जनतेचा नेता किंवा प्रतिनिधी कधीही सदारड्या किंवा कुरकुऱ्या असून चालत नाही, तर तो सतत सळसळता आणि उत्साही असावा लागतो हे कुणीतरी त्या अरविंद केजरीवालांना सांगण्याची गरज आहे. पंतप्रधान नरेन्द्र मोदी हे त्यांच्या रोजच्या रडारडीचे आवडते गंतव्य. मुळात त्या दोघांची कोणत्याही निकषांवर बरोबरी होऊ शकत नाही. तरीही केजरीवाल ती करतात. करोत. पण आता त्यांनी अगदी नव्याने केलेला आरोप म्हणजे मोदी त्यांना जीवे मारणार आहेत. स्किझोफ्रेनिया नावाचा मानसिक आजार झालेल्या व्यक्तीला सतत असेच काहीसे भास होत असतात असे म्हणतात. केजरीवाल त्यातले नाहीत हे खरे पण त्यांना जिथे तिथे मोदी दिसतात. शिवाय सततची कुरकुर आहेच. आपल्या अनेक आमदारांवर मोदी सरकार कुऱ्हाड चालवीत असल्याचा त्यांचा आरोप सुरु असतानाच त्यांचे एक खासदार भगवंत मान यांचे प्रकरण उपटले. हे मान नकलाकार आहेत. पण राजकारणातही ते बहुधा त्याच पेशात वावरत असावेत. संसद आवाराचे चित्रीकरण करुन त्यांनी सुरक्षा व्यवस्थेचे धिंडवडे उडवले असा त्यांच्यावर आरोप आहे. त्या आरोपावरुन त्यांनी एकीकडे दिलगिरी व्यक्त करुन त्यांच्या फेसबुक खात्यावर टाकलेले प्रस्तुतचे चित्रीकरण तर काढून टाकले पण दुसरीकडे पाच पानी पत्र पाठवून आपण निर्दोष असल्याचा दावा केला आणि तिसरीकडे पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांना आरोपी करा अशी मागणी केली. पठाणकोटच्या हवाई तळावरील अतिरेकी हल्ल्यानंतर मोदींनी त्या तळास भेट देणाऱ्या ज्या पाकी गटाला परवानगी दिली त्या गटात आयएसआय या पाकिस्तानी गुप्तहेर संघटनेचे काही माजी हेर होते. शिरजोरी बहुधा यालाच म्हणत असावेत. मान प्रकरणामुळेही आपल्याला दिल्लीत अडकून पडावे लागले असे केजरीवाल म्हणतात. त्यांना तूर्त दिल्लीतून बाहेर पडून पंजाब आणि नंतर गोवा ही दोन राज्ये पादाक्रांत करायची आहेत. तशी इच्छा बाळगणे हा एक राजकारणी म्हणून त्यांचा हक्कच आहे. पण मुळात पंजाब ही शूरवीरांची भूमी. तिथे त्यांना नवज्योत सिद्धू गवसले असले तरी त्यांच्या हसऱ्या चेहऱ्याकडे पाहून लोक सदा रडक्या केजरीवालांना स्वीकारतील अशी आशा मात्र बाळगता येणार नाही.
केजरीवालांना सांगा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2016 3:26 AM