ऐन उन्हाळ्यात तौक्ते चक्रीवादळाने गोवा, महाराष्ट्र आणि संपूर्ण कोकण किनारपट्टी भागात थैमान घातले. अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली आणि सखल भागात पाणी साचले. झाडे उन्मळून पडली. वीजप्रवाह खंडित झाला. इंटरनेट सेवा गूल झाली. रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली. मुंबई विमानतळ बंद ठेवावे लागले. वरळी सी लिंकलाही या वादळाचा फटका बसला. मुंबई समुद्रात दोन जहाजं भरकटली. मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड, पुणे या जिल्ह्यांना वादळाचा मोठा फटका बसला. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड इत्यादी जिल्ह्यात रेड अलर्ट घोषित करावा लागला. हजारो घरांचे नुकसान झाले. नुकसानीचा अंदाज अजूनही नीटसा आलेला नाही. वादळाची पूर्वसूचना मिळाली असली तरी गोवा आणि कोकणातील तालुके फारसे काही करू शकत नव्हते, हेही खरेच.
सरत्या उन्हाळ्यातली वादळे भारतीय द्वीपकल्पासाठी काही नवी नव्हेत. भारतीय महासागरात होणाऱ्या वादळांचे प्रमाण जगभरातील वादळांच्या तुलनेत सात टक्के इतके भरते. याशिवाय बंगालच्या उपसागरातही सतत वादळे होत असतात. ओडिशापासून तामिळनाडूपर्यंतची किनारपट्टी या वादळांच्या संहारक्षमतेला तोंड देत असते. त्यातच उष्ण कटिबंधातील वादळांचा समावेश जगातल्या संहारक आपदात केला जातो. हजारो माणसे दगावतात आणि अब्जावधींच्या मालमत्तेची हानी होते. बंगालच्या उपसागरात होणाऱ्या वादळांची संख्या अरबी समुद्रात होणाऱ्या वादळांपेक्षा तिप्पट ते चौपट भरते. अरबी समुद्रात मे महिन्यात वादळ तयार होणे ही तशी दुर्मीळ बाब असली तरी हल्लीच्या काळात तुलनेने शांत असलेला हा समुद्रही संहारक चक्रीवादळे निर्माण करू लागला आहे.
याआधी १८ मे २०१८ रोजी अरबी समुद्रात सागर नामक वादळ तयार झाले होते जे कालच्या तौक्तेप्रमाणेच गोव्याला ओरबाडून मग एडनच्या किनाऱ्यावर धडकले. त्याचवर्षी २५ मे रोजी तयार झालेले मेकुनू हे दुसरे वादळ ओमानच्या नैर्ऋत्य भागाची वाताहत करून गेले होते. भारताशी संबंधित उष्ण कटिबंधातील वादळांचा गेल्या १३० वर्षांचा इतिहास तपासल्यास दिसते की मे महिन्यात ९१ वादळे आकारास आली. त्यातली ६३ बंगालच्या उपसागरात, तर २८ अरबी समुद्रात झाली. वादळाच्या निर्मितीस अनेक घटक कारणीभूत ठरतात आणि त्यात महत्त्वाचे असते ते समुद्रसपाटीचे तापमान. यंदाचा उन्हाळा तर भलताच प्रखर असल्याचे तज्ज्ञ सांगतात. गेला महिनाभर अरबी समुद्राच्या सपाटीचे तापमान ३० अंश सेल्सिअसपेक्षा जास्तच होते. ज्यामुळे वादळाच्या निर्मितीसाठी पोषक वातावरण तयार झाले.
बंगालच्या उपसागरापेक्षा अरबी समुद्र लवकर तापतो असेही निरीक्षण वादळांवर अभ्यास करणाऱ्या समुद्र विज्ञान संस्थेतील तज्ज्ञ सांगतात. अर्थात याचा संबंध तापमानवाढीशी आहे. गेल्या चाळीस वर्षांतील वादळांचा धांडोळा घेतल्यास असे दिसून येते की, मानवी कृतीमुळे उद्भवलेल्या वातावरण बदलामुळे त्यांच्या उत्पत्तीस्थानांनाही प्रभावित केले आहे. त्यांची संहारशक्ती वाढलेली असून, आपल्या ओघात ही वादळे प्रचंड प्रमाणात पाऊस घेऊन येत असल्यामुळे नंतरच्या मदतकार्य आणि पुनर्वसनावरही परिणाम होत असतो. रविवारी आजरा तालुक्यातील धरण परिसरात २०० ते २८० मिलिमीटर पाऊस पडला. हा एक उच्चांकच आहे. त्यामुळे त्या भागात पूरस्थिती निर्माण झाली. मध्य भारतात तर लहरी पावसाने अनेकवेळा दाणादाण उडवून दिलेली आपण पाहिली. त्यामुळे आता संपूर्ण नियोजनच बदलावे लागणार आहे.
तापमानवाढीमुळे वादळे अतर्क्यही बनली असून, त्यांच्या उत्कर्षप्रक्रियेचा अंदाज घेणे कठीण होते आहे. याआधी सहसा वादळांच्या तडाख्यात न येणारे भूभागही आता सुरक्षित राहिलेले नाहीत, याचेही श्रेय तापमानवाढीलाच जाते. गेली काही वर्षे वादळांमुळे किनारपट्टीशी संलग्न खालाटीच्या भागातल्या मानवी वस्तींत पाणी शिरण्याचे प्रमाणही वाढू लागले आहे. भविष्यात वादळांमुळे वाढीव वित्तहानी आणि प्राणहानीचा अनुभव उष्ण कटिबंधातील देशांना येत राहील. वादळांचा प्रतिकार करण्याचे कौशल्य काही मानवाने अजूनपर्यंत आत्मसात केलेले नाही. त्यामुळे आपले यत्न वादळांच्या पश्चातचे साहाय्यकार्य आणि पुनर्वसनापुरते मर्यादित राहते. तापमानवाढीचे उपद्रवमूल्य आता ज्या गतीने आपल्या अनुभवास येऊ लागले आहे ते पाहता आपले वर्तन सुधारण्यावाचून पर्याय नाही. केलेल्या चुका सुधारताना कोणत्या देशाने अधिक कृती करावी आणि कोणाला सवलत द्यावी, यावर खल करायला भरपूर वेळ आपल्याकडे आहे. पण तापमानवाढीलाच नाकारण्याचा करंटेपणा आपण यापुढेही करत राहिलो तर पाणी अक्षरश: गळ्याशी यायला वेळ लागणार नाही.