डॉ. भालचंद्र नेमाडे -मी गांधी विचारांचा तज्ज्ञ नव्हे, पण या विचारांचा जागर ही जगभर चाललेली गोष्ट आहे. बुद्ध, मार्क्स, फ्रॉईड, आईन्स्टाईन असे मोठमोठे लोक या जगात होऊन गेले. परंतु मानवी जीवनाच्या सर्व पैलूंना स्पर्श करणारा; एवढंच नाही तर दैवतीकरण टाळून शेवटपर्यंत माणूस म्हणून राहणारा, दीनदलित, दुबळे, स्त्रिया, आदिवासी अशा सगळ्यांच्या मुळापर्यंत जाणारा हा मनुष्य होता. विसाव्या शतकातला सगळ्या मोठा तत्त्वज्ञ व्हिटगेन्स्टिन म्हणतो, कुठंतरी डोंगरावर, टेकडीवर चढत जाण्यापेक्षा खाली खाली जावं... महात्मा गांधींसारखे जे खालच्या स्तरावर जाऊ शकतात तेच मोठं काम करू शकतात.व्हिटगेन्स्टिन म्हणतो, चालायचं असेल तर घर्षण, प्रतिरोध आवश्यक. आज अशी परिस्थिती आहे की, गांधी विचारानं चालण्यासाठी खूप अडथळे आहेत. पण हे घर्षण चांगलंच आहे, असं मी म्हणेन. त्यामुळे आपल्याला जास्त चालता येईल व गांधीविचार जमेल तेवढा हिरिरीने मांडता येईल.महात्मा गांधींनी धार्मिक, राजकीय, सामाजिक, भाषिक अशा ज्या-ज्या क्षेत्रात काम केलं त्यात संबंध देशभर त्यांना शत्रू होते. इतकं असूनही शत्रूंकडून त्यांनी कायम प्रेम मिळवलं. परदेशात इंग्रजी शिकायला जाऊन तिथल्या पोषाखाचं अनुकरण करणारे फसलेले विचारवंत अवतीभवती असताना गांधींनी तो समज मोडून काढला. ‘नयी तालीम’ ही संकल्पना मांडली. हिंदू-मुस्लिमांमध्ये समेट करण्याच्या त्यांच्या प्रयत्नामुळे दोन्ही बाजूचे विरोधक त्यांना लाभले. शतकानुशतकं उर्दू ही आपली राष्ट्रभाषा होती. गांधी म्हणायचे, अरेबिक लिपीऐवजी ती आपण देवनागरीत लिहू आणि हिंदी व उर्दू मिळवून तिला हिंदुस्थानी करू. मात्र त्याला दोन्हीकडून विरोध झाला. धार्मिक उन्मादही झाला. इतके शत्रू आसपास असताना एक मोठं तत्त्वज्ञान ते जगाला देऊ शकले.सनातनी ब्राह्मण, हिंदुत्ववादी, आरएसएस, कम्युनिस्ट, औद्योगिक क्रांतीवाले त्या काळातले भांडवलदार लोक, सगळ्या क्षेत्रातला अभिजनवर्ग हे सगळे वरच्या वर्गाकडे बघत होते, तेव्हा गांधीजींचं लक्ष मात्र खालच्या वर्गाकडे होतं. ‘हिंदस्वराज’ हे पुस्तक त्यांच्या द्रष्टेपणाचं प्रतीक आहे. आज आपण विविधतेतील निवड सांगतो. मात्र पर्यावरणातून, प्रदेशांच्या वैशिष्ट्यांनुसार काय खावं, अंगावर घालावं याची पद्धत गांधींनी परंपरेतून जाणली व स्वीकारली.आदिवासी कुठं कपडे घालायचे? पण त्यावेळची लैंगिक दृष्टी व समज जास्त उदार आणि प्रामाणिक होती, त्यामुळे लपवायची गरज पडत नसे. इव्हनं सफरचंद खाल्ल्यानंतर तिला कमरेला अंजिराचं पान लावावंसं वाटलं. अंजिराचं पान लावायच्या घटनेपासून वस्त्रोद्योग सुरू झाला व आज हा उद्योग ही एक प्रचंड मोठी शोषणव्यवस्था बनली आहे.औद्योगिक क्रांतीपासून आपली परिस्थिती बिघडत चालली. माणसाची किंमत कमी करणं हे या क्रांतीचं पहिलं तत्त्व आहे. वाफेच्या इंजिनाचा, विजेचा शोध या टप्प्यातून संगणकाच्या टप्प्यात येताना माणसाची किंमत आणखी घटली. पर्यावरणात जे उपलब्ध आहे, आपल्याला जितकी गरज आहे तितकं उत्पादन करून, खाऊन-पिऊन आनंदात राहायचं हे औद्योगिक क्रांतीआधीच्या समाजाचं तत्त्व होतं. आता मात्र गरजेपेक्षा जास्त वस्तू निर्माण करून त्यासाठी बाजारपेठा मिळवायच्या आणि मिळाल्या नाहीत तर वस्तू बळजबरीनं लादायच्या, असं झालं आहे. फायटर जेट्समधून एकमेकांवर हल्ले करण्यासाठी औद्योगिक क्रांती असते काय?