डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या अध्यक्षपदाची निवडणूक जिंकून व्हाईट हाऊसमध्ये प्रवेश करण्याच्या घटनेला फारसे गांभीर्य नव्हते. तिचे स्वरूप केवळ स्थानिक उलथापालथीचे होते. अमेरिकेचे परराष्ट्र धोरण हे संरक्षणविषयक संबंध आणि जागतिक व्यवहारावर आधारलेले असल्याने ते सहजासहजी अपयशी ठरणारे नव्हते. त्यातही ट्रम्प हे वॉशिंग्टनसाठी नवीनच होते. नुकत्याच झालेल्या फ्रान्सच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत ट्रम्प हे उजव्या पक्षाच्या नेत्या मॅरीन ला पेन यांच्या समर्थनार्थ उभे होते. त्यांच्या मते त्या कठोर नेत्या होत्या आणि प्रत्यक्षात ते बरोबर होते. पण युरोपियन संघटनेच्या समर्थक इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी त्यांचा पराभव केल्यानंतर ट्रम्प यांनी कोलांटउडी घेत मॅक्रॉन यांना समर्थन दिले. ट्रम्प यांची अन्य युरोपियन देशांसंबंधीची भूमिका फारशी चांगली नव्हती. अमेरिकेत स्वत:च्या देशाच्या मोटारी विकणाऱ्या जर्मनीविषयी त्यांनी अनुदार उद्गार काढले होते. नाटो राष्ट्रांच्या परिषदेत त्यांनी मोण्टेनी ग्रो या लहानशा बाल्कन राष्ट्राच्या नेत्याला आपली जागा देत फोटो काढून घेतले !युरोपचा दौरा करण्यापूर्वी ट्रम्प यांनी रियाधला भेट दिली. तेथे त्यांनी औदार्याचा प्रत्यय आणून देत दहशतवादाचा मुकाबला करण्यासाठी मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रांची मदत घोषित केली. पण ते ज्या राष्ट्राला जिहादींच्या विरोधात लढण्यासाठी मदत देत होते तेच राष्ट्र जिहादींना साह्य करीत असते याचा त्यांना विसर पडला. अल-कायदा आणि इसिस या संघटनेत मोठ्या प्रमाणात सौदी अरेबियाचेच नागरिक सामील आहेत हेही त्यांनी लक्षात घेतले नाही. बिगर सुन्नी राष्ट्रांवर हल्ले करण्यास सौदी अरेबिया प्रोत्साहन देत असते हेही त्यांनी लक्षात घेतले नाही. सौदी अरेबियाला शस्त्रास्त्रांची मदत दिल्याने तेहेरान हे अण्वस्रबंदीच्या मार्गापासून दूर जाऊ शकते. अन्यथा तेहेरानने तो मार्ग स्वीकारण्याचे जवळजवळ पक्के केले होते. रियाधवर ट्रम्प यांनी औदार्याची बरसात करणे न समजण्यासारखे आहे. त्यानंतर युरोपात जाऊन त्यांनी नाटो करारातील राष्ट्रांना बजावले की त्यांनी कर्जाची फेड नियमितपणे करून घटक राष्ट्रांच्या तिजोरीत भर टाकायला हवी. नाटोची निर्मिती शीतयुद्धाच्या काळात स्टॅलिनच्या नेतृत्वातील कम्युनिस्ट रशियाला तोंड देण्यासाठी करण्यात आली होती. पण ट्रम्प यांना रशियाविषयी आस्था वाटत असल्याने नाटोची संकल्पनाच चुकीची आहे असे त्यांना वाटत आहे.रशियन राजकारणाच्या दलदलीत ट्रम्प यांचे अध्यक्षपद रुतले आहे. अमेरिकेची गुप्तचर संघटना एफबीआयकडे ट्रम्प यांच्या निवडणुकीत रशियाकडून काही मदत मिळाली होती का हे शोधण्याची जबाबदारी सोपविण्यात आली होती. त्यामुळे ट्रम्प यांनी एफबीआय प्रमुखाला त्याच्या पदावरून हटवून टाकले. तरीही ही गुप्तचर संघटना आपले शोधकार्य सुरूच ठेवीत आहे. त्यांनी आता ट्रम्प यांचे जावई जेअर्ड कुशनेर यांच्यावर आपले लक्ष केंद्रित केले आहे. ते व्हाईट हाऊसचे वरिष्ठ सल्लागार असूनही ते रशियन अधिकाऱ्यांच्या संपर्कात असतात का, याचा शोध एसबीआय घेत आहे. कारण ट्रम्प यांच्या निवडणुकीनंतर एका महिन्याच्या आत कुशनेर यांनी मॉस्कोसोबत गुप्तपणे संपर्क यंत्रणा कार्यान्वित करण्याबाबत रशियन अधिकाऱ्यांसोबत चर्चा केल्याचे सांगण्यात येते.