एखादा अभिनयकुशल पुढारी एकच एक भाषण, अंगातल्या सगळ्या आवेशानिशी, आपली छप्पन्न इंची छाती बडवून देशाला रोज ऐकवीत असेल, तर एक दिवस लोक त्याला कंटाळतील की नाही? अशा लोकांनी त्याची भाषणे सुरू होताच, दूरचित्रवाहिन्यांची बटणे बंद केली किंवा गावात होणाऱ्या त्याच्या सभेकडे पाठ फिरविली, तर त्याचे नवल का करायचे? वर्धा या जिल्ह्याच्या शहरी परवा मोदींनी घेतलेल्या प्रचार सभेचे निम्मे मैदान रिकामे होते व माणसे सावलीच्या आडोशाने किनाऱ्याकिनाºयाने बसली होती. ‘ही जागा रिकामी नसून जनतेच्या मोदी व भाजपविषयीच्या प्रेमाने तुडुंब भरली आहे’ हा त्यावरचा एका भाजप स्नेह्याचा अभिप्राय मनोज्ञ वाटावा असा आहे. मोदींच्या भाषणात आता नवे काही नसते. काँग्रेस पक्षावरची त्यांची टीकाही शिळी होत, आता पार नेहरू-गांधींचा काळ उकरण्यापर्यंत गेली आहे.
अशा वेळी सैनिकांचा पराक्रम, सर्जिकल स्ट्राइक, ‘मिशन शक्ती’तील क्षेपणास्त्राचे प्रयोग हे आपल्या व आपल्या पक्षाच्या नावावर सांगण्यापलीकडे त्यांनी तरी काय करायचे असते? १५ लाखांचे आश्वासन हास्यास्पद झाले. नोटाबंदीचा प्रयोग फसला. औद्योगिकरण मंदावले. शेतीचे उत्पादन घटले. भाववाढ थांबत नाही आणि दिलेली रोजगाराविषयीची आश्वासने आता पूर्ण होण्याची शक्यता संपली आहे. मग शिळ्या कढीला ऊत आणायचेच तेवढे बाकी राहते. त्यातून राम मंदिर सुटले आहे, गंगेची शुद्धी थांबली आहे आणि बेरोजगारीने कळस गाठला आहे. मग आवाज चढविणे आणि तेच ते जुने पुन्हा सांगणे एवढेच उरते. तशीही निवडणुकांमधील प्रचाराची भाषणे फार जुजबी व विनोदी असतात. ‘ते लुच्चे आहेत आणि आम्ही सभ्य आहोत’ हे त्यातले धृपद आणि बाकीच्या नुसत्याच तानाबाना असतात. वर्धा हे गांधी व विनोबांचे गाव आहे. दिल्ली ही देशाची राजधानी असली, तरी वर्धा (सेवाग्राम) ही त्याच्या स्वातंत्र्यलढ्याची राजधानी आहे. त्या लढ्याचे सारे निर्णय याच शहरात घेतले गेले. त्यात १९५२ पासून काँग्रेसचे उमेदवार निवडून आले.
एकवार कम्युनिस्ट पक्षाचे घंगारे व २०१४च्या लाटेत आलेले भाजपचे तडस हेच काय ते त्यातले अपवाद आहे. यावेळची लढत अटीतटीची आहे. त्याचमुळे कदाचित ‘नागपूर टाळून’ मोदी वर्ध्याला आले, पण माणसे कसली जाम. ती आली नाहीत. सत्ताधाऱ्यांची भाषणे तशीही बेचव असतात. कारण त्यात त्यांनी काही सांगण्यापेक्षा काही करून दाखविणे अपेक्षित असते. मोदींचे सरकार करते थोडे आणि सांगते फार. जे सांगते तेही जनतेच्या जवळचे नसते. जमिनीवरचे नसते. त्याचा भोवतीच्या वास्तवाशी संबंधही फारसा नसतो. महाराष्ट्रात आजपर्यंत ४० हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, यवतमाळ जिल्ह्याला शेतकºयांची स्मशानभूमी म्हटले गेले. येथले सरकार धर्मांध गुन्हेगारांना मोकळीक देते. सुधारकी व विवेकी विचारावंतांच्या खुन्यांना हात लावीत नाहीत, मेट्रो गाड्या, बुलेट ट्रेन आणि समृद्धी मार्गाचा भुलभुलैया माणसांना जगवीत नाही, तो त्यांना जगण्याची नुसतीच स्वप्ने दाखवितो. वर्ध्यात आणि विदर्भात बेकारांची संख्या किती? त्यांना किती दिवसात किती रोजगार उबलब्ध करून देणार, तेथील शेतीचे उत्पादन येत्या काळात कसे वाढविणार?, बुडालेली कापूस शेती पुन्हा जमिनीवर कशी आणणार आणि गांधी व विनोबांनी गाजविलेली मूल्ये पुन्हा कशी उजागर करणार? मोदी याविषयी बोलले नाहीत. ‘सबका साथ, सबका विकास’ सोडून त्यांनी हिंदुत्त्वाचा अजेंडा राबवला़ एव्हढेच नव्हे, तर महाराष्ट्रातील शरद पवारांचे राजकारण, त्यांचा निवडणूक लढविण्या-न लढविण्याचा मुद्दा आणि त्यांचे कुटुंब यांवर त्यांनी तोंडसुख घेतले. झालेच तर देश आज जो आहे, तो त्यांच्या सरकारमुळेच कसा तरला आहे हे सांगितले़ त्यांचे आत्ममग्न बोलणे आता लोकांना मुखोद्गत झाले आहे, पण तीच ती बौद्धिके वर्षानुवर्षे त्याच त्या सुरात ऐकणाऱ्यांना त्यांचा जसा कंटाळा येत नाही, तसेच भाजपच्या लोकांचे आहे. त्यांना असल्या भाषणातही नवे तारे दिसतात. अडचण एवढीच की, वर्धेतली आणि विदर्भातली सगळीच माणसे भाजपची वा संघ परिवाराची नाहीत.
एखादा अभिनयकुशल पुढारी त्यांची तिचतिच भाषणे छाती बडवून देशाला रोज ऐकवत असेल, तर लोक कंटाळतील की नाही? मोदींच्या सभेचे आता तसेच होते आहे. त्यांच्या भाषणात नवे काही नाही. त्यांनी काही सांगण्यापेक्षा करून दाखविणे लोकांना अपेक्षित आहे.