टी-२० विश्वचषकाच्या उपांत्य सामन्यात इंग्लंडने भारताचे आव्हान अगदी सहज संपुष्टात आणले. नाणेफेक गमावल्यापासून रोहित आणि त्याचे सहकारी पराभूत मानसिकतेत खेळले. अपवाद होता तो फक्त विराट कोहली आणि हार्दिक पांड्या यांचाच. सर्वच डावपेच टीम इंडियाच्या विरोधात गेले. अंतिम एकादशमध्येही विरोधाभास जाणवला. चार विजयानंतर मोक्याच्या सामन्यात इतके पानिपत होण्यास कर्णधार रोहित आणि कोच राहुल द्रविड सर्वस्वी जबाबदार ठरतात. टीम इंडिया पुन्हा एकदा मोक्याच्या क्षणी (चोकर्स) ढेपाळली. चषकाला स्पर्श न करताच रिकाम्या हाताने परतण्याची नामुष्की ओढवली. आयसीसीच्या या मोठ्या स्पर्धेत पराभवाचे कारण काय?
२०२१ च्या टी-२० विश्वचषकात पाककडून दहा गड्यांनी झालेला पराभव ते या विश्वचषकात इंग्लंडकडून झालेला दहा गड्यांनी पराभव, या काळात भारताने मोठमोठे प्रयोग केले. कोहलीऐवजी रोहितकडे तिन्ही प्रकाराचे नेतृत्व सोपविण्यात आले, तर रवी शास्त्री यांची जबाबदारी राहुल द्रविडकडे आली. मागच्या ११ महिन्यांत टीम इंडियाने ३५ टी-२० सामने खेळले. त्यात किमान २९ खेळाडूंचा प्रयोग झाला. सात नव्या चेहऱ्यांनी पदार्पण केले. याच काळात चार कर्णधारदेखील बदलण्यात आले. इतक्या प्रयोगानंतर ज्या १५ खेळाडूंचा संघ निश्चित झाला. ते १५ जण भारताला आयसीसी चषक जिंकून देऊ शकले नाहीत. विश्वचषकात आघाडीची फळी सपशेल अपयशी ठरली. सहापैकी एकाही सामन्यात सलामीवीरांनी ५० धावांची भागीदारी केली नाही. मागच्या विश्वचषकापासून इशान किशन, ऋतुराज गायकवाड, संजू सॅमसन आणि दीपक हुड्डा यांचे सलामीला प्रयोग झाले, अखेर रोहित-राहुल जोडीवर विश्वास दाखविण्यात आला. पॉवर प्लेमध्ये या दोघांनी जे दिवे लावले, ते सर्वांनी पाहिले.
इंग्लंडचा खेळ बघता भारतीय संघाने लेगस्पिनर युझवेंद्र चहलला संधी देणे अपेक्षित होते. फिरकीचा सामना ही इंग्लंडची कमकुवत बाजू, मग त्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न का केला नाही? एका फलंदाजाला वगळून युझवेंद्र चहलला संधी देण्यास काय हरकत होती? ही मोठी चूक ठरली. अतिरिक्त वेगवान गोलंदाज म्हणून हार्दिकचा पर्याय होताच. पण धाडसी निर्णय घेण्याची तसदी कोण घेणार? धाडस न दाखवताच झिम्बाब्वेविरुद्धचा संघ कायम ठेवला. संथ खेळपट्टी इंग्लंडच्या खेळाडूंना समजली, पण भारतीय दिग्गजांना समजू नये, याचे आश्चर्य वाटते. येथे वेगवान चेंडू उपयुक्त नाहीत, हे कळताच जोस बटलरने मंद चेंडू टाकायला लावून भारतीयांना अलगद जाळ्यात ओढले, तो शहाणपणा रोहितने दाखविला नाही. भारतीय फलंदाजांचे अपयश आतापर्यंत गोलंदाजांनी धुवून काढले होते. पण, काल गोलंदाजांनीही निराशा केली. एकाही गोलंदाजाला गडी बाद करता आला नाही.
इंग्लंडच्या सलामीच्या जोडीने सर्वांना सळो की पळो करून सोडले. या संघात खेळाडू कमी आणि कर्णधारच अधिक होते. रोहित शर्मासह ऋषभ पंत, लोकेश राहुल आणि हार्दिक पांड्या हे कोणत्या ना कोणत्या संघाचे नेतृत्व करतात. इंग्लंडविरुद्ध पंत, राहुल, पांड्या, रोहित आणि विराट कोहली हे पाच आंतरराष्ट्रीय कर्णधार मैदानावर असताना धो-धो धुलाई झाली. खेळाडूंचे कौतुक करण्यात भारतीय संघ व्यवस्थापन वेळ घालवत असावा. ही वेळ प्रतिस्पर्धी संघाची बलस्थाने तसेच कच्चे दुवे शोधण्यात घालवली असती, तर कदाचित नामुष्कीची वेळ आली नसती.
सूर्यकुमारचे इंग्लंडने मुळीच दडपण घेतले नाही. त्यांनी चेंडू जरा पुढे टाकला आणि वेग कमी केला. 'स्लोअर वन'वर भर देत भारतीय फलंदाजांमधील मनगटी ताकदीची परीक्षा घेतली. भारतीय गोलंदाजांवर प्रहार करता येतो, हे बांगलादेशने सिद्ध केले होते. इंग्लंडने तर भारतीय मारा निष्प्रभही करता येतो, हे दाखवून दिले आहे. विश्वचषकाआधी रोहित उत्कृष्ट संघाच्या शोधात असल्याचे सांगत राहिला. या प्रयोगात आणखी एक मोठी स्पर्धा हातातून गेली.
२०१४ पासून आयसीसीच्या आठ मोठ्या स्पर्धांमध्ये दहापैकी सात निर्णायक सामन्यात भारताला पराभव पत्करावा लागला, हे वास्तव आहे. आयसीसीच्या स्पर्धेत प्रथमच नेतृत्वाची संधी मिळालेला रोहितदेखील अपयशी ठरल्यानंतर आता नवा कर्णधार म्हणून हार्दिक पांड्याच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे. अनेकदा रोहित मैदानावर गोंधळलेला होता. इंग्लंडविरुद्ध रोहितचे नेतृत्व सक्षम नव्हतेच. गोलंदाजांचा त्याला योग्य वापर करता आला नाही. पांढऱ्या चेंडूच्या खेळात आजवरची सर्वांत खराब कामगिरी करणारा संघ असा ठपका पराभवानंतर टीम इंडियावर लागला, हे खरे आहे.