ट्रम्प यांच्या निकटवर्ती अधिकाऱ्यांनी युक्रेन येथे रशियन मध्यस्थामार्फत व्यावसायिक संबंध प्रस्थापित केल्याची बाबही तपासण्यात येत आहे. रशियाने युक्रेनमध्ये लष्करी कारवाई केल्यामुळे नाटो राष्ट्रे सक्रिय झाली आहेत. कारण युक्रेनचा झुकाव युरोपियन राष्ट्रांकडे आहे. बराक ओबामांनी युक्रेनचे समर्थन केले होते. ट्रम्प यांच्या पूर्वीच्या अध्यक्षांनी युरोपीय राष्ट्रांविषयी काळजी बाळगली होती. तसेच रशियाचे अध्यक्ष पुतीन यांच्या संतापाला लगाम घालण्याचे मोल चुकवावे लागेल हे जाणले होते. पण ट्रम्प यांनी आपल्या निवडणुकीत रशियन दारूगोळ्याचा वापर केला, त्यामुळे युरोपियन राष्ट्रे ही अमेरिकेवर पोसली जाणारी परोपजीवी जमात आहे असा ट्रम्प यांनी ग्रह करून घेतला आहे. त्यामुळे रशियाचे अध्यक्ष पुतीन यांचा माणूस अमेरिकेच्या अध्यक्षपदी बसला आहे असे रशियातील अनेकांना वाटते, त्यामुळे स्टॅलीन यांच्या अवशेषांमध्ये निश्चितच अस्वस्थता निर्माण झाली असेल ! या सर्व प्रकारामुळे निक्सन यांच्या कारकिर्दीनंतर प्रथमच अमेरिकेचे अध्यक्षपद अनिश्चिततेत हेलकावे खात आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी हे काही चांगले संकेत नाहीत. त्यांनी पंतप्रधान झाल्यापासून ५७ राष्ट्रांना भेटी दिल्या असल्या तरी त्यांचे परराष्ट्र धोरण अमेरिकेच्या आसाभोवतीच फिरत असते. पुढील महिन्याच्या अखेरीस ते पुन्हा अमेरिकेला जाणार आहेत. पण अध्यक्ष ट्रम्प यांच्यासाठी भारत हे प्राधान्यक्रमाचे राष्ट्र नाही, हे त्यांनी रियाध येथे केलेल्या भाषणातून स्पष्ट झाले आहे. दहशतवादाचा सामना करणाऱ्या राष्ट्रात त्यांनी भारताची गणना केली. भारत हे राष्ट्र त्यांच्यासाठी तरी अमेरिकेपासून कोसो मैल दूर असलेले राष्ट्र आहे. त्यांच्या पूर्वाधिकाऱ्याप्रमाणे डोनाल्ड ट्रम्प यांना जागतिक दृष्टी नाही.ट्रम्प यांची दृष्टी त्यांच्या ट्रम्प टॉवर्सपुरतीच मर्यादित नाही. पण व्यापाऱ्यात असलेला धूर्तपणा त्यांच्यात आहे. त्यामुळे ते चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्यासोबत आपल्या फ्लोरिडा येथील मार-ए-लागो क्लबमध्ये काळ व्यतित करीत असताना दुसरीकडे जपानचे पंतप्रधान शिंझोआवे यांच्यासमवेत गोल्फही खेळत असतात. तसेच आपल्या सौदी यजमानासोबत अमेरिकन पदार्थांचा आस्वादही घेत असतात.ट्रम्प हे वृत्तीने पुराणमतवादी आहेत आणि ते तसेच राहतीलही. (त्यांना महाअभियोगाचेही भय वाटत नाही.) उदारमतवादी ओबामांपासून ते खूप वेगळे आहेत. त्यामुळे त्यांच्याशी बोलताना मोदींना आत्मप्रौढींपासून दूर रहावे लागेल आणि अत्यंत काळजीपूर्वक संवाद साधावा लागेल. खाद्य पदार्थांबाबतही ते आग्रही आहेत. त्यांना मांसाहार जास्त प्रिय असल्याने ढोकळा खाणाऱ्यापासून ते दूर राहण्याची शक्यता अधिक आहे.ट्रम्प हे माणसाशी व्यावहारिक पातळीवरच संपर्क ठेवत असतात. तेव्हा भारताला पाकिस्तान आणि चीन या दोन्ही राष्ट्रांनी जरी मार दिला तरी ट्रम्प हे तातडीने कृती करण्याची शक्यता अजिबात नाही. ट्रम्प यांच्याविषयी अंदाज बांधता येत नाही कारण त्यांचे वागणे अनाकलनीय असते. त्यामुळे मोदींचा पुढील अमेरिकेचा दौरा त्यांच्यासाठी कसोटीचा राहील यात शंका नाही.-हरिष गुप्ता-(‘लोकमत’ समूहाचे नॅशनल एडिटर )
मोदींच्या कार्यकर्तृत्वाची ट्रम्प यांच्यासमोर कसोटी!
By admin | Published: May 30, 2017 12:35 AM