भाग दिसू नये यासाठी जाडेभरडे कपडेच त्यांनी घालावेत, अशी सक्ती आता त्यांच्यावर करण्यात आली आहे.
तालिबानचे सुप्रीम लीडर मुल्ला हिबातुल्लाह अखुंदजादा यांनी नुकतीच या नव्या कायद्यांना मंजुरी दिली आहे. तालिबानच्या या निर्णयावर संयुक्त राष्ट्रसंघानं कडवी टीका केली आहे. अनेक मानवाधिकार संघटनांनीही याविरुद्ध आवाज उठवला आहे, पण तालिबानची हडेलहप्पी पाहता या निर्णयात काहीही बदल होण्याची शक्यता नाही.
महिलांना केवळ सार्वजनिक ठिकाणी बोलण्याचीच नाही, तर खुद्द स्वत:च्या घरातही तोंड उघडण्यावर अनेक मर्यादा आणल्या गेल्या आहेत. त्यांना आता घरातही मोठ्यानं गाणी ऐकता आणि म्हणता येणार नाहीत. ज्या महिला हा नियम तोडतील त्यांना तुरुंगात जावं लागू शकेल किंवा सार्वजनिक ठिकाणी, लोकांसमक्ष चाबकाचे फटकारेही दिले जातील !
यावेळी प्रथमच तालिबाननं पुरुषांवरही काही बंधनं लादली आहेत. त्यामुळे कोणत्याही अफगाणी पुरुषाला घराबाहेर पडताना आता कसंही बाहेर पडता येणार नाही. पुरुषांनाही आपलं शरीर गुडघ्यापर्यंत झाकावं लागेल. अन्यथा त्यांचीही काही खैर नाही. याशिवाय कोणत्याही जिवंत अफगाणी माणसाचे सार्वजनिकरीत्या फोटोही आता काढता येणार नाहीत.
तालिबाननं दिवसेंदिवस आपल्या कायद्यांची, विशेषत: महिलांविषयीच्या कायद्यांची जालीमता वाढवत नेली आहे. सत्तेवर येताच सर्वप्रथम त्यांनी विविध ठिकाणी काम करणाऱ्या महिलांची नोकरी काढून घेतली. त्यांना नोकरी करण्यास मनाई केली. त्यानंतर त्यांना शिक्षण घेण्यापासून परावृत्त केलं. अफगाणिस्तानात महिलांना आता केवळ सहावीपर्यंतच शिक्षण घेण्याची परवानगी आहे. महिलांवर तर तालिबाननं अनेक बंधनं लादलीच, पण त्यांनी असेही अनेक प्रतिगामी कायदे देशात लागू केले, जे मानवाधिकाराच्या विरोधात आहेत. त्यातला सर्वांत भीषण कायदा म्हणजे, तालिबान्यांना वाटलं, एखाद्यानं काही चूक केली आहे, नियम मोडले आहेत, तर त्यांना सार्वजनिक ठिकाणी शिक्षा देणं, चाबकाचे फटकारे देणं, इतकंच काय चौकात जाहीर फाशीही त्यांना दिली जाते. एवढंच नाही, या शिक्षा पाहण्यासाठी परिसरातील लोकांना बोलावलं जातं. या शिक्षा प्रत्यक्ष पाहण्यासाठी ते आले नाहीत, त्यात सहभाग घेतला नाही, तर त्यांनाही शिक्षा केली जाते.
समलैंगिक संबंधही तालिबानला मान्य नाहीत. त्यामुळे असे संबंध असणाऱ्यांवर कडक नजर ठेवली जाते. असे संबंध असणाऱ्या ६३ नागरिकांना यावर्षी जून महिन्यात तालिबाननं सार्वजनिकरीत्या चाबकाचे फटकारे मारले होते. त्यात १४ महिलांचाही समावेश होता. याशिवाय चोरी आणि अनैतिक संबंध असणाऱ्या नागरिकांनाही चाबकाने फोडून काढण्यात आलं होतं. तालिबानच्या मते, अशी कृत्यं आपल्या देशाच्या संस्कृतीच्या विरुद्ध आहेत. त्यामुळे ‘गुन्हेगारां’ना फोडूनच काढलं पाहिजे. या आरोपींना शिक्षा देण्यापूर्वी तालिबाननं लोकांना एका स्टेडियममध्ये गोळा केलं आणि त्यांच्यासमोर या लोकांना चाबकाचे फटकारे दिले. शिवाय यापुढे असं कृत्य कधीच करणार नाही, असं त्यांच्याकडून वदवून घेतलं.
व्यभिचारी महिलांना दगडांनी मारणार! तालिबानचे सुप्रीम लीडर मुल्ला हिबातुल्लाह अखुंदजादा यांनी नुकताच एक फतवा जारी केला आहे. त्यानुसार कोणत्याही महिलेनं व्यभिचार करू नये. आपल्या पतीशी एकनिष्ठ राहावं. जी महिला व्यभिचार करेल, दोषी आढळेल, तिची सार्वजनिक ठिकाणी दगडं मारून हत्या केली जाईल! पाश्चात्य देशांनाही सुनावताना त्यांनी म्हटलं आहे, काय नैतिक आणि काय अनैतिक हे तुम्ही आम्हाला सांगू नका, तुमच्यापेक्षा ते आम्हाला जास्त चांगलं कळतं!