तुमच्या भागात तयार असणारा कच्चा माल अत्यंत नाममात्र दरात घेऊन त्यातली प्रक्रिया वाढवीत इतका नफा कमवायचा की पंचविसाव्या पिढीपर्यंत संपत्ती पोहोचली पाहिजे. या भांडवली अर्थशास्त्रातून गुन्हेगारी वाढली. शहरं कुरुप झाली. या लुटीच्या धंद्याची सवय झाल्यामुळे खुर्चीशिवाय बसलं तर बिघडत नाही हे कळत नाही. माणूस महत्त्वाचा नाही, तंत्रज्ञान महत्त्वाचं हे भांडवलवादाचं तत्त्व आहे. ते आपण मान्य करतो, त्यामुळे सगळी जनता निरुपयोगी व बिनकामाची झाली आहे. उद्या तुमची कामासाठी गरज नाही. तुम्ही खायप्यायचीही गरज नाही. मरा!- असं ते म्हणतील. हे एकूण मानवी संस्कृतीच्या विरुद्ध आहे. अशावेळी वाढणाऱ्या सांस्कृतिक गुन्हेगारीचा बंदोबस्त करायचा तर गांधी विचार आवश्यक आहे.‘गेकलछाप’ ही जर्मन संकल्पना मला महत्त्वाची वाटते, ज्यात तुम्ही समाजाशी जोडून व देवाणघेवाण करीत राहता. आपलंआपलं कमवा, खा व सगळ्याला शरण जा, या वृत्तीतून व समाजाशी तुटण्यातून सगळ्यात मोठा फटका बसतो जगभरच्या विविधतेला. परंपरा टिकल्या तर तुम्ही माणूस म्हणून टिकाल. एकाच पद्धतीचं खाणं, एकाच पद्धतीचं राहाणं, एकाच पद्धतीचं वागणं, एकाच पद्धतीची मिल्ट्री गव्हर्नमेंट, एकाच पद्धतीचं युद्ध या सगळ्यामुळे हजारो, लाखो वर्षे जी संस्कृती जोपासली तिला नख लागतं. आपण पर्यावरणाला काय समजतो, त्यातून आपल्या पदरी काय येणार आहे, हे नीट समजून घेऊन तंत्रज्ञान माजवत असलेलं अराजक द्रष्टेपणानं पाहणारा गांधींसारखा माणूस व त्याचे आपल्या कामाशी जुळतील असे विचार घेऊन कामाला लागायला हवं. यंत्रामुळे शारीरिक संपर्काची अपरिहार्यता संपली, हळूहळू सोशल कॉन्टॅक्ट कमी झाले आणि आता उद्या स्पिरिच्युअल कॉन्टॅक्टसुद्धा नाहीसे होतील. हा उत्पात समजून प्रेयस व श्रेयसाचा विचार करणं जरूरीचं. प्रगतीचा विचार करताना खातो काय, अंगावर घालतो काय, या प्रश्नांची उत्तरं गरजेची आहेत. यासाठी आपल्याला अत्यंत कठोर निर्णय घ्यावे लागतील, वाईटपणा घ्यावा लागेल. प्रगती म्हणजे वेग नव्हे, तुमची दिशा महत्त्वाची आहे. हळूहळू जात असलात तरी दिशा योग्य असायला हवी. एक साधा संकल्प करूया, ‘मी पर्यावरणाला पोषक असेच कपडे वापरीन आणि साधी राहणी हे पूज्य गांधीजींचे जगन्मान्य तत्त्व यथाशक्य आचरणात आणीन.’ (महात्मा गांधींनी वस्त्रत्यागाची घोषणा केली त्या घटनेला २२ सप्टेंबर २०२१ या दिवशी शंभर वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्त डॉ. भालचंद्र नेमाडे यांनी गांधी तीर्थ, जळगाव येथे केलेल्या भाषणाचा संक्षिप्त आशय आयोजक संस्थेच्या सौजन्याने.)शब्दांकन : सोनाली नवांगूळ
तंत्रज्ञान म्हणेल, माणसांची गरज काय? मरा!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2021 9:41 AM